जीवनज्योती कृषी डायरी - भाग ९ : आंब्यांचे दिवस



काही चित्रपटात किंवा नाटकात एखाद्या सामान्य माणसाला एक दिवसासाठी राजा किंवा मुख्यमंत्री करतात. हे गोष्टीत ठीक आहे. प्रत्यक्षात असं कधी होणार नाही. तरी पण कल्पना करायची झाली तर एक जानेवारीला आपण मुख्यमंत्री व्हायचं, असं मी कधीचंच ठरवलं आहे. एक जानेवारीच का? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक जानेवारीला हापूस आंब्याची पहिली पेटी कोकणातून भेट म्हणून येते, (असं ऐकलं आहे) म्हणून!! खरं खोटं वर्षा बंगल्याच्या रहिवाशांना ठाऊक. अश्या ह्या भाग्यवान माननीयांना वगळलं, तर बाकी जनतेचे आंब्याचे दिवस एप्रिल-मे महिन्यात सुरू होतात. वर्तमानपत्रात ‘फळांच्या राजाचे पुण्यात आगमन’ वगैरे बातम्या झळकतात. काही लोकं तातडीने आंबे खायला सुरू करतात, तर काही अक्षय्यतृतीयेला. पण हळूहळू करत प्रत्येक घरात आंबे आपलं बस्तान बसवतात. मोसमाच्या शेवटी उत्तरेकडचे आंबे येतात. हापूस-पायरीला चटावलेले मराठी जीव त्या आंब्याचं जरा कमी उत्साहाने स्वागत करतात. तोवर पाऊस येतो. आंब्याची चव उतरते आणि त्या वर्षीचे आंब्यांचे दिवस संपतात.

शेती करायला लागल्यापासून आमचे आंब्यांचे दिवस मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होतात आणि पार जून-जुलै महिन्यात संपतात. दिवाळीच्या आसपास मान्सून परतला की आम्हाला आंब्यांचे वेध लागतात. पाऊस संपल्यामुळे शेताच्या परिसरातलं हिरव्या रंगाचं आधिपत्य संपायच्या मार्गावर असतं. आसपासची माळरानं, डोंगर पिवळ्या, लाल, किरमिजी, करड्या छटा मिरवायला लागतात. शेतातील भाताची कापणी, झोडणी होऊन भात पोत्यातून घरी जातं. पेंढ्यांचे पिवळसर ढीग चाऱ्याची बेगमी म्हणून निगुतीने झाकले जातात. उन्हाळा संपल्यापासून नांदती-गाजती असलेली भाताची खाचरं रिकामी होतात.


असं सगळं आसपास घडत असताना शेतावरच्या एखाद्या आंब्याच्या झाडावर, तान्ह्या बाळाच्या पावलांचा रंगाची कोवळी, लालसर पानं दिसतात. पावसाच्या दिवसात निवांत तंद्रीत असलेली झाडं खडबडून जागी होऊन कामाला लागतात. नव्हाळीची चकचकीत पानं आलेली झाडं, वयात आलेल्या मुलीसारखी अचानक देखणी दिसायला लागतात. शहरी मराठीत झाडाला पानं ‘फुटतात’. मावळातल्या मराठीत झाडं पानं ‘काढतात’. फणस, काजू, बोरं, करवंदं, आवळे, चिकू अशा झाडांची नवीन पानं, फुलं लक्ष वेधून घेण्यात आंब्याशी स्पर्धा करतात! आंबा म्हणजे फळांचा राजा. त्याची स्वारी येणार, म्हणजे काही साधी बाब नाही. शिंग-तुताऱ्या वाजत, ‘होशिय्यार-खबरदार’ अशा ललकाऱ्या ऐकत महाराजांचं आगमन होतं!

गावातले शेतकरी गप्पा मारायला आले, तर चर्चेची गाडी हमखास कोणाकोणाच्या झाडांना यंदा कसा ‘लई म्हणजे लई’ मोहोर आला आहे, इकडे वळते. ‘तुम्ही खतं-औषधं टाकत नाही, म्हणून तुमची झाडं मागास राहतात. ह्या-त्या औषधाची फवारणी करा.’ असा सल्लाही मिळतो. पूर्वी मी रासायनिक खतं माणसाच्या आणि जमिनीच्या तब्येतीला कशी वाईट असतात, ह्यावर एक भाषण देत असे. आता फक्त हसून सोडून देते. पुण्यातल्या आंब्यांच्या झाडांवर मोहोर दिसायला लागतो, तरी शेतावरची झाडं निवांतच असतात. अभ्यास न केल्याने वर्गात मागे पडलेल्या पोराच्या आईला जसं वाईट वाटेल, तसं मला जरा वाईट वाटतं. पण हळूहळू मोहोर दिसायला लागतो. मोहोराचा मंद पण निश्चित जाणवणारा सुगंध फार छान असतो. त्या फुलातल्या मकरंदावर किडे-फुलपाखरं-मधमाश्या पार्टी करतात. एक एक करून सगळी झाडं पिवळ्या मोहोराने नटतात. ह्यातल्या प्रत्येक फुलाचं जर फळ झालं, तर त्या वजनाने झाडाला काहीतरी होईल, ही काळजी आम्ही नेमाने करतो. पण निसर्ग हुशार असल्याने अशी वेळ येत नाही. काळजी नसावी. काही झाडांना अगदी गच्च मोहोर असतो, तर काही झाडांवर शुकशुकाट. सगळ्याच्या सगळ्या झाडांना मोहोर आहे, असं होत नाही. हा विषय निघाल्यावर सगळेजण मला ‘तसाही आंबा एक वर्षाआडच येतो’ हा जवळपास न्यूटनच्या गतिविषयक नियमांइतकं वजन असलेला नियम ऐकवतात. पण कुठली झाडं कधी विश्रांती घ्यायची ठरवतील, ह्याचा काही नेम नसतो. विशेष काहीही कारण नसताना एखाद्या झाडाला पान दिसणार नाही, इतका मोहोर येतो, तर त्याच्या शेजारचं झाडावर मोहोराची काहीच हालचाल नसते.



