पुष्पदरी आणि सात भटके भाग ३ : हृषीकेश ते पिपलकोटी
गेले अनेक दिवस, खरंतर काही महिने ह्या ट्रेकबद्दल काहींना काही चालू होतं. चर्चा, चौकशी, रोज नवीन कल्पना. कुठे जायचं, कुठल्या संस्थेबरोबर जायचं, कोण-कोण येणार, रिझर्वेशन्स, सामानाची तयारी, आपण घरी नसताना घर-व्यावसायिक काम सुरळीत चालू राहण्यासाठी केलेली व्यवस्था. रोजचा दिनक्रम पार पाडत असताना एकीकडे ही गुणगूण मनात चालू असायची. इतकं नियोजन, तयारी केली होती, तो ट्रेक सुरू व्हायची वेळ आली होती. आजपासून पुढचे सहा दिवस सगळी व्यवस्था संस्थेची होती. हिमालयाच्या सौंदर्याची विलक्षण अशी भुरळ पडते, पण रुद्र, गंभीर रूपाची भीतीही वाटते. आजही वाटत होती!! हा काही माझा पहिला हिमालयातला ट्रेक नव्हता. वयाच्या विशीत हिमालयातल्या पहिल्या ट्रेकला गेले होते. पण तरुण वयाचा आपला एक रुबाब - एक आत्मविश्वास असतो. शारीरिक क्षमता चांगली असते. सगळं सोपं आहे आणि आपण जगात भारी आहोत, अशी खात्री असते. ते वय, ती धाडस करण्याची ऊर्मी हे सगळं कधीच मागे पडलं होती. कुठल्या अडचणी येऊ शकतील? तब्येतीच्या, निसर्गाच्या किंवा बाकी काही असे विचार मनात घोटाळत होते. सगळ्या नकोश्या शक्यतांच्या लांबलचक याद्या डोक्यात नको असतानाही तयार होत होत्या.
हृषीकेशच्या हॉटेलमध्ये सकाळी लवकर उठून भराभर आवरताना हेच विचार डोक्यात फिरत होते. सगळे वेळेत तयार झाले आणि हॉटेलच्या लॉबीत आलो. इथून साधारण एक-दीड किलोमीटर अंतरावर ‘ट्रेक द हिमालयाज’ संस्थेचं ऑफिस होतं. सगळं सामान घेऊन रस्त्याला लागलो. रिक्षासाठी प्रयत्न केले, पण ते काही जमलं नाही. हॉटेल ते संस्थेचं ऑफिस हा रस्ता नेमका चढाचा होता. आजचा दिवस बसचा प्रवास असला, तरी उद्यापासून चाली-चाली करायची होती. त्याची पूर्वतयारी होते आहे, अशी मनाची समजूत घालून पाठीला सॅक लावली. एका खांद्याला पर्स आणि दुसऱ्या हाताने ट्रॉली बॅग खेचत चालायला लागले. आजही कावेडियांची, त्यांच्या कर्कश हॉर्नची आणि आवाजी वाहनांची सोबत होतीच. कधी सॅक खाली उतरवून दम खा, ह्या खांद्यावरची पर्स त्या खांद्यावर घे, असं करत करत ऑफिसजवळ पोचले. ‘पोचले एकदाची’ असं मनात म्हणत परत एकदा थांबले. तिथे बॅचमधले बाकी मेंबर्स, ऑर्गनायझर अशी मंडळी जमली होती. मागून एका मैत्रिणीचा ‘आलं का गं ऑफिस? किती चालायचंय अजून?’ असा प्रश्न आला. मी उत्साहाने ‘अगं, इथेच आहे. पोचलो आपण’ असं सांगितलं. आमचं हे मराठीतलं बोलणं ऐकून एक तरुण मुलगा पटकन आमच्या हातातलं सामान घ्यायला आला. आम्ही धापा टाकत जे सामान आणलं होतं, ते त्याने लीलया उचलून ऑफिसच्या दारात नेऊन ठेवलं. तो आणि त्याची बायको दोघंही आमच्याच बॅचमध्ये होते. त्वरित त्या दोघांबरोबर मैत्री करून आमच्या ग्रुपमध्ये त्यांना सामील केलं. त्यांच्या सहभागामुळे आमच्या ग्रुपचं सरासरी वय पन्नासच्या वर होतं, ते झटकन खाली आलं. आता ग्रुप पूर्ण झाल्यामुळे पात्रपरिचय करूया.
