पुष्पदरी आणि सात भटके भाग १ - पूर्वतयारी !
दिनांक: नक्की आठवत नाही. पण जानेवारी २०२३ च्या सुरवातीचे दिवस स्थळ:पुणे नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं होतं. ३१ डिसेंबर आला, की नवीन वर्षात शहाण्यासारखं वागायचा संकल्प मी वर्षानुवर्षे नेमाने करते. शहाण्यासारखं वागायची व्याख्या तेवढी वयाप्रमाणे बदलत गेली. लहान असताना ‘लवकर उठायचं. नियमित अभ्यास करायचा. आई-बाबांचं सगळं ऐकायचं, दहा ओळी शुद्धलेखन, तिसापर्यंत पाढे’ असं काहीतरी. आता ‘लवकर उठायचं. नियमित व्यायाम करायचा. फिटनेसकडे लक्ष द्यायचं. वजन कमी करायचं’ असं काहीतरी. संकल्प करायचा उत्साह तीळमात्रही कमी झाला नाही आणि ते मोडायची सवयही मोडली नाही. सालाबादप्रमाणे संकल्प केलेला आहे, पण अजून मोडला नाहीये, ह्या पॉइंटला होते. मैत्रिणींबरोबर चकाट्या पिटण्याचा आनंददायक कार्यक्रम चालू होता. ह्यातल्या बऱ्याचशा मैत्रिणी शाळेपासूनच्या आहेत. उरलेल्या त्यांच्या मैत्रिणी. त्या आता माझ्या चुलत किंवा दत्तक मैत्रिणी. गप्पांचे विषय अध्यात्मापासून आधिभौतिकापर्यंत होते. विषय कसेही वाहात होते. काहीही चालू होतं. बोलता बोलता आधी केलेल्या ट्रेकच्या गप्पा सुरू झाल्या. सह्याद्रीतले, हिमालयातले ट्रेक विशीत सुर...