एका एका झाडाला सावकाश मोहोर येतो. परागीभवन होतं आणि फळाच्या वाढीची प्रक्रिया सुरू होते. अक्षरशः एका आठवड्याभराने शेतावर गेलं, तरी कितीतरी बदल झालेले दिसतात. अजिबात मोहोर नसलेल्या फांद्यांच्या शेंड्यांवर तुरळक मोहोर दिसायला लागलेला असतो, कुठे मोहोर फुलून तिथे किडे-माशा घोंघावत असतात. मोहोराच्या जागी फळाचे हिरवे थेंब दिसू लागतात. त्या थेंबांना मग कैरीचा आकार येतो. ती कैरी अगदी लहान असते. लहान म्हणजे किती लहान, तर तान्ह्या बाळाच्या करंगळीच्या पेराएवढी! अशी कैरी चवीला कडसर, तुरट लागते. हळूहळू त्या कैऱ्या अंग धरतात. मोठ्या होतात. कैरीच्या निरनिराळ्या पदार्थांची यादी मनात आकार घ्यायला लागते. चटणी, ताजं लोणचं, तक्कू, मेथांबा, पन्हं, आंब्याची डाळ, एक ना दोन. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटतं. पण ही हौस भागवण्यासाठी थोडा दम धरावा लागतो. बाळाच्या करंगळीच्या पेराएवढी असलेली कैरी बोटाएवढी मोठी होते. चवीला आंबट लागते. झाडाखाली पडलेल्या कैऱ्या पिशवीत भरून घरी आणायचा एक लघु-उद्योग सुरू होतो. कोकणात गुढीपाडव्याला पहिला आंबा खातात म्हणे. पण पुण्याच्या आसपासचे आंबे उशीराने येतात. त्यामुळे आम्ही पाडव्याला नव्या कैरीचा काहीतरी पदार्थ करतो. ओले काजू असतील, तर भाजीत घालतो. गुढीला नैवेद्य दाखवून उदंड पिकासाठी, पोटभर अन्नासाठी प्रार्थना करतो. असं होता होता हळूहळू कैऱ्या मोठ्या होतात. त्यांचा डार्क हिरवा रंग बदलून देठाकडे पिवळी झाक येऊ लागते. शेतावरचा मदतनीस ‘आंब्याचा करल (!) बदलायला लागला, असं म्हणतो. दिवाळीनंतर सुरू झालेल्या आंब्यांच्या दिवसांना आता रंग चढतो. रात्रीच्या जेवणाबरोबर होणाऱ्या प्रत्येक संभाषणात आंबे डोकावायला लागतात. मे महिन्याच्या अखेरीस आंबे तयार होऊन घरी येतात. तोवर ‘आंबे कधी येणार?’ ह्या प्रश्नाला ‘मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात’ हे उत्तर असंख्य वेळा देऊन झालेलं असतं. इतक्या वेळा हेच उत्तर देते , की व्हॉट्स ऍप वर ‘मे महिन्याच्या’ असं टाईप केलं की पुढचे शब्द आपोआप मिळतात!


आंबे भरपूर येण्याला काहीही कारण नसतं, पण आंब्याचं नुकसान व्हायला मात्र भरपूर कारणं असतात. नोव्हेंबर पासून जूनपर्यंत सगळे दिवस हवामान पर्फेक्ट आहे,असं होत नाही. इतक्या दिवसात ढग येणे, पाऊस पडणे, थंडी-उन्हाचं मान कमीजास्त होणे ह्यातलं काहीतरी किंवा बरंच काही घडतं. मोहोर गळून गेला, काळा पडला तर त्याच बिल कोणाच्या नावावर फाडायचं, त्या वर्षीच्या हवामानानुसार ठरवता येतं! हे अस्मानी संकट झालं. पण मानवी संकटंही पुष्कळ प्रकारची असतात. फळांची चोरी होणं तर नेहमीचंच आहे. आसपासच्या भातशेतीत, भाताच्या लावणीची तयारी म्हणून राब जाळतात. ते काम नीट लक्ष देऊन केलं नाही, तर त्यातली एखादी ठिणगीसुद्धा माळांवरच सुकलेलं गवत भुरूभुरू पेटवायला पुरेशी होते. वारा असेल, तर ती आग वेडीवाकडी पसरते. शेतावर आतापर्यंत दोनदा हा फटका बसला आहे. अग्नीचं हे तांडव शांत झाल्यावर जेव्हा तिथलं दृश्य बघितलं, तेव्हा हादरले होते. कालपर्यंत गच्च हिरव्या पानांनी, फळांनी समृद्ध दिसणारी झाडं होरपळून गेली होती. जमिनीवरचं तण जळल्यामुळे लाल जमीन काळी दिसत होती. सगळीकडे जळका वास सुटला होती. भरपूर फळं देणारी चिकूची, आंब्याची, फणसाची काही झाडं ह्या आगीत जखमी झाली. पण झाडं फार लढाऊ, चिवट असतात. ह्या ढग लागलेल्या झाडांच्या ज्या फांद्या आगीतून वाचल्या होत्या, त्या फांद्यांना फळं लागली. अजूनही लागत आहेत.


