जीवनज्योती कृषी डायरी - भाग ९ : आंब्यांचे दिवस
शेती करायला लागल्यापासून आमचे आंब्यांचे दिवस मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होतात आणि पार जून-जुलै महिन्यात संपतात. दिवाळीच्या आसपास मान्सून परतला की आम्हाला आंब्यांचे वेध लागतात. पाऊस संपल्यामुळे शेताच्या परिसरातलं हिरव्या रंगाचं आधिपत्य संपायच्या मार्गावर असतं. आसपासची माळरानं, डोंगर पिवळ्या, लाल, किरमिजी, करड्या छटा मिरवायला लागतात. शेतातील भाताची कापणी, झोडणी होऊन भात पोत्यातून घरी जातं. पेंढ्यांचे पिवळसर ढीग चाऱ्याची बेगमी म्हणून निगुतीने झाकले जातात. उन्हाळा संपल्यापासून नांदती-गाजती असलेली भाताची खाचरं रिकामी होतात.
गावातले शेतकरी गप्पा मारायला आले, तर चर्चेची गाडी हमखास कोणाकोणाच्या झाडांना यंदा कसा ‘लई म्हणजे लई’ मोहोर आला आहे, इकडे वळते. ‘तुम्ही खतं-औषधं टाकत नाही, म्हणून तुमची झाडं मागास राहतात. ह्या-त्या औषधाची फवारणी करा.’ असा सल्लाही मिळतो. पूर्वी मी रासायनिक खतं माणसाच्या आणि जमिनीच्या तब्येतीला कशी वाईट असतात, ह्यावर एक भाषण देत असे. आता फक्त हसून सोडून देते. पुण्यातल्या आंब्यांच्या झाडांवर मोहोर दिसायला लागतो, तरी शेतावरची झाडं निवांतच असतात. अभ्यास न केल्याने वर्गात मागे पडलेल्या पोराच्या आईला जसं वाईट वाटेल, तसं मला जरा वाईट वाटतं. पण हळूहळू मोहोर दिसायला लागतो. मोहोराचा मंद पण निश्चित जाणवणारा सुगंध फार छान असतो. त्या फुलातल्या मकरंदावर किडे-फुलपाखरं-मधमाश्या पार्टी करतात. एक एक करून सगळी झाडं पिवळ्या मोहोराने नटतात. ह्यातल्या प्रत्येक फुलाचं जर फळ झालं, तर त्या वजनाने झाडाला काहीतरी होईल, ही काळजी आम्ही नेमाने करतो. पण निसर्ग हुशार असल्याने अशी वेळ येत नाही. काळजी नसावी. काही झाडांना अगदी गच्च मोहोर असतो, तर काही झाडांवर शुकशुकाट. सगळ्याच्या सगळ्या झाडांना मोहोर आहे, असं होत नाही. हा विषय निघाल्यावर सगळेजण मला ‘तसाही आंबा एक वर्षाआडच येतो’ हा जवळपास न्यूटनच्या गतिविषयक नियमांइतकं वजन असलेला नियम ऐकवतात. पण कुठली झाडं कधी विश्रांती घ्यायची ठरवतील, ह्याचा काही नेम नसतो. विशेष काहीही कारण नसताना एखाद्या झाडाला पान दिसणार नाही, इतका मोहोर येतो, तर त्याच्या शेजारचं झाडावर मोहोराची काहीच हालचाल नसते.
