Posts

Showing posts from July, 2020

दिव्याखालचा अंधार

पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेड्यात आमची काही शेतजमीन आहे. सुरवातीपासूनच तिथे विजेची सुविधा नव्हती. डिझेलवर चालणारा कृषीपंप आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबासाठी सौर्य कंदील अश्या सोयींवर भागत होत. पण लांबचा विचार केला, तर वीज असणं फार सोयीच होणार होत. वीज नसण्यामुळे आमच्या राहत्या घरी जेवढी भयानक अडचण झाली असती. तेवढी अडचण शेतावर होत नव्हती. शेताला आणि शेतावर राहणाऱ्या कुटुंबाला वीज नसण्याची सवय होती. गैरसोय होत होती, पण भागवता येत होते.   शहरात काय किंवा खेड्यात काय महावितरणचा कारभार बऱ्यापैकी भोंगळच आहे. अर्ज केला आणि काहीही खटपट न करता वीजजोड मिळाला, असं काही होत नाही. बरेच अर्थपूर्ण मार्ग ह्या कामासाठी चोखाळावे लागतात, असा सल्ला आम्हाला अनुभवी मंडळींनी दिला होता. खरंतर आपण अर्ज केल्यापासून वीजजोड मिळेपर्यंतच प्रत्येक कामाला किती वेळ लागायला हवा, ह्याची मानके (standards of performance) महावितरणने तयार केली आहेत. त्याप्रमाणे काम न झाल्यास ग्राहक नुकसानभरपाई मागू शकतो. ह्या संदर्भातील माहिती महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात लावलेली असणे अपेक्षीत आहे. पण दुर्दैवान