शेतजमीन घेतली तेव्हा तिथे गवताचं साम्राज्य होतं. मोठी झाडं नव्हती. महेशने कोकणातून आंब्याची, फणसाची झाडं आणली. आवळे, चिकू, पेरू, काजू, सीताफळ अशी बरीच फळझाडं लावली आणि काळजीकाट्याने जोपासली. आंब्याच्या झाडात बरीच व्हरायटी आहे. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर आंबा, पायरी आंबा, केरळ तोतापुरी, राजापुरी अशी कलमी झाडं आहेत. त्या व्यतिरिक्त कोयीपासून आलेली आणि आता छान मोठी झालेली अशीही झाडं आहेत. सगळी मिळून शंभरच्या वर झाडं आहेत. कलमी आंब्याचं फळ कसं असेल, ह्याचा अंदाज बांधणं सोपं असतं. कोकणातला हापूस आणि मावळातला हापूस फार वेगळा नसतो. तिथल्या आणि इथल्या हवा-पाणी-वातावरणाचा फरक चवीत, स्वादात जाणवत असेल. पण उन्नीस-बीस. कलमी नसलेली झाडं मात्र स्वतंत्र व्यक्तिमत्त्व राखून असतात. हे देशी / गावरान / रायवळ आंब्याचं प्रत्येक झाड निराळं. प्रत्येकाचा रंग, चव वेगळी. उग्र असा शेपू वास येणारं एक झाड बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतं. त्याची फळं उतरवली जात नाहीत. पिकून खाली पडलेल्या आंब्यांच्या कोयीपासून एक मिनी आमराई त्या झाडाखाली दरवर्षी तयार होते!

हे कसं आहे की आपण मॅकडोनाल्डचा बर्गर केरळात खाल्ला किंवा काश्मीरमध्ये, तरी चव एकच. तसं कलमी झाडांचं असतं. वडापाव मात्र प्रत्येक ठिकाणचा वेगळा. तसं ह्या नॉन कलमी गावरान, आंब्याचं असतं. त्या आंब्यांचीही चव वेगळी आणि छान असते. पण आता सगळ्यांना हापूस आंबाच हवा असतो. कल्याणला मुख्यतः कोकणातले आंबे मिळत असल्यामुळे आम्हीही लहान असल्यापासून हापूस आंबाच खाल्ला. पण आता ह्या ‘हापूसच खाणार’ ह्या विचारामागचे धोके दिसतात. पूर्वी प्रत्येकाच्या शेतात वैशिष्ट्यपूर्ण अशी गावरान आंब्याची मोठी झाडं असायची. भरपूर प्रमाणात फळ मिळायचं. मुलं-माणसं आंबे खाऊन तृप्त व्हायची. वेगवेगळ्या झाडाच्या फळांची वेगवेगळी चव घ्यायला सगळे उत्सुक असायचे. आता हापुसला इतकी मागणी आहे, की अशी व्हरायटी हळूहळू नामशेष होईल, आणि हापूसच्या एककल्ली लागवडीकडे आपण जाऊ, अशी भीती वाटते. पूर्वी भारतात भाताच्या असंख्य जाती होत्या. त्यातल्या कितीतरी जातींचं बियाणंही मिळत नाही. मावळात भातशेती पुष्कळ. ‘कुठला तांदूळ लावणार’ ह्या प्रश्नाला प्रत्येक जण ‘इंद्रायणी’ हेच उत्तर देतो. ‘तुमच्या लहानपणी कुठला तांदूळ लावायचात?’ असं जुन्या शेतकऱ्यांना विचारलं की ‘कोलम, जिरेसाळ’ अशी उत्तरं मिळतात. आता मात्र इंद्रायणी तांदुळाचा एककलमी कार्यक्रम. स्वीट कॉर्नच्या प्रचंड मागणीमुळे आता पूर्वी सर्रास मिळायची ती गोड नसलेली पांढऱ्या दाण्यांची मक्याची कणसं दुर्मिळ झाली. तसंच काही वर्षांनी आंब्याचं होईल, असं वाटतं. जैवविविधता पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाची. हापूस आंब्याबरोबर थोडे गावरान आंबे खाऊन आपण ही जैवविविधता जपण्यासाठी हातभार लावू शकतो.

एव्हाना आम्ही शेतावरच्या बऱ्याच झाडांचं नामकरण केलं आहे. एका झाडाला आडवी फांदी आहे. त्या फांदीवर बसून काढलेल्या फोटोंना सुंदर पार्श्वभूमी मिळते. म्हणून ते ‘फोटोचं झाड’ आहे. एका झाडाला भरगच्च मोहोर येतो. पण फळ मात्र कमी असतं. म्हणून त्याचं नाव ‘मोहोराचं झाड. माझ्या दोन मैत्रिणींना पायरी आंबे फार आवडतात. शेतावर पायरीची दोनच झाडं आहेत. म्हणून त्या झाडांना ‘शैलजाचं झाड’ आणि ‘शमिकाचं झाड’ अशी नावं आहेत. काही झाडांना त्यांच्या लोकेशननुसार म्हणजे ‘आवळ्याच्या जवळचं झाड’ ‘टाकीमागचं झाड’, ‘पडलेलं झाड’ अशी नावं आहेत. काहींना फळाच्या चवीवरून / आकारावरून ‘मोठ्या आंब्याचं झाड’, ‘शेपू कैरीचं झाड’, ‘रायवळ पायरी’, ‘रायवळ केशर’ अशी नावं आहेत.

