जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-४ : आमची माती, आमची शेती

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-भाग ३ वाचण्यासाठी खालील लिंक बघा


हे सगळं सुरू झालं साधारण पंधरा-सतरा वर्षांपूर्वी. तोपर्यंत आम्ही आमच्या संसारात, नोकरी-व्यवसायात बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. सर्वसाधारण कुटुंबात सुरवातीच्या ज्या गरजा असतात, त्या असतात स्वतःच्या मालकीचं घर, चारचाकी असणे. त्या पूर्ण झाल्या होत्या. महेशच्या, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून शेतजमीन घ्यायचे विचार होते. त्याच्या एका नातेवाइकांच्या अशा एका शेतावर त्याने लहानपणीच्या सुट्ट्या घालवल्या होत्या, ते मॉडेल त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्यासाठी त्याची धडपड चालू होती. पुण्याच्या आसपास काही जमिनी बघूनही आलो होतो. पण अजून गणित जुळून आलं नव्हतं. आज तशीच एक फेरी होती. त्या ठिकाणी पोचलो. शेतजमीन म्हणजे नुसतं माळरान होतं. उन्हाच्या माऱ्यामुळे सोनेरी-पिवळं पडलेलं भरपूर गवत आसपास सगळीकडे होतं. आजूबाजूला बघितलं की  लांबवर गावातल्या घरांची लाल कौलारू किंवा निळ्या पत्र्याची छपरं दिसत होती. त्याच्याही मागे पावसाळ्यातल्या धबधब्यांच्या खुणा अंगावर वागवणारे काळेभोर डोंगर. अधेमधे शेतांचे लाल मातीचे तुकडे. तुरळक झाडी. गावातल्या देवळाच्या कळसावरचा भगवा झेंडा वाऱ्यावर उडत होता. नेहमीच्या शहरी वातावरणातून अगदी वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत होतं. इथलं झगझगीत ऊन, वारा, गवताचा सूक्ष्म वास, पक्ष्यांचे आवाज सगळंच वेगळं होतं. 

साधारणपणे शहरी-पांढरपेशी लोकं जेव्हा अशी जमीन घेतात, तेव्हा फार्महाउस प्लॉटच्या योजनेतील प्लॉट घेतात. अशा ठिकाणी डांबरी रस्ते, वीज-पाणी अशा सुविधा, मुख्य प्रवेशाजवळ सुरक्षा कर्मचारी अशा सोयी असतात. प्लॉटला कुंपण घालून प्रत्येकाच्या सीमारेषा आखलेल्या असतात. ह्या जागेवर मात्र ह्यातलं काही म्हणजे काहीच नव्हतं. ही नुसती मोकळी जागा होती. नंतर बऱ्याच वेळा ‘तिकडे तुमचं फार्म हाउस आहे का’ असं कोणी विचारल्यावर मी ‘नाही. फार्म हाउस नाहीये. आमचं हौसेचं फार्म आहे’ असं सांगायचे! 

आधी इथली जवळचीच एक जमीन बघितली होती. त्या जमिनीजवळ आमच्या एका स्नेह्यांनी जमीन घेतली होती. नवीन जागी तो मोठाच आधार झाला असता. पण ह्या भागात एकतर औद्योगिक महामंडळाचं किंवा विमानतळाचं रिझर्वेशन येऊ शकतं, अशी कुणकूण कानावर आली. जरा इकडेतिकडे त्यासंदर्भात चौकशी करेपर्यंत त्या जागेचा व्यवहार होऊनही गेला. आता बघतोय ती जमीन हातची जाऊ द्यायची नाही, असा चंग महेशनी बांधला होता. 