ट्रेक द हिमालयाज (TTH) ऑफिसच्या जवळ नेहमी असतो, तसाच सुदृढ गोंधळ चालू होता. ट्रेकर्स, बॅचमधल्या लोकांची यादी हातात घेऊन फिरणारे व्यवस्थेतले लोक, ऑफिस सापडत नाही म्हणून फोन करणारे भुले-बिसरे सदस्य, सामान बसच्या टपावर गेल्यावर त्यात काहीतरी महत्त्वाचं राहिलं म्हणून बॅग पुन्हा खाली उतरवण्यासाठी बाबापुता करणारे विसरभोळे वगैरे मंडळी रानोमाळ बागडत होती. काहीजणांनी थंडीसाठीची जॅकेट, चालताना आधारासाठी लागणाऱ्या काठ्या वगैरे रेंटवर मिळणाऱ्या गोष्टींचं आधीच बुकिंग करून ठेवलं होतं. ते तिथून घ्यायचं होतं. हळूहळू हे सगळं प्रकरण स्थिरावलं. ज्याला ज्या वस्तू मिळवायच्या होत्या, त्या मिळाल्या. मंडळी बसमध्ये स्थिरावली. मोशन सिक लोकांनी मानाच्या जागा पटकावला. परत एकदा हजेरी होऊन सगळे स्थानापन्न झाल्याची खात्री करून घेतली गेली, आणि आमच्या ‘गणपतीबाप्पा मोरया’ च्या गजरात बस पिपलकोटीच्या रस्त्याला लागली. हृषीकेश मागे पडलं आणि हिमालयाच्या विलक्षण अशी ओढ लावणाऱ्या रौद्रसुंदर भागात आम्ही शिरलो. शहरी आवाज, गजबज मागे पडली आणि जीव शांत झाला.
ह्याच रस्त्यांवरून २००६ सालच्या ऑगस्ट महिन्यात ह्याच ट्रेकसाठी प्रवास केला होता. तेव्हाच्या आणि आताच्या रस्त्यांच्या परिस्थितीत चांगलाच फरक पडलेला दिसत होता. तेव्हाचे रस्ते अगदी गरीबाघरचे, बिचारे, ओढगस्तीत बांधलेले वाटायचे. आता शिक्षण संपवून चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाल्यासारखे सुस्थितीत आले होते. त्यामुळे गाड्या ‘वेगे वेगे धावू अन डोंगरावर जाऊ’ हे गाणं म्हणत पुढे जात होत्या. उत्तराखंड म्हणजे देवभूमी. अद्भुत, गूढ अशी देवळं, धार्मिक स्थळं, नद्या, संगम, शिखरं, आख्यायिका, रामायण-महाभारत-पुराणामध्ये इथल्या पवित्र मानल्या गेलेल्या जागांचे आढळणारे उल्लेख असा हा भाग आहे. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गंगामाईचा उगम झाल्यानंतर तिला जागोजागी उपनद्या येऊन मिळतात. गंगोत्रीला उगम पावल्यावरची अलकनंदा पुढे धौलीगंगा (विष्णुप्रयाग), नंदाकिनी (नंदप्रयाग), पिंढारी गंगा (कर्णप्रयाग), मंदाकिनी (रुद्रप्रयाग) अशा नद्यांना कवेत घेत देवप्रयाग ह्या स्थळी तिचा भागीरथी नदीबरोबर संगम होतो, आणि तिला ‘गंगा’ हे नाव मिळतं. ज्या नदीच्या आधाराने भारतीय संस्कृतीची वाढ झाली, त्या नदीच्या काठाकाठाने आमचा प्रवास चालू होता. प्रत्येक वळणावर एक नवीन आश्चर्य वाट बघत होतं. आपली रोजची कामं, जबाबदाऱ्या, ताण-तणाव ह्याचे मनावर चढलेले थर निघून जाऊन आपण नवीन होतोय, असं वाटत होतं. हिमालयातल्या हवेत एक नवेपणा-ताजेपणा असतोच. स्वच्छ-अस्पर्श्य अशी हवा, करकरीत तेजस्वी ऊन, निळंभोर आभाळ आणि वर्षानुवर्षे ओळख असलेली, सरावाची मित्रमंडळी बरोबर होती. अगदी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ मोमेंट होती!!