कोकणातले आंबे बाजारात लवकर येतात. दुकानांमधून, मंडईत सगळीकडे आंबे दिसायला लागतात. घरचे आंबे येत असल्यामुळे बाजारातून आंबे विकत घ्यायची इच्छाही होत नाही. शेतावर गेले की आंब्याची प्रगती बघणे, हा महत्त्वाचा उद्योग असतो. कधी एकदा पहिला आंबा खायला मिळेल, अशी घाई होते. एक-एक करत आंब्याचा पाड पडतो. मग आंबे उतरवायची धूम सुरू होते. फार लवकर काढले, तर कोवळ्या आंब्याला गोडी नसते. उशीर झाला, तर वळीवाच्या पावसाने नुकसान व्हायची भीती असते. फळमाशीचा हल्ला होण्याची शक्यताही असते. शेतावरच्या मदतनिसांचं कुटुंब, एखादा बाहेरचा गडी सगळे आंबे उतरवायच्या कामात गर्क होतात.


दर वर्षी ट्रायल-एरर करत आता शेतावरून आलेल्या आंब्यांची सिस्टिम बसली आहे. झाडांवरून उतरवले की आंब्यांची शेतावरच्या खोलीत अढी लावतात. उतरवताना जखमी झालेले, किंवा फळमाशीचे आंबे तिथल्या तिथेच रिजेक्ट होतात. चांगले आंबे क्रेटमध्ये बसून घरी येतात. कारमध्ये सहा क्रेट मावतात. ते कारमधून लिफ्टमध्ये, लिफ्टमधून घरी आणतो. संध्याकाळी/ रात्री घरी अढी लावतो. रिकामे झालेले क्रेट पुन्हा शेतावर जातात. हे चक्र बरेच दिवस चालू असतं. ऊब मिळावी, म्हणून अढी घातलेल्या खोलीच्या दारं-खिडक्या बंदच ठेवाव्या लागतात. अधून मधून हे पांघरूण काढून आंब्याचं मुखदर्शन घ्यावं लागतं. म्हणजे एखादा आंबा खराब होत असेल, तर वेळीच बाजूला करता येतो. लहानपणीच्या बोधकथांमध्ये ‘संगतीचा परिणाम’ अशा पद्धतीचं शीर्षक असलेल्या गोष्टीत ‘एक खराब आंबा पूर्ण अढी नासवू शकतो’ हे खूप वेळा पटवून दिलेलं होतं. त्या पुस्तकी ज्ञानाचं प्रात्यक्षिक इथे मिळतं! अढी लावताना गच्च हिरव्या आणि देठापाशी किंचित पिवळसर रंगाच्या असलेल्या आंब्यांचा रंग बदलायला लागतो. खोलीत गेल्यावर पिकलेल्या आंब्याच्या सुवास जाणवायला लागतो. आंबे लवकर पिकावे म्हणून विक्रेते कुठल्या कुठल्या पावडर टाकून ते पिकवतात. त्यामुळे वरून रंग पिवळा दिसतो पण अपेक्षित चव येत नाही. आमची नैसर्गिक शेती असल्याने असलं काही करत नाही. अढीतले आंबे देठाकडून रंग बदलतात आणि सावकाश पिकतात. ट्रायल घेण्याच्या नावाखाली आम्ही आंबा कापून बघतो. झाडावर पिकून खाली पडलेले म्हणजेच ‘पाडाचे आंबे’ शेतावरून घरी येतात. ते खायला मिळतात.

असं दहा-पंधरा दिवस चालू राहतं. घरभर आंब्याचं साम्राज्य पसरतं. ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, आंबे पसरले सगळीकडे, सुवास पसरे रसही मिळे’ असं शब्दशः घडतं. जिथे जागा मिळेल तिथे आंब्याच्या आढ्या असतात. सध्या घर आंब्याचं आहे आणि आम्ही चोरून तिथे राहतोय, असं वाटतं. आपली आवडती माणसं आली, की घर भरल्यासारखं वाटतं, तसं घर भरतं. मी कल्याणला एका वाड्यातल्या घरात लहानाची मोठी झाले. मामा-काका-आत्या सगळे साधारण ह्याच परिस्थितीतले होते. लहानपण खूप आनंदात, प्रेमाच्या सावलीत गेलं. पण आजोळंच माडीचं घर, शेतावरून गाड्या भरून येणारे आंबे, प्रेमळ आजी, एकत्र कुटुंब, वरून कठोर वाटणारे मायाळू आजोबा हे निबंधात हमखास येणारे आयटम नव्हते. तेव्हा नाही, तरी आता हे सगळं बघायला मिळतंय, ह्याबद्दल ‘कोणती पुण्ये अशी यावी फळाला’ असं वाटत राहतं.



घरचे आंबे’ हे स्टेशन लागण्याआधी मी मंडईतून आंबे आणायचे. तिथले विक्रेते आंब्यामध्ये कांदे आणि कोळसा ठेवतात. कोळसा ठेवला की आंब्याला दृष्ट लागत नाही, असं चौकशीअंती कळलं. कांदा ठेवायचं काय कारण? ते काही त्या विक्रेत्या दादांना सांगता येईना. ‘आंब्याचा भाव ऐकून कोणी चक्कर येऊन पडलं, तर चटकन हाताशी कांदा हवा’ असं लॉजिक मी सांगितल्यावर त्यांना फार म्हणजे फार गंमत वाटली. ‘ताई, इतकी वर्ष आंबे विकतोय, तरी असं काही सुचलं नव्हतं. आता कोणी विचारलं, की मी पण हे सांगीन’ असं म्हणून त्यांनी माझ्या विनोदाला दाद दिली. आता घरचे आंबे इतके येतात आणि इतके छान असतात की बाजारातल्या आंब्यांकडे लक्षही जात नाही. पण अढी लावताना आवर्जून कांदे ठेवतो. तेव्हा मला मंडईतले ते खळखळून हसणारे दादा हमखास आठवतात.