मला मात्र ह्या सगळ्या कल्पनेबद्दल खूप साऱ्या शंका होत्या. शेती करण्याचा कुठलाही अनुभव गाठीशी नसला, तरी हे काम बाजारातून वस्तू विकत आणणे किंवा तीन तासांचा सिनेमा बघून येणे इतकं सोपं नाही, इतकं कळत होतं. शेती करायची म्हणजे सतरा भानगडी. जमिनीच्या व्यवहारात होणाऱ्या घोटाळ्यांबद्दल इकडेतिकडे वाचायला मिळतं.पुन्हा सरकारी रिझर्वेशन आलं तर सगळंच मुसळ केरात जायचं. महेशची नोकरी, त्याचे सततचे देशी-परदेशी प्रवास असायचे. मी नुकतीच आर्किटेक्ट म्हणून स्वतंत्र कामं घ्यायला लागले होते. त्यामुळे सगळे दिवस कामाचेच. ज्या दिवशी क्लाएंटना सुट्टी, ते खूप कामाचे दिवस. घरी शाळकरी मुलगा आणि वृद्धत्वाकडे झुकणारे सासू-सासरे. ह्या सगळ्या चौकटीत शेतीत जो वेळ, कष्ट आणि पैसे ओतावे लागलात, ते कसं बसवायचं? एक ना दोन अनेक शंका आणि प्रश्न डोक्यात घिरट्या घालत होते.

आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या बऱ्याच जणांचे आजे-पणजे शेती करणारे होते. हळूहळू शेतीतल्या बेभरवशाच्या उत्पन्नावर मोठ्या कुटुंबाचं पोट भरणं, त्यांच्या प्राथमिक गरजा भागणं कठीण होत गेलं. तेव्हाच्या शेतीयंत्रे नसलेल्या काळात घरातली माणसं हेच मुख्य भांडवल होतं. घरचे लहानथोर तिथे राबत असत. पण लहरी निसर्ग, वाढती महागाई आणि सतत पडणारे शेतमालाचे भाव ह्यामुळे उत्पन्नाचं गणित जुळेनासं झालं. त्यापेक्षा शिक्षण घेऊन रोख पैसा देणारी नोकरी शहरात मिळाली, तर शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना आधार होतो आणि शेतीवरचा भार कमी होतो, हे लक्षात आल्यावर कुटुंबातल्या काही सदस्यांनी शहराची वाट धरली. पुढे बदललेली राजकीय-सामाजिक परिस्थिती, जमिनीच्या विषयातले नवे कायदे ह्यामुळे तर ‘शेती कनिष्ठ आणि उत्तम नोकरी’ हेच ब्रीदवाक्य झालं. 


मग ह्या भानगडीत आपण कशाला पडायचं? असं वाटत होतं. पण हो-नाही करत आम्ही ती जमीन घेतली. हळूहळू करत जागेला कुंपण घातलं, बरीच खटपट करून वीज मिळवली. पुष्कळ फळझाडं लावली. तिथे राहणाऱ्या कुटुंबासाठी खोली, पाणी साठवायला टाकी असं बस्तान बसलं. ह्यात माझा सहभाग नगण्य होता. महेश दर शनिवारी न चुकता, न कंटाळता तिथे जायचा आणि दिवसभर थांबून घरी परतायचा. त्यानेच कोंकणातून आंब्याची, फणसाची, काजूची झाडं आणली आणि जोपासली. गावातल्या लोकांशी चांगले संबंध तयार केले. मला मुळात आवड नव्हती आणि घरच्या तसंच व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सात दिवस कमी पडायचे. 

असं करता करता गोष्टीत म्हणतात ना, तशी खरंच वर्षांमागून वर्षं गेली. थोडी उसंत मिळाल्यावर नीट डोळे उघडून बघितलं तर आत्ताआत्ता तीनचाकी स्कूटर चालवणारा मुलगा ऐटीत मोटरसायकल फिरवायला लागला होता. मुलगा शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडला आणि घरी उरलो आम्ही दोघेच. विं.दा.करंदीकरांच्या कवितेतल्यासारखं ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते’ जगून कंटाळलो होतो. सुरवातीपासूनच महेशचं नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करायचं स्वप्न होतं. ते प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करता येईल, अशी शक्यता खुणावायला लागली होती. ह्याच दरम्यान अनपेक्षितपणे काही वर्षे परदेशी वास्तव्य झालं होतं. तिथे फिरताना अतिप्रचंड मोठी शेतं दिसायची. अगदी थोडं मनुष्यबळ असताना यंत्रांच्या मदतीने कशी शेती करत असतील, असा अचंबा वाटायचा. महेशला तर तिथल्या एखाद्या शेतावर चार-सहा महिने काम करावं असा मोह व्हायचा! त्याचं ते स्वप्न काही प्रत्यक्षात उतरलं नाही. त्या आधीच आम्ही गाशा गुंडाळून मायदेशी परत आलो. 


