Posts

Showing posts from May, 2021

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-४ : आमची माती, आमची शेती

Image
जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-भाग ३ वाचण्यासाठी खालील लिंक बघा https://aparnachipane.blogspot.com/2020/10/blog-post.html हे सगळं सुरू झालं साधारण पंधरा-सतरा वर्षांपूर्वी. तोपर्यंत आम्ही आमच्या संसारात, नोकरी-व्यवसायात बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. सर्वसाधारण कुटुंबात सुरवातीच्या ज्या गरजा असतात, त्या असतात स्वतःच्या मालकीचं घर, चारचाकी असणे. त्या पूर्ण झाल्या होत्या. महेशच्या, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून शेतजमीन घ्यायचे विचार होते. त्याच्या एका नातेवाइकांच्या अशा एका शेतावर त्याने लहानपणीच्या सुट्ट्या घालवल्या होत्या, ते मॉडेल त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्यासाठी त्याची धडपड चालू होती. पुण्याच्या आसपास काही जमिनी बघूनही आलो होतो. पण अजून गणित जुळून आलं नव्हतं. आज तशीच एक फेरी होती. त्या ठिकाणी पोचलो. शेतजमीन म्हणजे नुसतं माळरान होतं. उन्हाच्या माऱ्यामुळे सोनेरी-पिवळं पडलेलं भरपूर गवत आसपास सगळीकडे होतं. आजूबाजूला बघितलं की  लांबवर गावातल्या घरांची लाल कौलारू किंवा निळ्या पत्र्याची छपरं दिसत होती. त्याच्याही मागे पावसाळ्यातल्या धबधब्यांच्या खुणा अंगावर वागवणारे काळेभोर

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग सातवा (अंतिम) - टेक्सास ते व्हर्जिनिया

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा   भाग सहावा : नेवाडा ते टेक्सास https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post.html १० ऑक्टॉबर २०१९ व्हिडोर टेक्सास ते सलीडेल लुईझियाना आजचा दिवस भरगच्च होता. डायव्हिंगचं अंतर साधारण अडीचशे मैल, म्हणजे आमच्या सरासरीपेक्षा जरा कमी होतं. पण दोन जागा बघायच्या होत्या. दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळापासून मुक्कामाची जागा अगदी जवळ होती. तसं नसेल तेव्हा फिरताना पुढच्या अंतराचं, संध्याकाळच्या गच्च रस्त्यांचं भान ठेवावं लागायचं. आज तसा काही प्रश्न नव्हता. निवांत फिरता येणार होतं. आमच्या ह्या ट्रीपचा मुख्य उद्देश जास्तीतजास्त राज्यांना भेट देण्याचा असल्यामुळे आम्ही कुठल्याच राज्यात फार रेंगाळलो नाही. एखाद्या राज्यात तर एकही मुक्काम झाला नाही. टेक्सास राज्यात मात्र तीन मुक्काम झाले होते. आज निघाल्यावर लगेचच टेक्सासची हद्द संपली आणि आम्ही लुईझियाना राज्यात प्रवेश केला. सुरवातीचा बराचसा रस्ता ‘जंगल झाडीत’ लपलेला होता. उंच उंच झाडी आणि वळणाचा रस्ता. मध्येच लांबवर एखादं तळंही दिसत होतं. छान वाटत होतं. हवा चांगली होती. इतक्या झाडीमुळे ऊन लागत नव

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग सहावा - नेवाडा ते टेक्सास

Image
  ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा  भाग पाचवा : वॉशिंग्टन स्टेट ते नेवाडा ०५ ऑक्टोबर २०१९ लास व्हेगस, नेवाडा ते फिनिक्स, ऍरिझोना  आहा! आजचा दिवस एकदम स्पेशल होता.  आज फिनिक्समध्ये माझ्या मैत्रिणीच्या घरी मुक्कामाला जायचं होतं. एकेकाळी आम्ही दोघी पाच मिनिटात एकमेकीच्या घरी पोचायचो. जरा जास्त वेळा पोचायचो. वह्यांची देवाणघेवाण, एखादं अजिबात येत नसलेलं आणि फार-फार महत्त्वाचं गणित विचारायला, कधी एकत्र अभ्यासाच्या नावाने, कधी नुसत्याच खुसुखुसू गप्पा मारायला, कधी त्यांच्या अंगणातल्या बकुळीची फुलं वेचायला. खरं सांगायचं तर काही कारण नसायचं आणि काही कारण लागायचंही नाही. अश्विनी आणि मी बालवर्गापासून एका वर्गात होतो ते थेट बारावीपर्यंत. नंतर मात्र आमची फाटाफूट झाली. ती फिजिओथेरपी शिकायला लागली आणि मी आर्किटेक्चर. ही कायम आपल्याबरोबर असणार हे मी इतकं गृहीत धरलं होतं की ती बरोबर नाहीये हे पचायला बराच वेळ लागला.त्यामुळेच की काय पण आम्ही आमच्या-आमच्या कॉलेजात फार रमलो नाही. कॉलेजव्यतिरिक्त करायच्या गोष्टी म्हणजे फॅशन स्ट्रीटची चक्कर, एखादा सिनेमा, अन्य काही खरेदी नेहमी