अढी लावलेल्या खोलीत आंब्यांचा घमघमाट सुटला, की मी जाहिरात सुरू करते. व्हॉट्स ऍप स्टेटसाला फोटो माहिती असते. आधीच्या वर्षी ज्यांनी आंबे घेतले होते, त्यांचे नाव-नंबर-पत्ते एका एक्सेल शीटमध्ये ठेवले आहेत. त्यांना धडाधड मेसेज पाठवायला सुरवात करते. अढीतले आंबे रोज बघावे लागतात. देठाला किंचित लागलेले आंबे घरी खायचे, आईकडे द्यायचे आणि केर घ्यायला येणाऱ्या मावशींना द्यायचे. त्याच्यापेक्षा एक पायरी वरचे ५० रु / १०० रु किलोने विकायचे. अगदी उत्तम आंबे ग्राहकांसाठी. फोनवर, प्रत्यक्ष विचारल्या जाणाऱ्या शंकांना उत्तरे देणे, हा एक साइड बिझनेस असतो. हळूहळू ऑर्डर येऊ लागतात. त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आंबे बॉक्समध्ये भरून त्यावर नाव-पत्ता घालून ते कुरियर किंवा पोर्टर सर्व्हिसने पाठवायचे. आंबे घ्यायला घरी येणारी मंडळी येऊ लागतात. एरवी दिवसातून एक-दोन वेळा वाजणारी बेल सारखीच वाजू लागते. घरभर आंबे, येणारे फोन, माणसं ह्यातून मार्ग काढून आम्ही आमची दैनंदिन कामं, जेवण वगैरे कसंबसं चालू ठेवतो. कधी एकदा पहिला आंबा घरी येईल इथपासून कधी एकदा आंबामुक्त घर होईल, इथपर्यंतचा प्रवास दमवणारा, पण मजेदार असतो. त्या निमित्ताने बरेच लोकं घरी येतात. नवीन ओळखी होतात. बऱ्याच दिवसात गाठभेट न झालेले नातेवाईक-मित्र मैत्रिणी ह्यांच्या भेटी होतात, बोलणं होऊन जुनी नाती नव्याने उजळतात. घरात असे भरपूर आंबे असल्याने हात देता होतो. त्या दरम्यान घरी आलेल्या प्रत्येकाला आंबे मिळतात. मग ते गॅस सिलेंडर द्यायला आलेले दादा असोत, पोस्टमन, कुरियर /पोर्टर सर्व्हिसचे कर्मचारी किंवा अजून कोणी. रिकाम्या हाताने कोणीही जात नाही.


मग पुढचा अध्याय आंबे-विक्रीचा. ती धावपळ सुरू होते. शेतजमीन साधारण २००० सालाच्या आगेमागे घेतली, नंतर तिथे आंब्यांची कलमं लावली. ती हळूहळू मोठी झाली, तरी थोडेच आंबे येत होते. घरी खायचे, शेजारी-नातेवाईक मंडळींना वानवळा देऊन कौतुक करायचं, इतकंच घडत होतं. एकदा मार्केट यार्डच्या व्यापाऱ्यांना विकायचा प्रयत्न करून झाला होता. तिथे भाव इतका पाडून मिळाला, की शेत ते पुण्याचं मार्केट यार्ड टेम्पोचे पैसे आणि वर चणे-फुटाणे खाता येतील इतकेच पैसे हातात पडले. २०१९ साली आंबे विकायचं काम अनपेक्षितरीत्या अंगावर पडलं. विक्रीचा अजिबातच अनुभव नसल्यामुळे गांगरायला झालं होतं. मग पन्नास रुपयांना एक डझन आंबे विकून आम्ही ते काम पार पाडलं. त्या जरा वेगळ्या, गमतीदार अनुभवातून घरून विक्री करता येईल, हे शिकलो.

नंतरच्या वर्षी म्हणजे २०२० साली कोविड महामारीने सगळ्यांना घरात कोंडलं. कोणाला घरी आंबे घ्यायला या, असं म्हणणं अशक्य होतं. जवळपास राहणारे घरी आले, की इमारतीच्या गेटजवळ आंबे देता येत होते. पण लांबच्या लोकांना मी नेऊन देऊ लागले. तेव्हा कोणाच्या घरी जायची परिस्थिती नव्हती. त्यामुळे काम तसं सोपं होतं. अमेझॉन डिलिव्हरी होते, तसं काम केलं. कोविडचे सुन्न दिवस होते. त्यात नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळाचा फटका बसून काढायला आलेले आंबे पडले होते. त्यामुळे आंबेही फार नव्हते आणि आमची विक्री व्यवस्थाही रुळलेली नव्हती. त्यामुळे ‘आमच्या अपार्टमेंटचं गेट किंवा तुमचं गेट’ ह्या तत्त्वावर काम झालं. २०२१ मध्येही साधारणपणे असंच झालं.


