पुष्पदरी आणि सात भटके भाग २ - पुणे ते हृषीकेश
पुण्याहून दिल्लीपर्यंत विमानाने गेलं तर दीड तासाचा प्रवास आहे. ट्रेनने गेलं तर +/- चोवीस तास. दुरांतो एक्सप्रेससारख्या आधुनिक-गतिमान ट्रेन चोवीस तासांच्या आत पोचवतात. पुणे-दिल्ली प्रवासाची आद्य ट्रेन झेलम एक्सप्रेस निवांत पोचते. आम्ही दुरान्तोने जाणार होतो. त्यामुळे सुखाचा, सुरक्षित प्रवास होता. अगदी थोड्या स्टेशनवर थांबत असल्याने आणि पूर्ण ट्रेन फक्त रिझर्वेशनच्या डब्यांची असल्याने अधेमधे चढून त्रास देणारे प्रवासी नव्हते. जेवण मिळत असल्याने डबे न्यायचा व्याप नव्हता.
सगळ्यांनी वेळेवर पुणे स्टेशन गाठलं. घर सोडण्याआधी जी काही चलबिचल होत असते, ती प्रवास सुरू झाला, की संपते. सगळ्यांचे बर्थ रेल्वेच्या आणि रेल कर्मचारी असलेल्या मैत्रिणीच्या कृपेने एकाच कंपार्टमेंटमध्ये आले होते. सामान लावून झाल्यावर आरामात पाय पसरून बसलो. पाचातल्या चौघी कल्याण-मुंबईतल्या. त्यामुळे त्या दिशेने ट्रेन-दौड सुरू झाल्यावर ओळखीच्या रस्त्याला लागल्यासारखं वाटायला लागलं. नंतर पश्चिम रेल्वेच्या रुळांवरून जाताना लहानपणी केलेले कल्याण-डहाणू प्रवास आठवले. आता डहाणूला कोणी नाही. पण तरी धावत्या ट्रेनमधून डहाणू रोड स्टेशन डोळे भरून बघून घेतलं. २०१४ मध्ये चार मैत्रिणी + पाच मुलं मिळून पिंढारी ट्रेक केला होता. त्या गँगमधल्या मी आणि सुजाता दोघी होतो. बाकी सात मेंबर्सची फार म्हणजे फार आठवण आली. तेव्हा मुंबई सेंट्रल ते दिल्ली सगळ्यांनी जी काही मजा केली होती, ती क्षणोक्षणी आठवत होती. ह्या ट्रेकला आम्ही पुण्याहून पाचजणी आणि कल्याणहून एक मित्र जोडपं असे सात जणं होतो. कल्याणवाल्यांची ट्रेन आमच्यानंतर होती. त्या दोघांचा हिमालयातील पहिलाच ट्रेक होता. त्यामुळे ते घरातून निघेपर्यंत ‘हे घेऊ का? ते घेऊ का?’ चालू होतं.
ट्रेनमधला प्रवास आमच्यासारख्या मैत्रिणींसाठी पर्वणी. एरवीही जमेल तसं भेटतो. व्हॉट्स ऍपमुळे संपर्क नेहमीच असतो. तरी असं निवांत बसून गप्पा मारणे, टवाळक्या, पत्ते खेळणे असा टाईमपास करायला फार छान वाटत होतं. फक्त त्यामुळे झालं असं की चोवीस तासांचा ट्रेनचा प्रवास विमानाच्या दीड तासांच्या प्रवासासारखा पटकन संपून गेला! आम्ही दिल्लीत पोचलो देखील. दिल्लीत ह्या आधीही आले होते. उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश अशा माझ्या आवडत्या राज्यात जायचं असलं की दिल्लीचा वळसा अपरिहार्य असतो. पण ह्या शहराशी माझे सूर कधीच फारसे जुळले नव्हते. मुंबईत असताना लोकलच्या प्रवासाची सवय होती. पुण्यात आल्यावर दुचाकीची झाली. दोन्हीकडे भीती अशी कधी वाटली नव्हती. पण दिल्लीत बस-रिक्षा-टॅक्सीने फिरताना बिचकायला व्हायचं. बोली भाषा, देहबोली, नजर सगळंच जरा खटकायचं. २०११ मध्ये कैलास यात्रेच्या निमित्ताने तीन-चार दिवस दिल्लीत मुक्काम झाला. तेव्हा दिल्ली मेट्रोशी ओळख