तिथे असताना यू-ट्यूब, इंटरनेटवर शेतीबद्दल माहिती मिळवायला सुरवात केली होती. यू-ट्यूबवर सगळ्यांच्या यशोगाथा, झालेल्या फायद्याचे मोठाले आकडे, त्यांची सुबक-सुंदर शेती बघून कौतुक वाटायचं आणि ‘हे काय सोपं आहे की असं वाटायचं. कारण कोणाच्या अपयशाच्या कथा बघायला मिळतच नाहीत.

हे सगळं बघून आम्ही अमाप प्रभावित झालो. तो प्रभाव ओसरल्यानंतर अगदी मूलभूत प्रश्नांना हात घातला. आपल्याला शेती करायची आहे, म्हणजे नक्की काय करायचं आहे? गाण्यात जशी घराणी आहेत, तशीच शेतीतही आहेत. भाजीपाला, फुलशेती, फळबाग, औषधी वनस्पती, बांबू, ड्रॅगनफ्रूट, पॉलिहाऊस उभारून परदेशी भाज्या लावणे, सुगंधी वनस्पती असे असंख्य पर्याय आहेत. रासायनिक खतं, कीटकनाशके वापरायची नाहीत, नैसर्गिक शेती करायची ठरवलं की त्यासाठीचे पर्याय समोर येतात. गांडूळ खत, जीवामृत, पंचामृत, गोकृपामृत, वैदिक शेती एक ना दोन. असं प्रत्येक बाबतीत म्हणजे बी-बियाण्यांपासून पाणी द्यायच्या पद्धतीपर्यंत होतं. आमच्या शेताच्या आसपासचे जे पिढीजात शेतकरी आहेत, त्यांना हे प्रश्न पडत नसावेत. ते त्यांच्या मळलेल्या, ठरलेल्या वाटेने जातात. ‘युरिया मारल्याशिवाय पिकं येणार नाहीत’ ही खात्री असते. आयुष्याच्या केंद्रस्थानी शेती आणि बाकीचे जोडधंदे त्याच्या परिघावर असल्याने ‘आपण नक्की का शेती करतोय?’ असे प्रश्नही पडत नाहीत. आमच्या वाट्याला मात्र खूप सारे पर्याय आणि त्याहूनही जास्त प्रश्न होते.

आमच्या स्वभावाला जागून आम्ही सावध पर्याय निवडले. बरीच फळझाडं शेतावर होतीच. त्यासोबत भाजी लावायची ठरवली. त्यामागे असा विचार होता की भाजीपाल्याचं जीवन चक्र कमी दिवसांचं असतं. म्हणजे पालेभाजी लावली तर वीस-पंचवीस दिवसात भाजीची सुरवात होते. वेलभाज्या-फळभाज्या महिन्या-दीड महिन्यात येऊ लागतात. शेतावर गाई बैल आधीपासूनच होते. त्यामुळे गोमूत्र-शेणावर आधारित खतं वापरायचं ठरवलं. कारण कुठलेही पर्याय वापरायचे की नवीन काहीतरी विकत घ्यायला लागतंच. शेती हा तसा फार महागडा छंद आहे. बी-बियाणे, अवजारं, खतं, मजुरी सगळ्याला रोख पैसा मोजावा लागतो. पैसा हातात किती येईल ह्याची मात्र अजिबातच खात्री नसते. 


विचारविमर्ष, चर्चा-चर्विचरण झालं आणि आम्ही चक्क शेती करायला लागलो! ही बातमी जशी पसरली, तशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. शहरातील लोकांच्या थोड्या गंमतीच्या, चेष्टेच्या. खेड्यातल्या लोकांच्या अविश्वासाच्या. ‘तू मग टोपलीत धन्यांसाठी जेवण घेऊन बिगीबिगी जातेस की नाही’ ह्या प्रश्नाने तर एव्हाना शतक पूर्ण केलं असेल! चांगली असलेली नोकरी सोडून हे असलं कोणी करू शकेल, ही कल्पना काही जणांना वेडेपणाची वाटायची. पण बहुतेकांना मातीत हात घालून काम करणे, आपल्या डोळ्यासमोर झाडं वाढताना बघणे ह्याचं आकर्षण वाटतंच. त्यांना हे सगळं फार रोमांचकारक वाटायचं. मध्यंतरी काही वर्षे परदेशात राहिल्यामुळे शेतावरच्या आमच्या मदतनिसाला आता काही आम्ही परत येणार नाही, अशी खात्री झाली असावी. त्यामुळे त्याला आम्ही परदेश सोडून कायमचे परत आलो आणि आता शेतीत लक्ष घालणार, ही कल्पना अजिबातच आवडली नाही. ‘तुम्हाला कुठलं जमतंय शिकलेल्या लोकांना’ असं पालुपद त्याने बरेच दिवस ऐकवलं. आम्ही तरीही येत राहिलो म्हटल्यावर त्याची गाडी पुन्हा रुळांवर आली.