२०२२ मध्ये मात्र अक्षरशः आंब्यांचा पूर आला. शेतावर आंब्याची झाडं शंभरापेक्षा जास्त आहेत. त्या वर्षी फळ नाही, असं एकही झाड नव्हतं. प्रत्येक झाड आधी पिवळ्या धमक मोहराने नटलं आणि मग फळांची श्रीमंती मिरवू लागलं. बंपर उत्पादनाचा आनंद झाला. पण त्याच्या विक्रीची व्यवस्थाही गरजेची झाली. नैसर्गिक उत्पादन घेणारे शेतकरी आणि तशी उत्पादने विकत घेण्याची इच्छा असलेले ग्राहक ह्यांची उत्तम साखळी पुण्यात काही ठिकाणी तयार झाली आहे. तिथे चांगली विक्री होते आणि दरही चांगला मिळतो. नैसर्गिक शेती, तिथल्या उत्पादनांचं महत्त्व जाणणारे समविचारी लोक भेटतात तो बोनस! २०२२ साली जर ह्या ग्रुपवर विक्री झाली नसती, तर काही खरं नव्हतं. अशा ग्रुपवर, वैयक्तिक संपर्कांतून आंबे विक्री करत होतो, तरीही पुष्कळ आंबे शिल्लक होते. माझं माहेर कल्याण. तिथे मित्र-मैत्रिणी, इतर संपर्कांतली मंडळी, नातेवाईक पुष्कळ आहेत. पन्नास किलो आंबे विकले गेले, तर ब्रेक-इव्हन होईल, असा हिशोब केला. थोड्या मित्रांना, ओळखीच्या मंडळींना ‘आम्ही येतोय’ ही बातमी पसरवण्याची जबाबदारी दिली. जवळपास १००-१२० किलो आंबे कारमध्ये लोड करून भल्या पहाटे निघालो. कल्याणच्या एका जिवलग मित्राच्या घरी बस्तान मांडायचं, असं ठरलं होतं. तिथे पोचून आंब्याचे क्रेट उतरवतोय तोवर एक मित्र आला. तो पॉवर लिफ्टिंग करतो आणि बँकेत नोकरीही. त्यामुळे त्याने त्वरित सूत्र हातात घेतली. क्रेट भराभर उतरवून दिले. लोकांनी दिलेली कॅश मोजून घेणे हेदेखील काम वेगाने करायला लागला. शिवाय जोरदार जाहिरात ‘ती काही पुण्याची नाहीये. इथे सिद्धेश्वर आळीत राहात होती. आता शेती करतात. डोळे मिटून आंबे घ्या!’ फुल बॅटिंग चालू.. घ्यायला येणारे ९९% लोकं ओळखीचे. त्यामुळे आंबे, गप्पा आणि गाठीभेटी असा अत्यंत आनंददायक कार्यक्रम होता. ज्या अगत्यशील घरी हा सगळा पसारा मांडला होता, त्या घराला मार्केटयार्डमधल्या गाळ्याचं रूप आलं होतं. आंबे इतक्या भराभर संपले, की येताना डोंबिवलीच्या नणंदबाईंकडे द्यायला एकही आंबा उरणार नाही, ह्या भीतीने थोडे आंबे एका पिशवीत लपवून ठेवावे लागले!

चार-पाच दिवसांनी एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणं आवश्यक होतं. तोवर आंबे संपवायलाच हवे म्हणून आम्ही आंब्यांचा सेल लावला. ८० रुपये किलो. ‘आंब्यांचा सेल’ ही कल्पना सगळ्यांना मजेदार वाटत होती. एका लांब राहणाऱ्या मैत्रिणीने ‘डन्झो पिकअप’ ही नवी कल्पना त्या वर्षी माझ्या समोर आणली. अर्ध्या - पाऊण तासात आंबे पुण्याच्या दुसऱ्या टोकाला पोचलेही. आंबे नेऊन देणे, हे प्रकरण त्रासदायक व्हायला लागल्यामुळे गेल्या वर्षीपासून आम्ही एका कुरियर सेवेची मदत घ्यायला लागलो. नवे बॉक्स घेऊन उगीच कशाला कचरा वाढवा? अशा विचाराने मी शेजाऱ्यांनी आणलेले आंब्याचे बॉक्स जमवून त्यांचा पुनर्वापर करते. कुरियर / पोर्टर सर्व्हिसमुळे आंबे पुण्याच्या कान्याकोपऱ्यात पाठवू शकतो. आमच्या एका नातलगांची स्वतःची कंपनी आणि कारखाना आहे. सगळे मिळून ४०-५० लोकं कामाला आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रत्येक सहकाऱ्याला एक डझन आंबे देतात. त्यांची एक मोठी ऑर्डर असते. त्याची खूप मदत होते.


एकदा एका झाडाच्या चवीला, दर्जाला उत्तम असलेल्या आंब्यांच्या सालीला काहीतरी झालं होतं. त्या सालींना वरून डाग पडले होते. त्यामुळे ते कोणी विकत घेईना. आंबे गुणी असले, तरी रूपात कमी पडत होते. एकदा वाटलं की रस काढून ठेवावा. लागेल तसा खाता येईल. पण आंबे बरेच होते. साधारण १००-१५० असतील. इतक्या आंब्यांचा रस काढणे, तो साठवणे सगळं जिकिरीचं झालं असतं. मग एक आयडिया केली. आमच्या कामवाल्या मावशींना त्यातले थोडे आंबे सॅम्पल म्हणून दिले. दुसऱ्या दिवशी ‘आंबे छान आहेत हो चवीला. पण आता मला विकत द्या. म्हणजे मी जास्तीचे घेईन. मुलीकडे पण पाठवता येतील.’ असा अपेक्षित रिव्यू आल्यावर पन्नास रुपये किलो, असा दर सांगितला. त्यांनी स्वतः घेतले, शिवाय त्यांच्या नेटवर्कमध्येही बातमी पसरवली. संध्याकाळपर्यंत ते सगळे आंबे संपले. तेव्हापासून दरवर्षी आम्ही मावशी लोकांसाठी आंब्याचा एक लॉट ठेवतो. नेहमीच असे रूपात मार खाणारे आंबे येतात. ते अगदी स्वस्तात विकून आम्ही त्यांचा स्वाभिमान जपतो आणि फळं वाया जाण्यापासून वाचवतो. आपल्या आसपासच्या सगळ्या थरातील लोकांनी आंबे खाऊन तृप्त व्हावं, असं वाटतं.