झाली आणि इकडे-तिकडे जायला सुरक्षित आणि सहज पर्याय मिळाला. एक मित्र बरीच वर्ष दिल्लीत होता. आधी शिक्षण आणि नंतर नोकरीनिमित्ताने. सगळेच शिकत होतो, तेव्हा तो आम्हाला दिल्लीत फिरायला येण्याचा आग्रह करायचा. पण कधी जावंसं वाटलं नाही. कैलास यात्रेच्या वेळेला त्याच मित्राबरोबर जेवायला गेले होते. तेव्हा मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर त्याने ‘ See, metros have separate ladies compartments. Now you can call us civilized..’ असा टोमणा मारून बऱ्याच वर्षांपूर्वी त्याच्या आमंत्रणाचा अव्हेर केल्याचा वचपा काढला होता. ह्या वेळी मात्र दिल्लीत वावरण्याचा आत्मविश्वास दुणावला होता. ह्याचं मुख्य कारण म्हणजे दिल्लीत बरेच वर्ष वास्तव्य केलेली एक मैत्रीण बरोबर होती. दिल्लीचे रस्ते, बोला-वागायची पद्धत, तिथला एकूण ताल तिच्या छानच परिचयाचा होता. असा खंदा लोकल गाईड बरोबर असल्यामुळे एकदम रिलॅक्स होतो. शिवाय आमचा केंद्र सरकारच्या सेवेत असलेला एक शाळा-मित्र दिल्लीत होता. त्याने तर आमची इतकी सोय केली, की प्रथमच ‘दिल्ली फिरायला एकदा यायला हवं’ असं वाटलं.
तर दुरांतोने निजामुद्दीन स्टेशनवर पोचलो. प्रत्येक टप्प्यावर अत्यावश्यक असा एक सेल्फीचा कार्यक्रम पार पडला आणि आम्ही गेस्ट हाउसच्या दिशेने निघालो. गेस्ट हाउसवर जाऊन फ्रेश होऊन नंतर वर्गमित्राने ठरवलेल्या जागी जेवायला जायचं होतं. तिथे कल्याणहून येणारं मित्र जोडपं भेटणार होतं. तिथूनच रेल्वे स्टेशनवर जायचं आणि ट्रेनने हारीद्वार. रात्रीचा मुक्काम हृषिकेशला. हृषिकेशला पोचलं की आजचे कार्यक्रम संपणार होते.
सर्व सामान आणि आम्ही पाचजणी कॅबमध्ये बसून निघालो. दिल्ली अजिबात परिचयाची नाही. तिथल्या जागांची नावं वाचताना गंमत वाटत होती. आश्रम चौक, लाजपण नगर, चिराग दिल्ली, शेख सराय वगैरे भागातून साकेत भागातल्या गेस्ट हाउसवर पोचलो. थोडा आराम, ब्रेकफास्ट झाला. तेवढ्यात जेवणाच्या जागी न्यायला गाडी आली. आमची आवराआवरी चालू होती, तोवर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट अशा सगळ्या सजावटीसह जोरदार पाऊस कोसळायला लागला. दिल्लीत म्हणे फारसा पाऊस पडत नाही. ज्यांचं लहानपण सह्याद्री ते समुद्रसपाटी ह्या पट्ट्यात गेलंय, त्यांना कुठलाच पाऊस फार वाटत नाही म्हणा! पण दिल्लीत असा पाऊस एकतर पडतच नाही आणि कधी पडलाच तर फार तर अर्धा तास पडतो, असं आमच्या दिल्ली-अनुभवी मंडळींनी सांगितलं. मुंबई म्हणजे घाई-गडबड. Mumbai means business. आपलं काम आणि आपण. दिल्लीचं जरा वेगळं. राजधानीची ऐट जाणवतेच. प्रशस्त रस्ते, हिरवळी. केंद्र सरकारच्या निरनिराळ्या विभागांची कार्यालये. खासदार-मंत्र्यांचे बंगले. आपली कामं होण्याची आशा घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक. कुठेकुठे कशाकशासाठी चालू असलेली निदर्शनं, आंदोलनं, पोलीस बंदोबस्त वगैरे.