अगदी सुरवातीला मी शेतावर गेले की महेशच्या मागे फिरायचं. झाडांचं कौतुक करायचं आणि परत घरी. संपला विषय. पण हे नवलाईचे दिवस ओसरले. हळूहळू मी शेतीत रमायला लागले. शहरापेक्षा बघायला मिळत नाहीत असे निसर्गाचे विभ्रम शेतात बघायला मिळतात. कालपर्यंत निष्पर्ण, ओक्याबोक्या दिसणाऱ्या झाडाला अचानक कोवळी, चकचकीत, तजेलदार नवीन पानं दिसायला लागतात. झाडं फुलांनी-फळांनी भरून जातात. वेगवेगळ्या फुला-फळांकडे वेगवेगळे पक्षी येतात. तुम्ही काही करा किंवा करू नका. हे चक्र चालूच असतं.

नोकरी-व्यवसायात असतानाही निसर्गाच्या लहरीचा फटका बसतो. पण त्यामुळे आपल्या उत्पन्नावर त्यामानाने कमी परिणाम होतो. शेती करताना मात्र निसर्ग मित्रही असतो आणि शत्रूही. उदाहरणच द्यायचं झालं तर आंब्याच्या झाडांवर तुरळक मोहोर दिसायला लागला आहे. ह्या भागात आंबे हातात यायला जूनचा पहिला आठवडा उजाडतो. म्हणजे अजून पाच-साडेपाच महिने बाकी आहेत. तोपर्यंत पाऊस, थंडी, ढगाळ हवा, वादळ ह्यातलं काहीही होऊ शकतं आणि बहुतेक वेळा काहीतरी होतंच. त्यातून वाचेल, ते आपलं म्हणायचं. आम्ही तांदूळ लावला नव्हता. पण आसपासच्या शेतातला अगदी कापणीला आलेला तांदूळ अतिवृष्टीने आडवा झाला. मलाच इतकी हळहळ वाटली. पण त्या शेतकऱ्यांनी पाऊस ओसरल्यावर शांतपणे जो तांदूळ वाचला होता, त्याची कापणी आणि इतर प्रक्रिया करून घरी नेला. ही अनिश्चितता त्यांनी आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारली आहे. मला अजून ते जमलं नाही. काही झाडांचं-पिकांचं नुकसान झालं की हळहळायला होतं. निसर्गाची लहर अपरिहार्य आहे, हे अजून झिरपलं नाहीये.

शेती करायला लागल्यावर आधीच्या अनुभवात नसलेल्या अनेक स्पर्श-गंधांशी ओळख होऊन माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या. प्रत्येक झाडाच्या पानांचा पोत खूप वेगवेगळा असतो. दुधी भोपळ्याच्या वेलाची पानं अगदी मऊ-मुलायम असतात. सुखाने डोळे मिटून गालावर फिरवत राहावी, अशी. काकडीची मात्र चरचरीत काटेरी. तिथे फार काम करायचं असेल, तर हातमोजे घातलेले बरे. नाहीतर हातात कुसळ जाऊ शकतं. कारल्याच्या वेलाची नाजूक, देखणी पानं असतात. कारल्याच्या वेलाला इतकी दाट पानं असतात, की चांगला वाढलेला वेल असेल, तर समोर हिरवी भिंत उभी असल्यासारखं वाटतं. गिलकी (घोसाळी) पानांमागे लपतात. नीट लक्ष देऊन बघितलं नाही, तर दोनेक आठवड्यात चांगलीच मोठठी वाढून जून होतात. मग ‘राहूदे आता बियांसाठी’ असं आम्ही आमचं समाधान करून घेतो. अशी पैलवान झालेली बरीच गिलकी आमच्या शेतात दिसतील. दोडक्याचा वेल त्यातल्या त्यात सोपा. पानं मोठी पण विरळ. दोडकी लपून बसत नाहीत. सहज दिसतात आणि तोडताही येतात. 

