पुष्पदरी आणि सात भटके भाग १ - पूर्वतयारी !


  • दिनांक:  नक्की आठवत नाही. पण जानेवारी २०२३ च्या सुरवातीचे दिवस 

  • स्थळ:पुणे

नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं होतं. ३१ डिसेंबर आला, की नवीन वर्षात शहाण्यासारखं वागायचा संकल्प मी वर्षानुवर्षे नेमाने करते. शहाण्यासारखं वागायची व्याख्या तेवढी वयाप्रमाणे बदलत गेली. लहान असताना ‘लवकर उठायचं. नियमित अभ्यास करायचा. आई-बाबांचं सगळं ऐकायचं, दहा ओळी शुद्धलेखन, तिसापर्यंत पाढे’ असं काहीतरी. आता ‘लवकर उठायचं. नियमित व्यायाम करायचा. फिटनेसकडे लक्ष द्यायचं. वजन कमी करायचं’ असं काहीतरी. संकल्प करायचा उत्साह तीळमात्रही कमी झाला नाही आणि ते मोडायची सवयही मोडली नाही.

सालाबादप्रमाणे संकल्प केलेला आहे, पण अजून मोडला नाहीये, ह्या पॉइंटला होते. मैत्रिणींबरोबर चकाट्या पिटण्याचा आनंददायक कार्यक्रम चालू होता. ह्यातल्या बऱ्याचशा मैत्रिणी शाळेपासूनच्या आहेत. उरलेल्या त्यांच्या मैत्रिणी. त्या आता माझ्या चुलत किंवा दत्तक मैत्रिणी. गप्पांचे विषय अध्यात्मापासून आधिभौतिकापर्यंत होते. विषय कसेही वाहात होते. काहीही चालू होतं. बोलता बोलता आधी केलेल्या ट्रेकच्या गप्पा सुरू झाल्या. सह्याद्रीतले, हिमालयातले ट्रेक विशीत सुरू झाले. आता सगळ्यांच्याच वयाचं अर्धशतक उलटलं होतं. संसार मार्गाला लागले होते. बरीच वर्ष ज्या मुलांच्या मागेमागे करण्यात गेली,  ती मुलं नोकऱ्या-शिक्षण-संसारामुळे बाहेर पडली होती. सगळ्यांचे पुन्हा राजा-राणीचे संसार चालू झाले होते. कामाच्या-घरगुती जबाबदाऱ्यांच्या रेट्याने मागे पडलेल्या इच्छा डोकं वर काढत होत्या. सर्व जनतेच्या बकेट लिस्टचा लसावि ‘हिमालयातील ट्रेक’ होता. हे लक्षात आल्यावर चर्चेला नवीन धुमारे फुटले. ‘आता कुठलं जमतंय. आधीच गुडघे दुखतात माझे’ पासून ‘ come on, age is just a number’ पर्यंत विचारविनिमय सुरू झाला. निदान चौकशी तरी करूया, ह्यावर एकमत झालं.

आता हिमालयातील ट्रेक ठरवणे म्हणजे काय खायची गोष्ट नाही. त्यातून आमच्यासारखे सावध प्रकृती, मध्यमवयीन लोकं. फारशी अनिश्चितता न झेपणारे. त्यामुळे सगळी जाण्याची-येण्याची तिकिटं कन्फर्म असणे, ट्रेकमध्ये बरोबर अनुभवी गाईड, जरा सोपा ट्रेक अशा असंख्य आणि अनिवार्य अटी होत्या. एकटे प्रवास करणारे, कुठलंही रिझर्वेशन- बुकिंग न करता अनिर्बंध प्रवास आवडणारे धाडसी लोकं असतात. त्या प्रकारच्या प्रवासाची आपली एक मस्ती असेल. ती वर्णनं वाचायला आवडतात. पण तसा प्रवास आपल्याला जमणार नाही, ह्याची १००% खात्री होती. मग सर्व मैत्रिणींची मिळून एक चौकशी समिती नेमली. चौकश्या आणि चर्चा सुरू झाल्या. मग काय विचारता? माहितीचा पूर आला. हिची मैत्रीण, तिचा भाचा, अमकीचा मित्र आणि तमकीच्या ओळखीचा कुठेकुठे ट्रेकला जाऊन आले होते. ते सगळे हिरीरीने माहिती पुरवायला लागले. शिवाय इंटरनेट आहेच. मग ती माहिती एकमेकींना देता यावी, म्हणून ‘साद देती हिमशिखरे’ अशा नावाचा व्हॉट्सऍप ग्रुप केला.


