जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-2

 ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा

जीवनज्योती कृषी डायरी - १    https://aparnachipane.blogspot.com/2020/09/blog-post.html


प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता.पहाट झाली, भैरू उठला.  बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरलेअसं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्यासकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज-गाडीह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे.

पुढे मोठेपणी निरनिराळ्या सरकारीकृषी आणि बळीराजावगैरे नावं असलेल्या योजनांच्या जाहिरातीत छानशी नऊवारी साडी-दागिने घातलेली शेतकरीण आणि अक्कडबाज मिश्या असलेले शेतकरी दादा असायचे. पार्श्वभूमीला बहरलेलं शेत आणि पाइपमधून धो-धो पाणी वाहात असायचं आणि जोडप्याच्या टवटवीत हसऱ्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहात असायचा.    ह्या सगळ्या गृहपाठामुळेशेतीबहुतेक आपोआप होते. आपण फक्त नऊवारी साडी नेसून हसत-हसत फोटोसाठी उभं राहायचं असतं अशी काहीतरी कल्पना माझ्या डोक्यात तयार झाली होती..

आम्ही शेती करायला लागलो तोपर्यंत बऱ्याचशा भैरुंनी बैलांची उस्तवार करण्याऐवजी ट्रॅक्टरने शेती नांगरायला सुरवात केली होती. मला सुरवातीला हा प्रश्न पडायचा की आपल्याला करण्यासारखं, जमण्यासारखं काय काम असणार तिथे? मला ना बैल सोडता येत, ना औत धरता येत. ट्रॅक्टरही चालवता येत नाही. मग नक्की करायचं तरी काय? शेतावर जायला लागले, तेव्हा लक्षात आलं की शेती हे असं काम आहे, की जे कधीच संपत नाही. वर्षाचे तीनशे पासष्ठ दिवस चोवीस तास जरी काम केलं तरी काम शिल्लक राहातंच. इतर क्षेत्रात केला जाणारा  मनुष्य-तासांचा हिशेब इथे गैरलागू ठरतो.  


 
मागच्या आठवड्यात आम्ही केलेल्या कामाचं उदाहरण घेऊया. सध्या शेतात वेलभाज्या लावल्या आहेत. काकडी, दुधी भोपळा, दोडकी, गिलकी, कारली वगैरे. त्या वेलांसाठी बांबूचा मांडव केलेला आहे. वेल मोठे झाले, मांडवावर चढले. जमिनीलगतची जागा मोकळी झाली आहे. त्या मांडवाच्या आधारांजवळ झेंडू, टोमॅटो आणि चवळी लावायची होती. झेंडूच्या फुलांकडे कीटक आकर्षित होतात आणि बाकी पिके सुरक्षित राहतात, म्हणून झेंडू. द्विदल धान्यांच्या झाडांमुळे  जमिनीला नायट्रोजन मिळतो म्हणून चवळी. टोमॅटो पैसे बरे मिळवून द्यायची शक्यता म्हणून टोमॅटो. 

 त्या मांडवात वेल लावायच्या आधी तण जमिनीत गाडून टाकलं होतं. वेलांची रोपं मोठी झाल्यावर त्याच्या जवळचं तण हाताने काढलं. आता पाऊस आणि वेलांना दिलेलं खत ह्यामुळे तण आनंदाने वाढलं होतं. ते असं दिसत होतं. इथे रोपं कशी लावणार? मग तण काढायचं काम महेश, मी आणि आमची छोटी ताई असं तिघांनी मिळून केलं. म्हणजे दोन-सव्वा दोन महिन्यांच्या काळात तण काढायचं काम तीन वेळा करावं लागलं. त्याशिवाय त्या वेलांना, रोपांना खत-पाणी देणे, तयार भाजी तोडणे ही कामं असतातच. 


तण काढायला सुरवात करण्याआधी


पहिला टप्पा झाल्यावर


आता अजून थोडं काम झालं आहे


हे फक्त ज्या भागात काही लागवड केली आहे
, त्या भागाबद्दल झालं. एकदा लागवड केली, की ते चक्र चालू होतं. त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. तोपर्यंत कुठे बांधाची दुरुस्ती, कुठे कुंपणावर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे निर्माण झालेलं दुरुस्तीचं काम, गळायला लागलेली टाकी, तुटलेले पाईप....... एक ना दोन अनंत कामं. ह्या यादीचं वैशीष्ट्य असं की ह्यात बायका, पुरुष, मुलं, तरुण, म्हातारे सगळ्यांना करण्यासारखी कामं असतात आणि शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येकाला ती करावीच लागतात.  

लहान असताना नावडती भाजी बघून चेहरा उतरला की बाबा म्हणायचे,’पानावर बसून नाही-नको म्हणू नका. भैरू कसा आवडीने जेवला, तसं आवडीने आनंदाने जेवा!असा हा भैरू आमच्या घरी लोकप्रिय होता. असे खूप सारे भैरू आपापल्या शेतात राबतात, म्हणून आपण आवडीच्या गोष्टी खाऊ शकतो. तसंच आनंदाचं जेवण त्या भैरुंच्याही पानात पडावं, म्हणून शेतकऱ्याच्या कष्टांची जाणीव ठेवूया. नमस्कार.   


दोन महिन्याची कालवड- शुभ्रा


ताजी काकडी आणि दुधी भोपळा


ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा

जीवनज्योती कृषी डायरी - ३    https://aparnachipane.blogspot.com/2020/10/blog-post.html


Comments

  1. खुप सुंदर लेख... आणि तितकीच सुंदर शेती पण करताय.... खरंच स्व निर्मितीचा आनंदच न्यारा...

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेसाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद

      Delete
  2. Bai ekdam zakas lihilay ki. Shetavar jaaun pochalo bagha!

    ReplyDelete
  3. छान लेख. लेख आणि माल दोन्ही आवडले.

    ReplyDelete
  4. Replies
    1. Thanks Anju. Mahesh has very fond memories of Paranjpe farm at Chhindwara.

      Delete
  5. नेहमी प्रमाणेच सफाईदार लेखन. कुठेचेही तण काढायची जरुरी नाही.
    तू शेती कधीपासून करतेय ?
    आणखी लेखांच्या अपेक्षेत

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद.
      तण काढायला नको का? पण मग लावलेली झाडं त्यात लपून जातात. त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, असं वाटतं. शेती जवळपास वीस वर्षांमागे घेतली. आधी फक्त फळझाड होती. आता भाजीपालाही लावला आहे.
      ह्या विषयावर नियमित लिखाण करावं असा विचार आहे.

      Delete
    2. Hello.tumacha mobile number milel ka

      Delete
  6. खूप छान .आवडते काम व लेखन पण छान नेहमीप्रमाणे.

    ReplyDelete
  7. tumhala bhetata yeil.ka? maayboli var tumcha lekh vachun ikde aalo
    mi Subhash Sharma aani Aakash che barech video pahile aahet
    Punyapasun javalach aahe tar ekda tumchyashi charcha keli tar actual madhe pahta yeil

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. करोनाची साथ ओसरल्यावर बघूया.

      Delete
  8. khup chan... lekhan apratim.. tumhala bhetayla aavdel... maaybolichi member aahe.. aamhala sudddha ashich navyane survat karaychi aahe tumchi bhet milel ka...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५