तिथली गंधांची दुनिया तर अजून वेगळी आहे. शेताचा भाग इंद्रायणी तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे तजेलदार हिरवी भाताची खाचरं चमकताना दिसायची. कारमधून उतरल्याक्षणी भाताच्या सुवासाचे लोट अंगावर येत असत. कारल्याच्या वेलापाशी काम करताना अगदी कडसर पण हवाहवासा वास येतो. त्या कारल्याची भाजी करतानाही मला तो वास आठवतो. टोमॅटोच्या झाडांजवळ काहीसा उग्र, जंगली वास येतो. ऋतू बदलले, तसा आता काजूच्या, आंब्याच्या झाडांवर मोहर दिसायला लागला आहे. अजून थोड्याच दिवसात त्याचा घमघमाट येऊ लागेल. काजूचा काहीसा मादक वास असतो तर आंब्याचा मोहक. पण दोन्ही इतके छान असतात की काहीच काम न करता त्या झाडाखाली थांबून वास घेत बसून राहावं असं वाटतं. ह्याच्या व्यतिरिक्त गोठ्यातला वास, उन्हाने तापलेल्या जमिनीचा वासही आसपास रेंगाळतात. पहिल्या पावसाचा मृद्गंध आपल्या ओळखीचा असतोच. 

नियमित जायला लागल्यावर तिथल्या लोकांच्या जगण्याकडे लक्ष जायला लागलं. खेडं असलं तरी शहरापासून जवळ आहे. गावातली काही तरुण मंडळी एम.आय.डी.सी.मध्ये, पॉलिहाऊसमध्ये नोकऱ्या करतात. टेम्पो किंवा प्रवासी वाहनांचा व्यवसाय करणारे आहेत. तिथे बारावीपर्यंत शाळा आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत पक्का रस्ता आहे. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. तरुण मुलं ‘पबजी’ खेळत असतात! तिथल्या बहुतेक बायका साडी नेसतात. क्वचित नऊवारी, जास्ती करून पाचवारी. तरुण मुली मात्र आधुनिक कपडे घालतात. पुरुष मंडळी पायजमा-शर्ट आणि तरुण मुलं जीन्स-टी शर्ट. मुला-मुलींच्या केशरचना आणि एकंदर राहणी शहरी म्हणता येईल अशी. एक-दोन पिढ्यांमागे शहरातल्या आणि खेड्यातल्या लोकांच्या कपड्यांमध्ये ठळक फरक दिसायचा. तो आता नाहीसा झाला. मुलांची नावं, करमणुकीची साधनंही सारखी झाली. फरक आहे तो पायाभूत सोयींमध्ये. पुण्यात जेवढ्या वेळा वीज खंडीत होते, त्या तुलनेत तिथे वीज नसण्याचं प्रमाण प्रचंड आहे. निसर्ग वादळ येऊन तिथे दाणादाण करून गेलं. त्यानंतर तिथे आठवडाभर वीज नव्हती. वीज, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र, कचरा व्यवस्थापनाची आश्वासनं देत कितीतरी सरकारं आली आणि गेली. पण ती  परिस्थिती काही सुधारली नाही. 

मी शेतावर जायला लागले तेव्हा सलवार-कमीज-ओढणी ह्या वेषात जात होते. आपला शहरीपण लपवता येत नाही. पण निदान त्याचं प्रदर्शन नको, असं वाटत होतं. पण काम करताना जरा त्रासदायक व्हायला लागले. आता मी चिखल-मातीत वावरताना सुटसुटीत कपडे बरे, म्हणून मी जीन्स आणि लांब हाताचा टॉप घालते. पायात बूट आणि डोक्यावर टोपी. शाळेत असताना जसा रोजचा एकच गणवेश असायचा, तसे हेच कपडे नेहमी घालते.