आंबे भरपूर येण्याला काहीही कारण नसतं, पण आंब्याचं नुकसान व्हायला मात्र भरपूर कारणं असतात. नोव्हेंबर पासून जूनपर्यंत सगळे दिवस हवामान पर्फेक्ट आहे,असं होत नाही. इतक्या दिवसात ढग येणे, पाऊस पडणे, थंडी-उन्हाचं मान कमीजास्त होणे ह्यातलं काहीतरी किंवा बरंच काही घडतं. मोहोर गळून गेला, काळा पडला तर त्याच बिल कोणाच्या नावावर फाडायचं, त्या वर्षीच्या हवामानानुसार ठरवता येतं! हे अस्मानी संकट झालं. पण मानवी संकटंही पुष्कळ प्रकारची असतात. फळांची चोरी होणं तर नेहमीचंच आहे. आसपासच्या भातशेतीत, भाताच्या लावणीची तयारी म्हणून राब जाळतात. ते काम नीट लक्ष देऊन केलं नाही, तर त्यातली एखादी ठिणगीसुद्धा माळांवरच सुकलेलं गवत भुरूभुरू पेटवायला पुरेशी होते. वारा असेल, तर ती आग वेडीवाकडी पसरते. शेतावर आतापर्यंत दोनदा हा फटका बसला आहे. अग्नीचं हे तांडव शांत झाल्यावर जेव्हा तिथलं दृश्य बघितलं, तेव्हा हादरले होते. कालपर्यंत गच्च हिरव्या पानांनी, फळांनी समृद्ध दिसणारी झाडं होरपळून गेली होती. जमिनीवरचं तण जळल्यामुळे लाल जमीन काळी दिसत होती. सगळीकडे जळका वास सुटला होती. भरपूर फळं देणारी चिकूची, आंब्याची, फणसाची काही झाडं ह्या आगीत जखमी झाली. पण झाडं फार लढाऊ, चिवट असतात. ह्या ढग लागलेल्या झाडांच्या ज्या फांद्या आगीतून वाचल्या होत्या, त्या फांद्यांना फळं लागली. अजूनही लागत आहेत.
शेतजमीन घेतली तेव्हा तिथे गवताचं साम्राज्य होतं. मोठी झाडं नव्हती. महेशने कोकणातून आंब्याची, फणसाची झाडं आणली. आवळे, चिकू, पेरू, काजू, सीताफळ अशी बरीच फळझाडं लावली आणि काळजीकाट्याने जोपासली. आंब्याच्या झाडात बरीच व्हरायटी आहे. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर आंबा, पायरी आंबा, केरळ तोतापुरी, राजापुरी अशी कलमी झाडं आहेत. त्या व्यतिरिक्त कोयीपासून आलेली आणि आता छान मोठी झालेली अशीही झाडं आहेत. सगळी मिळून शंभरच्या वर झाडं आहेत. कलमी आंब्याचं फळ कसं असेल, ह्याचा अंदाज बांधणं सोपं असतं. कोकणातला हापूस आणि मावळातला हापूस फार वेगळा नसतो. तिथल्या आणि इथल्या हवा-पाणी-वातावरणाचा फरक चवीत, स्वादात जाणवत असेल. पण उन्नीस-बीस. कलमी नसलेली झाडं मात्र स्वतंत्र व्यक्तिमत्त्व राखून असतात. हे देशी / गावरान / रायवळ आंब्याचं प्रत्येक झाड निराळं. प्रत्येकाचा रंग, चव वेगळी. उग्र असा शेपू वास येणारं एक झाड बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतं. त्याची फळं उतरवली जात नाहीत. पिकून खाली पडलेल्या आंब्यांच्या कोयीपासून एक मिनी आमराई त्या झाडाखाली दरवर्षी तयार होते!
हे कसं आहे की आपण मॅकडोनाल्डचा बर्गर केरळात खाल्ला किंवा काश्मीरमध्ये, तरी चव एकच. तसं कलमी झाडांचं असतं. वडापाव मात्र प्रत्येक ठिकाणचा वेगळा. तसं ह्या नॉन कलमी गावरान, आंब्याचं असतं. त्या आंब्यांचीही चव वेगळी आणि छान असते. पण आता सगळ्यांना हापूस आंबाच हवा असतो. कल्याणला मुख्यतः कोकणातले आंबे मिळत असल्यामुळे आम्हीही लहान असल्यापासून हापूस आंबाच खाल्ला. पण आता ह्या ‘हापूसच खाणार’ ह्या विचारामागचे धोके दिसतात. पूर्वी प्रत्येकाच्या शेतात वैशिष्ट्यपूर्ण अशी गावरान आंब्याची मोठी झाडं असायची. भरपूर प्रमाणात फळ मिळायचं. मुलं-माणसं आंबे खाऊन तृप्त व्हायची. वेगवेगळ्या झाडाच्या फळांची वेगवेगळी चव घ्यायला सगळे उत्सुक असायचे. आता हापुसला इतकी मागणी आहे, की अशी व्हरायटी हळूहळू नामशेष होईल, आणि हापूसच्या एककल्ली लागवडीकडे आपण जाऊ, अशी भीती वाटते. पूर्वी भारतात भाताच्या असंख्य जाती होत्या. त्यातल्या कितीतरी जातींचं बियाणंही मिळत नाही. मावळात भातशेती पुष्कळ. ‘कुठला तांदूळ लावणार’ ह्या प्रश्नाला प्रत्येक जण ‘इंद्रायणी’ हेच उत्तर देतो. ‘तुमच्या लहानपणी कुठला तांदूळ लावायचात?’ असं जुन्या शेतकऱ्यांना विचारलं की ‘कोलम, जिरेसाळ’ अशी उत्तरं मिळतात. आता मात्र इंद्रायणी तांदुळाचा एककलमी कार्यक्रम. स्वीट कॉर्नच्या प्रचंड मागणीमुळे आता पूर्वी सर्रास मिळायची ती गोड नसलेली पांढऱ्या दाण्यांची मक्याची कणसं दुर्मिळ झाली. तसंच काही वर्षांनी आंब्याचं होईल, असं वाटतं. जैवविविधता पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाची. हापूस आंब्याबरोबर थोडे गावरान आंबे खाऊन आपण ही जैवविविधता जपण्यासाठी हातभार लावू शकतो.एव्हाना आम्ही शेतावरच्या बऱ्याच झाडांचं नामकरण केलं आहे. एका झाडाला आडवी फांदी आहे. त्या फांदीवर बसून काढलेल्या फोटोंना सुंदर पार्श्वभूमी मिळते. म्हणून ते ‘फोटोचं झाड’ आहे. एका झाडाला भरगच्च मोहोर येतो. पण फळ मात्र कमी असतं. म्हणून त्याचं नाव ‘मोहोराचं झाड. माझ्या दोन मैत्रिणींना पायरी आंबे फार आवडतात. शेतावर पायरीची दोनच झाडं आहेत. म्हणून त्या झाडांना ‘शैलजाचं झाड’ आणि ‘शमिकाचं झाड’ अशी नावं आहेत. काही झाडांना त्यांच्या लोकेशननुसार म्हणजे ‘आवळ्याच्या जवळचं झाड’ ‘टाकीमागचं झाड’, ‘पडलेलं झाड’ अशी नावं आहेत. काहींना फळाच्या चवीवरून / आकारावरून ‘मोठ्या आंब्याचं झाड’, ‘शेपू कैरीचं झाड’, ‘रायवळ पायरी’, ‘रायवळ केशर’ अशी नावं आहेत.कोकणातले आंबे बाजारात लवकर येतात. दुकानांमधून, मंडईत सगळीकडे आंबे दिसायला लागतात. घरचे आंबे येत असल्यामुळे बाजारातून आंबे विकत घ्यायची इच्छाही होत नाही. शेतावर गेले की आंब्याची प्रगती बघणे, हा महत्त्वाचा उद्योग असतो. कधी एकदा पहिला आंबा खायला मिळेल, अशी घाई होते. एक-एक करत आंब्याचा पाड पडतो. मग आंबे उतरवायची धूम सुरू होते. फार लवकर काढले, तर कोवळ्या आंब्याला गोडी नसते. उशीर झाला, तर वळीवाच्या पावसाने नुकसान व्हायची भीती असते. फळमाशीचा हल्ला होण्याची शक्यताही असते. शेतावरच्या मदतनिसांचं कुटुंब, एखादा बाहेरचा गडी सगळे आंबे उतरवायच्या कामात गर्क होतात.
असं दहा-पंधरा दिवस चालू राहतं. घरभर आंब्याचं साम्राज्य पसरतं. ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, आंबे पसरले सगळीकडे, सुवास पसरे रसही मिळे’ असं शब्दशः घडतं. जिथे जागा मिळेल तिथे आंब्याच्या आढ्या असतात. सध्या घर आंब्याचं आहे आणि आम्ही चोरून तिथे राहतोय, असं वाटतं. आपली आवडती माणसं आली, की घर भरल्यासारखं वाटतं, तसं घर भरतं. मी कल्याणला एका वाड्यातल्या घरात लहानाची मोठी झाले. मामा-काका-आत्या सगळे साधारण ह्याच परिस्थितीतले होते. लहानपण खूप आनंदात, प्रेमाच्या सावलीत गेलं. पण आजोळंच माडीचं घर, शेतावरून गाड्या भरून येणारे आंबे, प्रेमळ आजी, एकत्र कुटुंब, वरून कठोर वाटणारे मायाळू आजोबा हे निबंधात हमखास येणारे आयटम नव्हते. तेव्हा नाही, तरी आता हे सगळं बघायला मिळतंय, ह्याबद्दल ‘कोणती पुण्ये अशी यावी फळाला’ असं वाटत राहतं.