जेवण झालं. निरनिराळ्या कॉम्बिनेशनमध्ये फोटो काढून झाले. तेवढ्यात आमच्या चालकाचा फोन आला. ‘मॅडमजी रेल्वे स्टेशन जाने निकले? बारीश बडी तेज हो रही है’ ‘चला, चला निघूया’ असं बोलणं झाल्यावर मित्र म्हणाला की ‘अगं, वीस-पंचवीस मिनिटांचा रस्ता आहे. अजून दीड तास आहे. मस्त चहा घ्या आणि निघा.’ चहा झाल्यावर मात्र निघालो. पाऊस दिल्लीकरांच्या अंदाजाला अजिबात न जुमानता मुसळधार कोसळत होता. माणसं वाढल्यामुळे आता दोन गाड्या होत्या. पाठोपाठच धावत होत्या. येताना ज्या गाडीत आलो, त्यात चौघी जणी आणि दुसऱ्या गाडीत तिघं होतो. दिल्लीतला ऐटबाज भाग मागे टाकून जसे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाऊ लागलो, तसा पावसाचा धुमाकूळ दिसायला लागला. रस्त्यांवर पाणी साठलं होतं. ट्रॅफिक अडकला होता. अक्षरशः इंचाइंचावर गाडी थांबत होती. शेवटी ड्रायव्हर दादांचा संयम संपला. ‘मॅडमजी, इसलिये हम बोल रहे थे जलदी निकलो, जलदी निकलो. हम तो साबकोभी फोन किये, गेस्ट लोगोंको जलदी निकलनेको बोलिये. ना साबने हमरी सुनी, ना आप लोगोने. अब दिक्कत हो गयी ना. आपकी अगर ट्रेन निकल गयी, तो साबको क्या मुंह दिखाएंगे ’ हे ऐकल्यावर मात्र आम्हालाही काळजी वाटायला लागली. सुरवातीलाच ट्रेन चुकणे, हा अंक झाला असता, तर पुढचं सगळं प्लॅनिंग कोसळलं असतं. उद्या सकाळी ट्रेक संस्थेच्या बसने हृषीकेश ते पिपलकोटी प्रवास करायचा होता. त्यात उत्तरेच्या भागातली सुप्रसिद्ध कावड यात्रा सुरू झाल्यामुळे काही रस्तेही बंद होते. आता जर ट्रेनच्या वेळेत पोचता आलं नाही, तर हे सगळंच गणित चुकणार होतं.
ट्रेनने आता वेग घेतला होता. गाझियाबाद, मीरत वगैरे स्टेशन येत होती. लहान-सहन वस्त्या, शेतं तर कधी लखलखणारे मॉल असं कधी भारताचं तर कधी इंडियाचं चित्र डोळ्यासमोर येत होतं. कावड यात्रेच्या खुणा दिसत होत्या. उत्तरेकडे ह्या कावड यात्रेचं बरंच महत्त्व असतं. तीर्थस्थळातील पवित्र पाणी आपल्या गावच्या महादेवाला अर्पण करायचं, ही त्याची बेसिक कल्पना. हे तीर्थ जमिनीवर ठेवत नाहीत. त्यामुळे त्या कावडी किंवा कलश ठेवण्यासाठी जागोजागी तिकाटण्यासारखी सोय करतात. काही जण चालत किंवा वाहनाने जातात. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी असते. पुण्यातही पालखीची गर्दी असते. पण पालखीचे दिवस ठरलेले असतात. एकदा पालख्या पुढे गेल्या, की पुण्यातलं जनजीवन पूर्वपदावर येतं. कावड यात्रा मात्र पंधरा दिवस चालते. तेवढे दिवस ‘महाकाल, महादेव’ वगैरे लिहिलेले कपडे घातलेली माणसं इकडे-तिकडे जात असतात. बायका दिसल्या नाहीत. ही यात्रा स्त्रीपात्र विरहित असावी. गाड्यांना झेंडे लावलेले, कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत ही मंडळी रानोमाळ म्हणावी तशी सगळीकडे फिरत असतात. त्यांच्या साठी राहण्याची -जेवण्याची सोय स्थानिक लोकं करतात. त्यांच्या मांडवांमुळे रस्ते बंद ठेवतात.