एकदा गावातल्या एक आजी आमच्या मदतनिसाकडे आल्या होत्या. आम्ही तिथेच झाडाखाली बघुनी सावली जेवत बसलो होतो. त्या आजी येऊन एकदम तोडक्या-मोडक्या हिंदीतच बोलायला लागल्या. मला आश्चर्यच वाटलं. आमची मदतनीस मंडळी आपापसात हिंदी बोलतात. म्हणून ह्या आजीही बोलत असतील, असं वाटलं. नंतर मी महेशला काहीतरी सांगायला लागल्यावर त्या एकदम म्हणाल्या,’मराठी चांगलं बोलताय की तुम्ही!’ मला काही क्षण कळलंच नाही. मग मी भानावर येऊन म्हटलं,’अहो मी मराठीच आहे. मराठी शाळेत शिकले. घरीदारी मराठीच बोलतो’ तर त्या म्हणाल्या ‘मला आपलं वाटलं तुम्ही सिटीतली लोकं. मराठी येत का कसं!!!’ (आता घरी तो आवडता विनोद झालाय. काही जरा जड बोललं की आम्ही एकमेकांना म्हणतो,’सिटीतले असून मराठी चांगलं बोलताय की साहेब/मॅडम’) तिथल्या बायकांशी ओळख वाढल्यावर हळूहळू प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ‘माहेर कुठलं? भाऊ किती? वडिलांची शेती आहे का? सासरी कोणकोण आहे? साहेब एकटेच? भाऊ नाही? मुलं किती? एकटाच मुलगा? पुण्याला बंगल्यात राहता का? स्वैपाक करता का? काय जेवता? किती शिकल्या? नोकरी करता का?’ असे बरेच. मी जमतील तशी उत्तरं देतेही. पण ‘मराठी येतं का?’ ह्या प्रश्नाला पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला आहे. 

आता आठवड्यातून दोन वेळा शेतावर जाऊन कष्ट करायच्या रूटीनला मी चांगलीच सरावले आहे. महेश तर रोजच जातो. रात्री जेवतानाच्या आमच्या गप्पा बऱ्याच वेळा आज शेतावर काय झालं, काय अडचणी आल्या, काय करायला हवं ह्याभोवती फिरतात. शेतावर गेले की भाजी/ फळं तोडणे, त्याची वर्गवारी करणे हे काम माझं असतं. त्याशिवाय शेती हे सतत चालणारं चक्र असल्याने बियांची पेरणी करणे, वेलांना आधार देऊन मांडवावर चढवणे, तण काढणे ही कामंही असतात. ज्या दिवशी मी घरी असते, त्या दिवशी आलेली भाज्या-फळे विकणे, बियाणं किंवा तत्सम गोष्टी आणणे ही कामं असतात. 

बियाण्यांविषयी एक गोष्ट सांगावीशी वाटते. शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या योजनांबद्दल आपण नेहमीच वाचतो, बघतो. पण प्रत्यक्षात मात्र त्या योजनांचा फायदा मिळवणं अतिशय अवघड असतं, हे शेती करायला लागल्यावर समजलं. उत्तम प्रतीचं बियाणं हा तर शेती व्यवसायाचा पाया. त्यासंदर्भात संशोधन व विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाबीज आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय बीज अनुसंधान अशी महामंडळं स्थापन केलेली आहेत. दोन्हीची कार्यालये पुण्यात आहेत. त्यांच्याकडचं बियाणं सवलतीत मिळतात. खाजगी कंपन्यांच्या बियाण्यापेक्षा बरीच स्वस्त असतात. पण वाईट भाग असा की त्यांच्याकडून बियाणं मिळवणं जवळजवळ अशक्यच असतं. मला जे बियाणं हवं होतं त्या संदर्भात मी महाबीजकडे फेऱ्या मारल्या. पत्रव्यवहारही केला. त्यांच्या उत्तराप्रमाणे त्यांनी नेमलेल्या वितरकाकडे बियाणं मिळायला हवं. वितरकांना विचारलं की एकतर मुदत संपत आलेलं बियाणं मिळतं किंवा मिळतच नाही. तांदूळ लावायचे दिवस संपलेले असतात पण बियाणं तेच उपलब्ध असतं. शेवटी त्यांचा नाद सोडून आपण खाजगी कंपनीचं बियाणं घेतो. कारण शेतीत वेळापत्रक सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. वेळ गेली की नंतर काही उपयोग नाही.