निरनिराळ्या ट्रेकची माहिती घेत होतो, तरी सुरवातीपासूनच ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ कडे लक्ष जात होतं. कारणं बरीच होती. पाहिलं म्हणजे मी आणि सुजाताने हा ट्रेक आधी केलेला होता. ट्रेक करून तिला २० आणि मला १७ वर्ष झाली होती, तरी एकेकाळी त्या वाटेवर आपली पावलं उमटली आहेत, हे जरा दिलासादायक होतं. व्हॅलीच्या जवळ शीख धर्मीयांचं ‘हेमकुंड साहीब’ हे पवित्र गुरुद्वारा आहे. त्यामुळे त्या भागात यात्रेकरूंना आवश्यक अशा सोयी आहेत. सामानाची ने-आण, चालायला जमलं नाही तर घोडा, पिठठु, दंडीकंडी इतकंच काय, आता तर हेलिकॉप्टरचीही सोय आहे. राहण्यासाठी हॉटेल्स आहेत , टेंटमध्ये राहावं लागत नाही.

आमच्यापैकी मी आणि सुजातानी सोडून बाकीच्या सगळ्यांचा हिमालयातला पहिलाच ट्रेक असणार होता. त्या दृष्टीने ह्या सगळ्या सोयी असणं चांगलं, असं वाटत होतं. असं सगळं ठरतंय तोवर ह्या ट्रेकला जाताना ‘जोशीमठ’ नावाचं गाव लागतं, तिथे भूस्खलन होऊन घरं खचत आहेत, काही लोकांना संक्रमण शिबिरात हालवलं आहे, अशा बातम्या आणि भिंतीला-छपराला तडे गेलेल्या घरांचे फोटो वर्तमानपत्रात येऊ लागले. झालं. पुन्हा आमची गाडी पुन्हा पहिल्या स्टेशनला आली. मग मनाली, डेहराडून, दार्जिलिंग अशी बरीच गिरिस्थानं आणि आसपासचे ट्रेक चौकशी आणि निवड समितीसमोर आले. पण काही मनास येईना. त्याच दरम्यान सध्या भारताच्या राजधानीत केंद्र सरकार सेवेत असलेला आमचा शाळामित्र पुण्यात आला होता. त्याच्याशी गप्पा मारताना हा विषय निघाला. तर त्याने गोष्टी एकदम सोप्या केल्या. ‘आमच्या तिथल्या ऑफिसकडून माहिती काढतो आणि तुला आठ दिवसात कळवतो’ असं सांगितलं. थोड्याच दिवसात तिकडून हिरवा सिग्नल मिळाला. चला, एक निर्णय झाला. आता पुढचा टप्पा म्हणजे तारखा आणि संस्था ठरवणे.

ह्या विषयावरही भरपूर चर्चा झाली. मी बरेच ट्रेक यूथ हॉस्टलबरोबर केले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवायच्या आणि कोणत्या नाही, ह्याची लख्ख कल्पना आहे. पण त्यांच्या तारखा ऑगस्टमधल्या होत्या. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन, पाऊस, जेजुरीतली सोमवती अमावास्येची यात्रा इथपासून ते बाहेरगावी वसतिगृहात राहून शिकत असलेल्या मुलाचं सुट्टीनिमित्त घरी होणारं आगमन अशा रेंजमधल्या अडचणी सदस्यांपुढे होत्या!! ह्या सगळ्या अडचणींचा विचार करता जुलैच्या मध्यापर्यंत पुण्यात परत येणं गरजेचं होतं. पिंढरीचा ट्रेक कुमाऊँ मंडळ विकास निगमबरोबर केला होता. म्हणून तिथे जाऊन चौकशी करून आलो. पण तिथल्या दादांनी आमचा पारच हिरमोड केला. रस्ते खचतात, दरडी कोसळतात, त्यातून पावसाचे दिवस. अजिबात जाऊ नका. वगैरे ज्ञानकण आमच्या झोळीत टाकले. मग इतर खाजगी संस्थांची चौकशी केली. इतक्या सगळ्या समुद्रमंथनानंतर ‘ट्रेक द हिमालयाज’ ह्या संस्थेबरोबर जायचं नक्की झालं.