अढी लावलेल्या खोलीत आंब्यांचा घमघमाट सुटला, की मी जाहिरात सुरू करते. व्हॉट्स ऍप स्टेटसाला फोटो माहिती असते. आधीच्या वर्षी ज्यांनी आंबे घेतले होते, त्यांचे नाव-नंबर-पत्ते एका एक्सेल शीटमध्ये ठेवले आहेत. त्यांना धडाधड मेसेज पाठवायला सुरवात करते. अढीतले आंबे रोज बघावे लागतात. देठाला किंचित लागलेले आंबे घरी खायचे, आईकडे द्यायचे आणि केर घ्यायला येणाऱ्या मावशींना द्यायचे. त्याच्यापेक्षा एक पायरी वरचे ५० रु / १०० रु किलोने विकायचे. अगदी उत्तम आंबे ग्राहकांसाठी. फोनवर, प्रत्यक्ष विचारल्या जाणाऱ्या शंकांना उत्तरे देणे, हा एक साइड बिझनेस असतो. हळूहळू ऑर्डर येऊ लागतात. त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आंबे बॉक्समध्ये भरून त्यावर नाव-पत्ता घालून ते कुरियर किंवा पोर्टर सर्व्हिसने पाठवायचे. आंबे घ्यायला घरी येणारी मंडळी येऊ लागतात. एरवी दिवसातून एक-दोन वेळा वाजणारी बेल सारखीच वाजू लागते. घरभर आंबे, येणारे फोन, माणसं ह्यातून मार्ग काढून आम्ही आमची दैनंदिन कामं, जेवण वगैरे कसंबसं चालू ठेवतो. कधी एकदा पहिला आंबा घरी येईल इथपासून कधी एकदा आंबामुक्त घर होईल, इथपर्यंतचा प्रवास दमवणारा, पण मजेदार असतो. त्या निमित्ताने बरेच लोकं घरी येतात. नवीन ओळखी होतात. बऱ्याच दिवसात गाठभेट न झालेले नातेवाईक-मित्र मैत्रिणी ह्यांच्या भेटी होतात, बोलणं होऊन जुनी नाती नव्याने उजळतात. घरात असे भरपूर आंबे असल्याने हात देता होतो. त्या दरम्यान घरी आलेल्या प्रत्येकाला आंबे मिळतात. मग ते गॅस सिलेंडर द्यायला आलेले दादा असोत, पोस्टमन, कुरियर /पोर्टर सर्व्हिसचे कर्मचारी किंवा अजून कोणी. रिकाम्या हाताने कोणीही जात नाही.
मग पुढचा अध्याय आंबे-विक्रीचा. ती धावपळ सुरू होते. शेतजमीन साधारण २००० सालाच्या आगेमागे घेतली, नंतर तिथे आंब्यांची कलमं लावली. ती हळूहळू मोठी झाली, तरी थोडेच आंबे येत होते. घरी खायचे, शेजारी-नातेवाईक मंडळींना वानवळा देऊन कौतुक करायचं, इतकंच घडत होतं. एकदा मार्केट यार्डच्या व्यापाऱ्यांना विकायचा प्रयत्न करून झाला होता. तिथे भाव इतका पाडून मिळाला, की शेत ते पुण्याचं मार्केट यार्ड टेम्पोचे पैसे आणि वर चणे-फुटाणे खाता येतील इतकेच पैसे हातात पडले. २०१९ साली आंबे विकायचं काम अनपेक्षितरीत्या अंगावर पडलं. विक्रीचा अजिबातच अनुभव नसल्यामुळे गांगरायला झालं होतं. मग पन्नास रुपयांना एक डझन आंबे विकून आम्ही ते काम पार पाडलं. त्या जरा वेगळ्या, गमतीदार अनुभवातून घरून विक्री करता येईल, हे शिकलो.