आंब्याची कलमं आणून, मोठी होऊन ती झाडं फळं द्यायला लागल्यावर त्याच्या विक्रीसाठीची धडपड हे सगळं टप्प्याटप्प्याने शिकत गेलो. तो आलेख काही सरसर वर चढत गेला नाही. आमच्याही चुका झाल्या. धक्के बसले. पैशाचं नुकसान झालं. साधारणपणे हापूस, पायरी आंबे डझनाच्या भावाने आणि केशर, तोतापुरी किलोच्या भावाने विकतात.आम्हीही सुरवातीला तसंच करायचो. कोविडच्या दिवसात एकांना त्यांच्या घराजवळ पायरी आंबे दिले, पैसे देताना त्यांनी अर्धेच पैसे दिले. उरलेली फळं लहान होती, त्याचे पैसे देणार नाही, असं सांगितलं. वाईट तर वाटलं, पण इलाज नव्हता. त्यानंतर सर्व प्रकारचे आंबे किलोवर विकायला लागलो. मला स्वतःला किलो हे माप जास्त योग्य वाटतं. लहान-मोठे कसेही आंबे घेतले, तरी किलोच्या मापात हे सगळे एका पातळीवर येतात!


फळमाशी ह्या अत्यंत उपद्रवी कीटकांची ओळख फळशेती करणाऱ्या सगळ्यांना असते. फळाचं साल मऊ झालं, की ही माशी त्यात अंडी घालते. फळ पिकल्यावर अळ्या दिसतात. ही अशी माशीची फळं इतर फळांपेक्षा लवकर पिकतात. त्या फळांना उग्र आणि गोड गंध येतो. फळमाशीचा उपद्रव टाळण्यासाठी ट्रॅप मिळतात. त्यातल्या वडीला मादीचा अंगगंध असतो. त्याकडे नर माशी आकृष्ट होते, आणि ट्रॅपमधून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे माशांची संख्या आटोक्यात राहते. हे सगळं ज्ञान आता मिळालंय. सुरवातीला काही कल्पना नव्हती. तेव्हा एकदा असे आंबे विकले गेले. पिकलेल्या आंब्यात अळ्या निघाल्यावर कोणीही वैतागेल. ग्राहकांनी हे सांगितल्यावर आम्ही शांतपणे त्यांचे सगळे पैसे परत दिले. घरात पुष्कळ आंबे होते. हे सगळे जर असे खराब असतील, तर काय करायचं? अशी मोठी काळजी वाटली. पण साधारण १०-१५% आंबे सोडले, तर बाकीचे चांगले होते. सांगायला आनंद वाटतो, की ज्यांचे पैसे परत दिले होते, त्यांच्यापैकी बहुतेक लोकांनी चांगल्या आंब्यांचे पैसे आम्हाला दिले. एका ग्राहकांनी दिले नाहीत. फळमाशीचे आंबे कसे ओळखायचे, हे शिकण्याची ती फी होती, असं म्हणून आम्ही ते सोडून दिले. काहीही शिकायचं, तर कुठल्यातरी स्वरूपात फी द्यावी लागतेच. कधी कष्ट, कधी पैसे, कधी शिव्या खाणे किंवा अजून काही…


आंबे विक्री चालू असताना इतकी धांदल असते, की माझं डोकं अक्षरशः कामातून जातं. ‘जी कामं असतील, ते मेसेज व्हॉट्स ऍपवर पाठव. सध्या माझ्या काही लक्षात राहणं कठीण आहे’ असं मी आई-बाबांना सांगून ठेवते. बाकीही भरपूर गोंधळ होतात. सारख्या नावांच्या ग्राहकांचे अनेक वेळा गोंधळ झाले. इथे फार सांगत नाही, नाहीतर आमचे भावी आम्र-ग्राहक घाबरून पांगतील. आंबे विक्रीच्या पहिल्या अनुभवावर आम्र-विक्री योग हा लेख लिहिला होता. पितृतुल्य असलेल्या मोठ्या दिरांनी तो लेख वाचून ‘अशीच प्रगती करा. पुण्यात ‘आंबेवाले करमरकर’ म्हणून प्रसिद्ध व्हा,’ असा आशीर्वाद दिला होता. एकदा घरामागच्या टेकडीवर फिरायला गेले असताना एकांनी ‘नमस्कार मॅडम, काय म्हणताय?’ असं विचारलं. मला ओळख पटली नाही. पण टेकडीवर नेहमी जाणारे चेहऱ्याने ओळखतात. मी ओळखलं नाही, हे लक्षात आल्यावर ‘मी आंबे घ्यायला आलो होतो तुमच्याकडे. इतके चांगले आंबे कधी खाल्लेच नव्हते’ अस म्हटल्यावर दिरांचा आशीर्वाद खरा ठरला, असं वाटलं. पुण्याच्या लहानशा भागात तरी आम्ही ‘आंबेवाले करमरकर’ झालो म्हणायला हरकत नाही. ह्या वर्षीचा आंब्यांचा हंगाम संपला. लग्नविधी झाल्यावर मुलीची पाठवणी झाली की सगळा मांडव जसा सुना होतो, तसं शेत, आंब्याची झाडं सुनी झाली आहेत. पण सृष्टीच्या चक्रावरचा प्रत्येक बिंदू कशाचीतरी सुरवात असते आणि कशाचातरी शेवटही. आंब्याची झाडं बरीच आहेत आणि उत्पन्नाच्या दृष्टीने हा हंगाम आम्हाला महत्त्वाचा असल्यामुळे तिकडे जास्त लक्ष असतं. पण आमची ही धांदल चालू असताना बाकीची झाडं काही बंद पडत नाहीत. त्यांचं आपलं काम चालूच असतं. पेरूची पानं गळून त्या झाडांचे खराटे होतात, कोवळी नाजूक पालवी फुटते. पांढरी फुलं येतात. बोराएवढे पेरू दिसायला लागतात. सगळं त्याच्या ठरलेल्या वेळी होतं. आपण आपल्या बुद्धीने ‘लवकर, उशीरा’ अशी लेबल्स लावतो, दुसरं काय?