हे सगळं घडत असताना एकीकडे कोणकोण येणार, ही यादी बनवणंही चालू होतं. आता काहीही ठरवलं की पहिली पायरी नेहमी व्हॉट्सऍप ग्रुप सुरू करणे, हीच असते. प्रथेला मान म्हणून आम्हीही तसा ग्रुप आधीच केला होता. आधी आम्ही तिघी शाळेपासूनच्या मैत्रिणी आणि तिघींची एक-एक मैत्रीण अशा सहा जणी होतो. मग त्याच्यात एकीची कॉलेजवयीन कन्याही आली. आमचा कल्याणचा एक मित्र पुण्यात आला होता. त्याला भेटल्यावर गप्पांमध्ये आमच्या ट्रेकचा विषय निघाला. त्यालाही स्फूर्ती आली. मग तो आणि त्याची डॉक्टर बायको येणार असं ठरलं. नऊपैकी पाच लोकं हाडाचे कल्याणवाले असल्याने बाकीच्यांच्या कल्याणबद्दलच्या ज्ञानात नको इतकी आणि नको ती भर पडणार, हे स्पष्ट झालं.

जागा, संस्था आणि तारखा नक्की झाल्यामुळे आता आमची चर्चा स्थूलातून सूक्ष्मात आली. दिल्लीपर्यंत ट्रेन की विमान असा चॉइस होता. पण पाऊस किंवा बाकी काही कारणामुळे प्रवासच रद्द करायची वेळ आली, तर विमानाच्या तिकिटाचे जवळपास सगळेच पैसे जातील, ट्रेनचं तिकीट रद्द केलं तर थोडेतरी पैसे परत मिळतील, असा खास ममव (मराठी मध्यमवर्गीय) विचार करून ट्रेनची तिकिटं काढायचं ठरवलं. पुणे-दिल्ली, दिल्ली-हरिद्वार. हरिद्वार-हृषीकेश असा पहिला टप्पा होता. ही सगळी बुकिंग झाल्यानंतर कॉलेजवयीन कन्यकेची परीक्षा नेमकी ट्रेकच्या दिवसात आहे, असं कळलं. नाईलाजाने त्यांना बॅच बदलावी लागली. ती मंडळी नंतरच्या बॅचला जाणार असं ठरलं. त्यामुळे आम्ही सात भटके पुष्पदरीला एकत्र जाणार, हे पक्कं झालं.

आता पैसे मोजून करायच्या गोष्टींचा सोपा पेपर संपला होता. कठीण पेपर म्हणजे कष्ट करून आपला फिटनेस सुधारणे. मी पहिला हिमालयातील ट्रेक (संदकफू-फालूत) केला तेव्हा मी २१ वर्षांची होते. वय लहान, तरुणपणातील ताकद होती. मुंबईत भरपूर चालणं आपोआपच होत असे. त्यामुळे वेगळी काही तयारी केली नव्हती. तशी काही गरजही वाटली नव्हती. आनंदात, उड्या मारत ट्रेक झाला होता. आता त्याला तीस वर्ष झाली. ह्या दरम्यान जमतील ते ट्रेक जमेल तेव्हा केले होते. २०१६ नंतर मात्र ट्रेकचं गणित काही जुळून आलं नव्हतं. काही काळ परदेशी वास्तव्य झालं, नंतर कोविड महामारीच्या काळात सगळेच घरात कोंडले गेलो. वैयक्तिक आयुष्यात काही बरं-वाईट घडून गेलं होतं. ट्रेकला शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता चांगली लागते. त्या दोन्ही आघाड्यांवर काम करायची गरज वाटत होती. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रीप आणि ट्रेकच्या मध्ये कुठेतरी येतो. ट्रीप म्हणावी तर फार चैन नाही. ट्रेक म्हणावा तर चालणं आवश्यक नाही. पण आपण हाय अल्टीट्युड झोनमध्ये जातो. विरळ हवेचे प्रकृतीवर परिणाम होऊ शकतात. त्यातून आम्ही पन्नाशीच्या पुढची जनता. ‘ह्या वयात’ ह्या पदवीची माळ गळ्यात पडलेली होती. ‘ह्या वयात’ने सुरू होणाऱ्या वाक्याचा उत्तरार्ध नेहमी उत्तेजनार्थ बक्षीस दिल्यासारखं असतो! ते एक असो. विरळ हवेला तोंड देण्यासाठी आपण धडधाकट आहोत, हे ‘ट्रेक द हिमालयाज’ च्या मंडळींना पटवून देणं आवश्यक होतं. मग ईसीजी, रक्त तपासणी इत्यादी सोपस्कार पार पडले.