छान रमणीय रस्त्यावरून जाताना अंतर जाणवत नाही. हृषीकेश ते पिपलकोटी अंतर २०० किमी पेक्षा जास्त आहे. पण त्याचा काही शीण आला नाही. कँपवर पोचलो. बसच्या टपावर ठेवल्यामुळे ज्या सामानाचा काही तास विरह झाला होता, त्या सामानाची पुन्हा भेट झाली! आमच्याबरोबर TTH (ट्रेक द हिमालयाज) ह्या संस्थेचे जे लीडर ट्रेक करणार होते, ते इथे स्वागताला हजर होते. लगेचच खोली-वाटप झालं. आम्ही सहा बायका असल्याने तिघी-तिघी एका खोलीत होतो. समीर, वैभव आणि एक गुजरातेतून आलेला तरुण डॉक्टर आमच्या समोरच्या खोलीत होते. खोल्यांमध्ये सामान आणि आम्ही स्थानापन्न होतोय न होतोय, तोच ट्रेकची राणी असलेली जोरदार शिट्टी ऐकू आली. ट्रेकला आल्यावर सगळं शिट्टीमय आयुष्य. इथे सगळ्या कँपवर राहायला खोल्या असल्याने थोडं वेगळं चित्र होतं. नाहीतर तंबूत राहताना शिट्टीच्या तालावर बेड टी ते रात्रीचा बोर्नव्हिटा असा दिनक्रम असायचा. शिट्टी ऐकल्यावर चटकन आलेले, निवांत डुलत डुलत आलेले लेट लतीफ सगळे खुर्च्या पकडून बसले. कँपची जागा अगदी देखणी होती. मागचे डोंगर, दऱ्या मावळतीच्या सोनेरी उन्हात चमकत होत्या. ट्रेक लीडर मंडळींनी आपली ओळख करून दिली आणि ट्रेकर्सनी त्यांची. मग बाकी सूचना सुरू झाल्या.
ह्या सोयी असल्या, तरी घांगरियाची समुद्रसपाटीपासूनची उंची ३०४९ मीटर (१०००० फूट) आहे. हाय अल्टीट्युड झोनमध्ये येतं. तिथल्या विरळ हवेमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. शरीराला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या येऊ शकतात. इतक्या दुर्गम भागात वैद्यकीय सोयी उपलब्ध असल्या, तरी त्या सोयींना मर्यादा असतात. अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तर त्या व्यक्तीला शक्य असल्यास हवाई मार्गाने किंवा डोलीतून खाली घांगरियापर्यंत आणावं लागतं. अशी आपत्कालीन परिस्थिती आजारी व्यक्तीला आणि व्यवस्थेतील लोकांना अवघड परिस्थितीत टाकते. ट्रेकिंगसाठी नेणाऱ्या बहुतेक सर्व संस्था मेडिकल रेकॉर्ड जमा करून घेतातच. त्याबरोबर आज आमची सर्वांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब मोजला जाणार होता. ह्याचे आकडे ठराविक पातळीच्या वर किंवा खाली असतील, तर पुढच्या ट्रेकला न जाता बेस कँपवर थांबावं लागेल, अशी सूचना आधीच मिळाली होती. आत्ता कँपलीडर मंडळींनी ह्याची उजळणी केलीच. त्यासोबत चालताना घ्यायची काळजी, हवामान कसं असू शकेल, रोजचा दिनक्रम कसा असेल, ट्रेकच्या दरम्यान पाळायची शिस्त इत्यादी माहिती दिली. बहुतेक सगळे कँपलीडर पंचविशीच्या आसपासचे होते. दर आठवड्याला आमच्यासारखे चाळीस वेगवेगळे नमुने ह्यांच्यासमोर येत असतील. त्या सगळ्यांना सौम्य आणि स्पष्ट शब्दात सूचना देणे, ट्रेकला नेणे- परत आणणे अशी जबाबदारी त्यांच्यावर असते. हवामान चांगले-वाईट रंग दाखवणार. त्या परिस्थितीपासून आजारपण, भांडणं अशी कुठलीही परिस्थिती हाताळायची तयारी असलेली, उत्तम नेतृत्वगुण असलेली ही तरुण मुलं बघताना त्यांचं कौतुक वाटत होतं.
आम्ही सातही जण पन्नाशीच्या आसपासचे होतो.”ह्या वयात” चा गलेलठ्ठ हार गळ्यात पडलेला होता. ऑक्सिजन पातळी, रक्तदाब मोजणे ह्याची काळजी वाटत होती. तरुण मंडळी घाईघाईने आणि आम्ही जरा बिचकून रांगेत उभे राहिलो. कँपलीडर एकेकाचे ऑक्सिजन / रक्तदाबाचे आकडे मोजून लिहून घेत होते. त्यांच्या सवयीचं काम नसल्यामुळे वेळ मोडत होता. ते पाहून शुभांगी आणि अहमदाबाद मधलं एक तरुण डॉक्टर जोडपं असे आमच्या बॅचमधले तीन डॉक्टर्स पुढे झाले. त्यांनी सराईतपणे काम सुरू केलं. ह्या गुजरातच्या डॉक्टरांची नावं होती यश आणि डिंपल. समीरने का कोणास ठाऊक पण त्या यशचं नामकरण ‘पार्थ’ असं सुरवातीलाच केलं. समीरकडून सारखं ‘पार्थ, पार्थ’ ऐकून आम्ही उरलेले आणि आमचं ऐकून सगळी बॅचच त्याला पार्थ म्हणायला लागली!! तो ही बिचारा ओ द्यायचा. न राहवून मी एकदा त्याला विचारल्यावर म्हणाला ‘डिंपलके भाई का नाम पार्थ है. अभी सालेसाबके नामसे कोई पुकारेगा, तो मना भी नहीं कर सकता!!’ आत्ता हे वर्णन लिहिताना माझा पुन्हा एकदा गोंधळ झाला की तो नक्की यश होता की पार्थ? मग समीर सोडून बाकीच्यांकडून खात्री करून घेतली. समीरने आता कदाचित ‘तो यश किंवा पार्थ नव्हताच’, असं ठामपणे म्हणून तिसरंच नाव सांगितलं असतं. आमची मित्रमंडळी काहीही करू शकतात.
