Posts

Showing posts from October, 2020

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-३

Image
  ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा  जीवनज्योती कृषी डायरी - २           https://aparnachipane.blogspot.com/2020/09/2.html एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था   मोट , बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल , असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती.   बाकी सगळ्या गोष्टींसारखं हेही चित्र बदललं. उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणं आलं. कारखान्यात तयार होणारी खताची पोती ‘’ उज्ज्वल , सुफल ’’ पिकांची स्वप्ने दाखवू लागली. पाणीपुरवठ्यासाठी पंप आले. भरपूर आलेल्या पिकाने आपल्यासारख्या खूप लोकसंख्या असलेल्या देशाची भूक भागली. एकेकाळी दुष्काळात बाहेरच्या देशातून धान्य आणावं लागत होतं , तिथे आता कोठारं भरून वाहू लागली