‘राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं’ तर दाद कोणाकडे मागायची, अशी म्हण आपण ऐकलेली असते. ह्याचा प्रत्यय शेतकऱ्याला सतत येत असतो. मला कधीकधी वाटतं की कंटाळून सगळ्यांनीच जर शेती करणं बंद केलं तर काय होईल? शेतकऱ्याच्या स्वतःच्या कुटुंबाला असं किती धान्य लागत असेल? ‘नकोच ती कटकट. बियाणं मिळवा, खतासाठी रांगा लावा, पावसाची वाट बघा. सगळं करून पीक हाती लागलं की भाव पडतात. त्यापेक्षा स्वतःपुरेसं लावावं आणि शांत बसावं’ असं जर शेतकऱ्याने ठरवलं तर आपल्याला खायला कसं मिळेल? 

मी पुण्यात राहते. सरकारी ऑफिसमध्ये उभं राहून (कारण बसायला कोणी सांगतही नाही) बोलण्याची मला भीती वाटत नाही. ही धावपळ करण्यासाठी लागणारा वेळ,साधनं माझ्याकडे आहे. पण आमच्या शेताला लागून शेत असलेला सदू बबन चव्हाण हे करू शकणार आहे का? त्याला हातातली कामं टाकून स्वस्त बियाण्यासाठी खेपा मारणं परवडेल का? नाही. तो नाईलाजाने महाग बियाणं घेतो. पण अशा असंख्य सदू बबन चव्हाणांना स्वस्त, निरोगी आणि चांगलं उत्पन्न मिळेल असं बियाणं उपलब्ध व्हावं हाच तर महाबीजचा उद्देश आहे. राष्ट्रीय बीज अनुसंधानाचं तर बोधवाक्य ‘राष्ट्रीय बीजका वादा, फसल अच्छी फायदा जादा’ असं काहीतरी आहे. ‘फायदा जादा’ हे अगदी खरं आहे. पण तो नक्की कोणाला होणं अपेक्षित आहे, आणि प्रत्यक्षात कोणाला होतो, हा जरा गडबडीचा विषय आहे.



अशा सगळ्या अडचणींसकट आमचं शेत आता माझं लाडकं झालं आहे. मी सुरवातीलाच म्हटलं आहे की मला स्वतःला शेतीची विशेष आवड नव्हती. मग असं काय झालं की मी शेतीत रमले आणि काय शिकले? कारण तसं काही फार मोठं नाही. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मी माझी हातातली कामं संपवून काही काळासाठी परदेशात गेले. परत आल्यावर आता हळूहळू पुन्हा सुरवात करावी, असं ठरवेपर्यंत कोरोनाचं तांडव सगळीकडे सुरू झालं. घराबाहेर पडता येत नाही, कोणाला भेटता येत नाही, अशी भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आली. काही दिवसांनंतर शेतावर जायला परवानगी मिळाली. तोवर घरात बसून मी पुरेशी कंटाळले होते. ‘चला, शेतावर तरी जाऊया’ अशा विचाराने जायला लागले. गेल्यावर नुसतं काय बसायचं? म्हणून कामं करायला लागले आणि हळूहळू त्यात रमत गेले. मी पहिल्यापासून शहरात राहिले. टोमॅटो आणि वांग्याचं रोप मला ओळखता येत नव्हतं. कुठल्या भाजीचे वेल असतात आणि कुठल्या भाजीची झुडपं हेही मला ठाऊक नव्हतं. आता दोन नवजात पानं मिरवणारं रोप बघून ते कशाचं असेल, हा माझा अंदाज बहुतेक वेळा बरोबर येतो, तेव्हा माझी मलाच गंमत वाटते! 

मला कॉलेजला असल्यापासून ट्रेकिंगची आवड आहे. शक्य होईल तेव्हा पायात बूट आणि पाठीला पिशवी लावून निसर्गाच्या कुशीतल्या त्या चाकोरीबाहेरच्या वाटा तुडवण्यासारखं सुख नाही. पण आता ह्या ‘न्यू नॉर्मल’ जगात ते डोंगर दुरूनच साजरे करावे लागतील की काय? अशी काळजी वाटते. शेतावर गेल्यावर ती तहान बऱ्यापैकी भागते. अजून काही वर्षांनी शारीरिक क्षमता कमी झाली आणि डोंगरवाटा दुरावल्या तरी शेतावर येता येईल, अशी आशा वाटते.