हे सगळे उपद्व्याप करून आम्हाला काय मिळतं? पैसे मिळतात. जरी आमचा चरितार्थ शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून नसला, तरी जगायला, शेतीच्या खर्चासाठी पैसे तर लागतातच. पैशाचं सोंग काही आणता येत नाही. बाकीची फळं, भाज्या विकून जे पैसे मिळतात, त्यापेक्षा आंबे-विक्रीतून येणारं उत्पन्न जास्त असतं. त्यामुळे ह्या दिवसात खिसा भरलेला असतो! हा झाला व्यवहाराचा भाग. पण पैशात मोजता न येणाऱ्या आनंदाचं माप शिगोशीग भरलेलं असतं. पहिला मोहोर दिसण्यापासून ते शेवटचा आंबा उतरवेपर्यंत जी उत्सुकता, जी गंमत असते, ती अमूल्य असते. रीतसर शिक्षण, कामाचा अनुभव असल्यावर पोटापुरते पैसे मिळवणं तितकंही अवघड नाही. बाजारात आंबेही भरपूर मिळतात. पण मोहराचा घमघमाट, त्यावर घोंघावणाऱ्या माशांचा गुंजारव, झाडावरची करकरीत कैरी खाण्याची मजा, अक्षरशः पानापानाला आंबा असलेलं झाड बघतानाची समृद्ध भावना, ही बाजारात कशी मिळेल? शेती करताना कारखान्यात तयार होणारी खतं, कीटकनाशकं आम्ही वापरत नाही. फळांना त्यांच्या नैसर्गिक वेगाने फुलायला, वाढायला आणि पिकायला वेळ मिळतो. त्यामुळे फळांचा स्वाद, गंध, चव टिकून राहते. शेती सुरू करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश्य, आपल्याला ज्ञात असलेल्या स्रोतातून आलेलं अन्न खायला मिळावं, हा होता. असं करणं प्रत्येकाला शक्य नाही. आपल्याबरोबर बाकीच्यांनाही नैर्सगिक, विषमुक्त, प्रकृतीला चांगलं असं अन्न उपलब्ध करून देऊ शकतो, ही भावना मनाला सुखावते. आपल्या दैनंदिन आयुष्यात अनिश्चिततेचा सामना पदोपदी करावा लागतो. त्या अनिश्चिततेला तोंड देताना कसं कोलमडून जायचं नाही, हे शेतावर शिकायला मिळतं. जीव आहे, तोवर जगायचं हा झाडांचा बाणा बघताना ती जाणीव खोलवर पोचते. भरभरून मोहोर आलेल्या झाडावर कधीकधी एकच फळ लागतं . पदरात पडलं, तेवढंच आपल्या नशिबात लिहिलेलं होतं, असं समजून ‘पोटापुरता पसा’ मिळाला की त्याच्यात खूश राहायला मी ह्या ‘आंब्यांच्या दिवसात’ शिकते. देणाऱ्याचे हात खरोखरच हजारो आहेत. त्यातल्या एका कणाने माझं सामान्य आयुष्य असंच उजळून निघावं, ही प्रार्थना आहे.

जीवन ज्योती कृषी : शेतीविषयावरील लिखाण 


दिव्याखाली अंधार

https://aparnachipane.blogspot.com/2020/07/blog-post.html


आम्र-विक्री योग

https://aparnachipane.blogspot.com/2019/09/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग एक 

https://aparnachipane.blogspot.com/2020/09/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग दोन 

https://aparnachipane.blogspot.com/2020/09/2.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग तीन 

https://aparnachipane.blogspot.com/2020/10/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग चार 

https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post_21.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग पाच 

https://aparnachipane.blogspot.com/2023/11/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग सहा 

https://aparnachipane.blogspot.com/2024/02/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग सात 

https://aparnachipane.blogspot.com/2025/01/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग आठ 

https://aparnachipane.blogspot.com/2025/11/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग नऊ 

https://aparnachipane.blogspot.com/2026/07/blog-post.html



Comments

Popular posts from this blog

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ८ 'ना कुछ मेरा, ना कुछ तेरा'

जीवन ज्योती कृषी डायरी - भाग ७ धीरे धीरे रे मना.....

ज्याची त्याची वारी.....