Posts

Showing posts from August, 2020

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी- १

Image
  पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.  हे सगळं रमणीय आहे. गडबड होते ती चिखलात चालावं लागतं तेव्हा! आत्तापर्यंत पाऊस झाला, ते पाणी जमिनीत  मुरलं. आता मातीची तहान भागली. त्यामुळे चिखल भरपूर झालाय. घसरून पडायच्या भीतीने डायनोसॉर चालत असतील, तसं सावकाश आणि पाय दाबत दाबत चालावं लागतंय. काळजी घेऊन लाडाने वाढवलेल्या झाडांपेक्षा नेहमीच गवत आणि तण जोमाने वाढतं. शेतावरच्या सगळ्या मोकळ्या जागा गवत आणि तणाने व्यापल्या आहेत.  आज गेल्या-गेल्या स्वागताला आली ती माऊची दोन देखणी गोजिरवाणी पिल्लं. ही बाळं आता दोन आठवड्याची झाल्यामुळे इकडेतिकडे भटकायला लागली आहेत. आमची तितकी ओळख नसल्यामुळे चाहूल लागली की पळून जातात आणि त्यांच्या सुरक्षित कोपऱ्यात बसून टुकूटुकू बघत बसतात. आत्ता शेतावर काकडी, दोडकी, दुधी भोपळा, कारली अशा वेलभाज्या आहेत. शिवाय भुईमूग, तूर-मूग-उडीद आहे. हळदही आहे