मला शिकत असल्यापासून कधी एकदा नोकरी/ व्यवसाय करून पैसे मिळवेन अशी घाई झाली होती. खरंतर स्वतः पैसे मिळवले तरच शिकता येईल, अशी काही परिस्थिती नव्हती. आई-वडील ती सगळी बाजू सांभाळून आणि वर हौसमौज करत होते. पण आपली माझीच आवड. त्यामुळे काय झालं की पैसे मिळवले म्हणजेच आपण काम करतोय, अशी काहीतरी समजूत माझ्या डोक्यात पक्की झाली. आता आम्ही नवीन नवीन सुरू केलेल्या शेतीत पैशात फायदा होत नाही, इतक्यात होणारही नाहीये. मग हे आपण का करतोय? हा भातुकलीचा खेळ खेळावा तसं करतोय का? असे विचार कधीकधी मनात येतात. 


पण एका दाण्याचे शंभर दाणे होताना बघणं अतिशय आनंददायक असतं. एक बी पेरली, रुजली की तिच्यापासून शेकडो फळं तयार होतात. तितक्या फळांना निर्माण करायची शक्ती त्या इवलुश्या बीमध्ये असते, ही निसर्गाची किमया अक्षरशः अवाक करते. जोवर त्या बीला योग्य वातावरण मिळत नाही, तोवर ही जिगीषा सुप्त अवस्थेत असते. जमिनीच्या गर्भात जाऊन ओलावा मिळाला की सृजनाची प्रक्रिया सुरू होते. हे सगळं आश्चर्य बघताना माझ्या मनाभोवतीचा ‘पैसे मिळवणे’ ह्या विचाराचा घट्ट वेढा सैलावला. पैसे मिळवणे म्हणजेच काम करणे आणि पैसे ज्या प्रमाणात मिळतात त्याच प्रमाणात आनंद-समाधान मिळतं, ही माझी गृहीतकं बदलली. आता त्या पलीकडे जाऊन मी आनंद मिळवायला लागले आहे. 

पलीकडचं गवत सगळ्यांनाच हिरवं वाटतं. मलाही वाटतं. शेतात काम करायला लागल्यापासून मात्र आपण कष्टाने जोपासलेलं तितकंसं हिरवं नसलेलं गवतही अतिशय  देखणं वाटायला लागलं आहे.

(अनुभव मासिकाच्या जानेवारी २०२१ च्या अंकात पूर्वप्रकाशित)


Comments

  1. खूप सुंदर,👌👌फोटो बघून लगेच जाण्याची इच्छा झाली

    ReplyDelete
  2. वा , खूपच छान लिहिलंय ,अपर्णा . क्या बात 👌

    ReplyDelete
  3. khupach chhan lihila aahes Aparna👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान लिहीलय. तुमचा शेतीचा विचार मग तो प्रत्यक्षात आणताना येणाऱ्या अडचणी त्यावर मात करत करत शिकणे आणि अनुभव संपन होणे. आतापर्यंत परिस्थितीत आलेली स्थित्यंतरे. छान मांडलीहेत. निसर्गाबद्दल असणारे प्रेम आणि 'एका दाण्याचे लाखो दाणे किंवा एका बी पासून शेकडो झाडे निर्माण करण्याच्या त्याच्या सृजनशीलते बद्दल ची कृतज्ञता तू छान व्यक्त केली आहे. काही चपखल टिपण्ण्यानी वर्तमानातील प्रवृत्ती वर प्रकाश टाकणे, व काही मार्मिक शेरे गरजेचे आणि योग्यच. एकंदरीत काय.., "शिटी तले असून झाक लिहीताय की तुम्ही!"

    ReplyDelete
  5. मस्त! एकदा यायचंय शेतावर असं म्हणतेच पण आज फोटो बघून तर लगेच उठून चालायला लागावं वाटलं.

    ReplyDelete
  6. Aparna tai khup sunder lihilay.
    Agadi marmik Anubhav.
    Mla tumchya shetatil kairi, belphal, awala, phanas khup khup awadlet.

    ReplyDelete
    Replies
    1. पूजाताई, अजून आमचे चुकत-माकत प्रयोग चालू आहेत. तुमचं पाठबळ आहे, हे बघून छान वाटलं

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५