बरोबर त्याच दरम्यान आंब्यांचा सीझन होता. आम्ही दोघं सध्या नैसर्गिक शेतीचे प्रयोग करतो आहोत. शेतावर बरीच आंब्यांची झाडं आहेत. त्यामुळे साधारणपणे मार्च ते जून अखेर फार धावपळीचे दिवस असतात. आवळे, फणस, कैऱ्या भालादार-चोपदारांसारख्या ललकाऱ्या देतात आणि नंतर ऐटबाज पावलं टाकत आम्रराजांचे आगमन होते. ही सगळी फळं घरी आणायची, त्याचं वर्गीकरण करायचं, विकण्यासाठी न्यायची किंवा घरी येणाऱ्या ग्राहकांना विकायची, ऑर्डर नोंदवून ठेवायच्या, आंबे खराब होत नाहीत ना ह्याकडे लक्ष द्यायचं. पुष्कळ कामं असतात. ह्या सगळ्या धांदलीत शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी नियमित चालणे, व्यायाम करणे ह्याकडे दुर्लक्ष झालं. त्याचे परिणाम भोगावे लागलेच. त्याबद्दल पुढच्या भागात वर्णन येईलच.

जुलै महिना अगदी समोर येऊन उभा राहिला. मग आपण (म्हणजे मी) पुरेसा व्यायाम केलेला नाही. हे नजरेआड करून बाजारात जाऊन, पैसे मोजून करायच्या सोप्या तयारीला वेग आला. कपडे, रेनकोट, बूट, मोजे, खाऊ, औषधं अशा वस्तूंचे ढीग घरात आणि त्याबद्दलच्या चर्चा व्हॉट्सऍप ग्रुपवर चालू झाल्या. त्या बरोबर ह्या ट्रेकला कशी मजा आली होती, त्या ट्रेकला कशी धमाल केली होती हे विषय निघायचे. त्या गप्पांमधून वातावरणाला छान रंग चढला आणि कधी एकदा हिमालयात पोचतो, असं वाटायला लागलं. एकत्र करून ठेवलेलं सामान सॅकमध्ये भरणे, ह्या कामाचा मुहूर्त निघायच्या आदल्या दिवशीचा (खरं तर आदल्या रात्रीचा) असतो. पावसापासून सामानाचं रक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या फार उपयुक्त. सामानाचं वर्गीकरण करून प्रत्येक प्रकार एका प्लॅस्टिक पिशवीत भरायचा आणि ह्या सगळ्या पिशव्या एका मोठ्या पिशवीत भरून ती सॅकमध्ये कोंबायची, अशी सिस्टिम बऱ्याच ट्रेकनंतर सेट झाली आहे. दोन लेयरमुळे काही भिजत नाही, हा एक फायदा आणि कँपवर पिशव्या उचलून वस्तू शोधणे, हा एक करमणुकीचा कार्यक्रम रोज करता येतो, हा अजून मोठा फायदा! प्रथमच ट्रेक करणाऱ्यांना व्हिडिओ कॉलवर ह्या टेक्नीकचं प्रात्यक्षिक झालं. हळूहळू सगळ्यांच्या सॅक तयार झाल्या. ‘काहीतरी महत्त्वाचं विसरलं आहे’ ही भावना सामान भरणे ते घरातून निघणे, ह्या काळात टोचत असते. त्यावर उपाय म्हणजे घराबाहेर पडणे.

असे सगळे घोळ, गोंधळ, किंचित भीती, मित्र-मैत्रिणी बरोबर असल्याचा दिलासा, हिमालयाची ओढ अशा संमिश्र भावना मनात असताना घड्याळाचा काटा पुढेपुढे सरकत होताच. मी आणि शैलजा जवळ राहतो. त्यामुळे एका रिक्षात बसून रेल्वे स्टेशनकडे निघालो. तिचा पहिलाच ट्रेक होता. त्यामुळे घरच्या सगळ्यांना काळजी वाटत होती. त्यांना सगळ्यांना ‘मी आहे तिच्याबरोबर. तिच्याकडे लक्ष देईन आणि नेली तशी परत आणेन’ असा भरवसा दिला. दुरांतो एक्सप्रेसच्या डब्यात बालपणापासून परिचित मैत्रिणींचे हसरे चेहरे आणि उत्सुक डोळे बघितल्यावर आता पुढचे आठ दिवस भरपूर मजा करायची आहे, ह्या कल्पनेने जीव गार झाला आणि आमचा पुष्पदरीकडे नेणारा प्रवास सुरू झाला.



Comments

Popular posts from this blog

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ८ 'ना कुछ मेरा, ना कुछ तेरा'

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ९ : आंब्यांचे दिवस

ज्याची त्याची वारी.....