नंतरच्या वर्षी म्हणजे २०२० साली कोविड महामारीने सगळ्यांना घरात कोंडलं. कोणाला घरी आंबे घ्यायला या, असं म्हणणं अशक्य होतं. जवळपास राहणारे घरी आले, की इमारतीच्या गेटजवळ आंबे देता येत होते. पण लांबच्या लोकांना मी नेऊन देऊ लागले. तेव्हा कोणाच्या घरी जायची परिस्थिती नव्हती. त्यामुळे काम तसं सोपं होतं. अमेझॉन डिलिव्हरी होते, तसं काम केलं. कोविडचे सुन्न दिवस होते. त्यात नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळाचा फटका बसून काढायला आलेले आंबे पडले होते. त्यामुळे आंबेही फार नव्हते आणि आमची विक्री व्यवस्थाही रुळलेली नव्हती. त्यामुळे ‘आमच्या अपार्टमेंटचं गेट किंवा तुमचं गेट’ ह्या तत्त्वावर काम झालं. २०२१ मध्येही साधारणपणे असंच झालं.
चार-पाच दिवसांनी एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणं आवश्यक होतं. तोवर आंबे संपवायलाच हवे म्हणून आम्ही आंब्यांचा सेल लावला. ८० रुपये किलो. ‘आंब्यांचा सेल’ ही कल्पना सगळ्यांना मजेदार वाटत होती. एका लांब राहणाऱ्या मैत्रिणीने ‘डन्झो पिकअप’ ही नवी कल्पना त्या वर्षी माझ्या समोर आणली. अर्ध्या - पाऊण तासात आंबे पुण्याच्या दुसऱ्या टोकाला पोचलेही. आंबे नेऊन देणे, हे प्रकरण त्रासदायक व्हायला लागल्यामुळे गेल्या वर्षीपासून आम्ही एका कुरियर सेवेची मदत घ्यायला लागलो. नवे बॉक्स घेऊन उगीच कशाला कचरा वाढवा? अशा विचाराने मी शेजाऱ्यांनी आणलेले आंब्याचे बॉक्स जमवून त्यांचा पुनर्वापर करते. कुरियर / पोर्टर सर्व्हिसमुळे आंबे पुण्याच्या कान्याकोपऱ्यात पाठवू शकतो. आमच्या एका नातलगांची स्वतःची कंपनी आणि कारखाना आहे. सगळे मिळून ४०-५० लोकं कामाला आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रत्येक सहकाऱ्याला एक डझन आंबे देतात. त्यांची एक मोठी ऑर्डर असते. त्याची खूप मदत होते.
आंब्याची कलमं आणून, मोठी होऊन ती झाडं फळं द्यायला लागल्यावर त्याच्या विक्रीसाठीची धडपड हे सगळं टप्प्याटप्प्याने शिकत गेलो. तो आलेख काही सरसर वर चढत गेला नाही. आमच्याही चुका झाल्या. धक्के बसले. पैशाचं नुकसान झालं. साधारणपणे हापूस, पायरी आंबे डझनाच्या भावाने आणि केशर, तोतापुरी किलोच्या भावाने विकतात.आम्हीही सुरवातीला तसंच करायचो. कोविडच्या दिवसात एकांना त्यांच्या घराजवळ पायरी आंबे दिले, पैसे देताना त्यांनी अर्धेच पैसे दिले. उरलेली फळं लहान होती, त्याचे पैसे देणार नाही, असं सांगितलं. वाईट तर वाटलं, पण इलाज नव्हता. त्यानंतर सर्व प्रकारचे आंबे किलोवर विकायला लागलो. मला स्वतःला किलो हे माप जास्त योग्य वाटतं. लहान-मोठे कसेही आंबे घेतले, तरी किलोच्या मापात हे सगळे एका पातळीवर येतात!