तर माझा मेडिकलसाठी ह्या डॉ.पार्थकडे नंबर लागला. लग्नापर्यंत मुंबईत राहिल्यामुळे आणि डहाणूला राहणाऱ्या मामाकडे बऱ्याच सुट्ट्या घालवल्यामुळे मला चार पोटापुरती वाक्य गुजराती बोलता येतं. तेवढी वाक्य बोलून मी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. ‘आंटी, क्या उमर है आपकी’ त्याने सरावाचा प्रश्न केला. मी वय सांगितल्यावर ‘इस उमरमें आप ट्रेकिंग कर रहे हो, अच्छा है.’ असं त्याचा दृष्टीने कौतुकाचं आणि माझ्या दृष्टीने कंटाळ्याचं वाक्य टाकलं. एकीकडे त्याच काम चालूच होतं. सुदैवाने मी दोन्ही परीक्षा पास झाले. ‘आंटीनो बिपी अने ओक्सीजन एकदम सारू छे’ असं प्रशस्तिपत्रक देऊन त्याने कार्यक्रम संपवला. अशाच परीक्षा बाकीच्यांचाही चालू होत्या. ‘कहीं खुशी, कहीं गम’ असं वातावरण होतं. ह्या दोन्ही बाबतीत कधीही अडचण न आलेल्या लोकांनाही मानसिक दडपणामुळे म्हणा किंवा प्रवासाच्या थकव्यामुळे म्हणा अपेक्षित पातळी गाठता येत नव्हती. हा एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. इतक्या अडचणी बाजूला सारून हिमालयातील ट्रेक करायच्या हौसेने सगळे इथपर्यंत आले होते. आता इथून परत जायचं म्हणजे सगळंच मुसळ केरात. मग शुभांगीने सूत्र हातात घेतली. तिने अशा सगळ्यांना एका बाजूच्या खुर्च्यांवर शांत बसायला सांगितलं आणि तिच्या शांत, सौम्य आवाजात शरीर आणि मन शांत व्हावं ह्यासाठी ध्यान करायला सूचना द्यायला सुरवात केली. हळूहळू करत सगळे रिलॅक्स व्हायला लागले. जी तरुण मंडळी ह्या गटात नव्हती, त्यांची एकीकडे मस्ती-मजा-फोटो काढणे अशी ‘मज्जाणू लाईफ’ चालू होती. मेडिटेशन झालं. रामरक्षा म्हणून झाली. काळजीने जड झालेले जीव शांत झाले. खोलीत थोडा आराम केल्यावर रक्तदाब मोजला, तर तो योग्य मर्यादेत आलेला होता. हुश्श!! मघाशी चिंतेत असलेल्या सगळ्यांचे चेहरे उजळले. ग्रुप लीडरने सगळ्यांना चालताना घाई करू नका, फार दमल्यासारखं वाटलं, तर घोडा / हेलिकॉप्टर ह्या पर्यायांचा विचार करा. सुरक्षित परत येणं, महत्त्वाचं. चालत गेलात का? किती वेळात पोचलात? हे दुय्यम आहे हे सगळ्या बॅचला परत परत सांगितलं.
पुष्पदरी आणि सात भटके
जुलै २०२३ मध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ह्या निसर्गसौन्दर्याने नटलेल्या भागात ट्रेकिंगला गेले होते. सात मित्र-मैत्रिणींच्या सहवासातील ह्या अनुभवांचं माझ्या भाषेत केलेलं वर्णन. नक्की वाचा आणि आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.
भाग १ पूर्वतयारी
https://aparnachipane.blogspot.com/2026/08/blog-post.html
भाग २ पुणे ते हृषीकेश
https://aparnachipane.blogspot.com/2026/09/blog-post.html
भाग ३ हृषीकेश ते पिपलकोटी
https://aparnachipane.blogspot.com/2026/09/blog-post_554.html
आत्तापर्यंच्या लिखाणाच्या लिंक इथे मिळतील
https://aparnachipane.blogspot.com/2026/09/blog-post_13.html






Comments
Post a Comment