पुष्पदरी आणि सात भटके भाग ३ : हृषीकेश ते पिपलकोटी
गेले अनेक दिवस, खरंतर काही महिने ह्या ट्रेकबद्दल काहींना काही चालू होतं. चर्चा, चौकशी, रोज नवीन कल्पना. कुठे जायचं, कुठल्या संस्थेबरोबर जायचं, कोण-कोण येणार, रिझर्वेशन्स, सामानाची तयारी, आपण घरी नसताना घर-व्यावसायिक काम सुरळीत चालू राहण्यासाठी केलेली व्यवस्था. रोजचा दिनक्रम पार पाडत असताना एकीकडे ही गुणगूण मनात चालू असायची. इतकं नियोजन, तयारी केली होती, तो ट्रेक सुरू व्हायची वेळ आली होती. आजपासून पुढचे सहा दिवस सगळी व्यवस्था संस्थेची होती. हिमालयाच्या सौंदर्याची विलक्षण अशी भुरळ पडते, पण रुद्र, गंभीर रूपाची भीतीही वाटते. आजही वाटत होती!! हा काही माझा पहिला हिमालयातला ट्रेक नव्हता. वयाच्या विशीत हिमालयातल्या पहिल्या ट्रेकला गेले होते. पण तरुण वयाचा आपला एक रुबाब - एक आत्मविश्वास असतो. शारीरिक क्षमता चांगली असते. सगळं सोपं आहे आणि आपण जगात भारी आहोत, अशी खात्री असते. ते वय, ती धाडस करण्याची ऊर्मी हे सगळं कधीच मागे पडलं होती. कुठल्या अडचणी येऊ शकतील? तब्येतीच्या, निसर्गाच्या किंवा बाकी काही असे विचार मनात घोटाळत होते. सगळ्या नकोश्या शक्यतांच्या लांबलचक याद्या डोक्यात नको असतानाही तयार होत...