हे सगळे उपद्व्याप करून आम्हाला काय मिळतं? पैसे मिळतात. जरी आमचा चरितार्थ शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून नसला, तरी जगायला, शेतीच्या खर्चासाठी पैसे तर लागतातच. पैशाचं सोंग काही आणता येत नाही. बाकीची फळं, भाज्या विकून जे पैसे मिळतात, त्यापेक्षा आंबे-विक्रीतून येणारं उत्पन्न जास्त असतं. त्यामुळे ह्या दिवसात खिसा भरलेला असतो! हा झाला व्यवहाराचा भाग. पण पैशात मोजता न येणाऱ्या आनंदाचं माप शिगोशीग भरलेलं असतं. पहिला मोहोर दिसण्यापासून ते शेवटचा आंबा उतरवेपर्यंत जी उत्सुकता, जी गंमत असते, ती अमूल्य असते. रीतसर शिक्षण, कामाचा अनुभव असल्यावर पोटापुरते पैसे मिळवणं तितकंही अवघड नाही. बाजारात आंबेही भरपूर मिळतात. पण मोहराचा घमघमाट, त्यावर घोंघावणाऱ्या माशांचा गुंजारव, झाडावरची करकरीत कैरी खाण्याची मजा, अक्षरशः पानापानाला आंबा असलेलं झाड बघतानाची समृद्ध भावना, ही बाजारात कशी मिळेल? शेती करताना कारखान्यात तयार होणारी खतं, कीटकनाशकं आम्ही वापरत नाही. फळांना त्यांच्या नैसर्गिक वेगाने फुलायला, वाढायला आणि पिकायला वेळ मिळतो. त्यामुळे फळांचा स्वाद, गंध, चव टिकून राहते. शेती सुरू करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश्य, आपल्याला ज्ञात असलेल्या स्रोतातून आलेलं अन्न खायला मिळावं, हा होता. असं करणं प्रत्येकाला शक्य नाही. आपल्याबरोबर बाकीच्यांनाही नैर्सगिक, विषमुक्त, प्रकृतीला चांगलं असं अन्न उपलब्ध करून देऊ शकतो, ही भावना मनाला सुखावते. आपल्या दैनंदिन आयुष्यात अनिश्चिततेचा सामना पदोपदी करावा लागतो. त्या अनिश्चिततेला तोंड देताना कसं कोलमडून जायचं नाही, हे शेतावर शिकायला मिळतं. जीव आहे, तोवर जगायचं हा झाडांचा बाणा बघताना ती जाणीव खोलवर पोचते. भरभरून मोहोर आलेल्या झाडावर कधीकधी एकच फळ लागतं . पदरात पडलं, तेवढंच आपल्या नशिबात लिहिलेलं होतं, असं समजून ‘पोटापुरता पसा’ मिळाला की त्याच्यात खूश राहायला मी ह्या ‘आंब्यांच्या दिवसात’ शिकते. देणाऱ्याचे हात खरोखरच हजारो आहेत. त्यातल्या एका कणाने माझं सामान्य आयुष्य असंच उजळून निघावं, ही प्रार्थना आहे.
जीवन ज्योती कृषी : शेतीविषयावरील लिखाण
दिव्याखाली अंधार
https://aparnachipane.blogspot.com/2020/07/blog-post.html
आम्र-विक्री योग
https://aparnachipane.blogspot.com/2019/09/blog-post.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग एक
https://aparnachipane.blogspot.com/2020/09/blog-post.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग दोन
https://aparnachipane.blogspot.com/2020/09/2.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग तीन
https://aparnachipane.blogspot.com/2020/10/blog-post.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग चार
https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post_21.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग पाच
https://aparnachipane.blogspot.com/2023/11/blog-post.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग सहा
https://aparnachipane.blogspot.com/2024/02/blog-post.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग सात
https://aparnachipane.blogspot.com/2025/01/blog-post.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग आठ
https://aparnachipane.blogspot.com/2025/11/blog-post.html
जीवनज्योती कृषी डायरी भाग नऊ
https://aparnachipane.blogspot.com/2026/07/blog-post.html
















वा खूप छान लिहिले आहेस.... वाचताना तुमची होणारी धावपळ लक्षात आली त्याबरोबरच तुझ्या लिखाणातून या सगळ्यातून मिळणारे समाधान दिसून आले. खरंच या वाचनातून शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव होते..... त्याचे गोड फळ आम्हाला मिळते. "करमरकर आंबेवाल्यांना" आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!!
ReplyDelete