आता सगळे ट्रेनमध्ये स्थिरावले होते. त्यामुळे संगीत खुर्ची सुरू झाली. जागा बदलत वेगवेगळ्या सदस्यांशी गप्पा मारत होतो. हारीद्वार जवळ आलं आणि उतरणाऱ्यांची लगबग सुरू झाली. आम्हीही सर्व सामान अंगाखांद्यावर चढवून मनातल्या मनात ‘हर हर महादेव’ म्हणत उतरायला सज्ज झालो. ट्रेन तशी डेहराडूनपर्यंत जाणार होती, पण बरीचशी मंडळी हरिद्वारला उतरणार होती. त्या तुंबळ गर्दीतून आम्ही सामानासकट उतरलो. इथे पुन्हा गर्दी होतीच. स्टेशनमधून बाहेर आलो. पावसाची रिपरिप चालो होती. कावेडिया, तीर्थस्थळी येणारे यात्रेकरू आणि भारतातील कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या बाहेर असते, ती गर्दी मिळून एक वेगळंच समीकरण तयार झालं होतं. आम्हाला आज हृषीकेश गाठायचं होतं. मग दोन सदस्य पुढच्या हारीद्वार - हृषीकेश प्रवासाची जुळणी करायला गेले आणि बाकीचे सामानांकडे लक्ष ठेवायला थांबलो. हारीद्वार मोठं रेल्वे स्टेशन आहे. ट्रेन आली की गर्दीचे नवीन जथ्थे येऊन दाखल होत होते. येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेनची माहिती देणाऱ्या, गर्दीत खिसा-पाकीट सांभाळायच्या, हरवलेल्या मुलांची माहिती देणाऱ्या उद्घोषणा चालू होत्या. काल पुण्यातून निघालो ते ऐटबाज अशा दुरांतो एक्सप्रेसने, दिल्लीत मित्र-कृपेने सगळं अलगद झालं होतं. आता हरिद्वारला पोचल्यावर ‘ये कहाँ आ गये हम?!!’ असं वाटायला लागलं. काहीतरी नवीन बघायला, अनुभवायला बाहेर पडणं आकर्षक वाटत असलं, तरी अशा काही क्षणांना ‘सुखाचं घर सोडून कशाला ह्या भानगडीत पडलो?’ असंही वाटतं.
ह्या विचाराचा जोर वाढण्याआधीच आमची मंडळी हारीद्वार‑हृषीकेश प्रवासाची सोय करून परतली. एका टमटमसारख्या वाहनात आम्ही सगळे बसलो आणि हरिद्वारच्या चक्रव्यूहासारख्या अरुंद गल्ल्या, ध्वनिक्षेपकावरून गळणारी गाणी, वरून पडणारा पाऊस, बेशिस्त वाहतूक ह्यातून वाट काढत हृषीकेशच्या रस्त्याला लागलो. दिवस कधीचाच मावळून काळोख झाला होता. हारीद्वार जसं मागे पडलं, तसा काळोख दाट झाला. त्या तेवीस किलोमीटरच्या रस्त्यात राजाजी नॅशनल पार्क आहे. तिथे कुठले प्राणी आहेत, त्या पाट्या दिसत होत्या. ह्यापैकी कुठला प्राणी आत्ता समोर आला, तर कोणाची काय प्रतिक्रिया होईल वगैरे टाईमपास करून आम्ही आमची माफक करमणूक करून घेतली. ग्रुपचं बोधवाक्य ‘इथे कुठल्याही विषयावर विनोद करून मिळतील आणि कितीही फालतू विनोदांना हसणारी माणसंही मिळतील’ असल्यामुळे असे विनोद करणे आणि त्यावर हसणे हे अपरिहार्य होतं.
हृषीकेश आलं. तिथेही कावड यात्रेमुळे काही रस्ते बंद होते. त्यामुळे हॉटेलचा रस्ता शोधताना धांदल झालीच. पण शेवटी ते हॉटेल मिळालं. खोल्या मिळाल्या. आता पुढचा प्रश्न जेवणाचा. पण आम्ही घरून निघताना भरपूर रसद आणलेली असल्यामुळे बाहेर न जाता जवळचे व्हरायटी पदार्थ खाल्ले. एवढ्या दगदगीनंतर थकलो होतो. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून ट्रेक ऑर्गनायझर संस्थेच्या ऑफिसमध्ये सामानासकट पोचायचं होतं. त्यामुळे गप्पांचा तास रद्द करून खोलीत जाऊन गुडुप झोपलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सहा जिवलग मित्र मैत्रिणींबरोबर २०२३ च्या जुलै महिन्यात व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक केला. त्याचं हे तीन वर्षांनंतर लिहिलेलं वर्णन. आता ह्याला ‘देर आए, दुरुस्त आए, म्हणायचं की ‘वरातीमागून घोडं’ ते ठरवता यावं म्हणून नक्की वाचा. आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.
पुष्पदरी आणि सात भटके : भाग १ पूर्वतयारी
https://aparnachipane.blogspot.com/2026/08/blog-post.html
पुष्पदरी आणि सात भटके : भाग २ पुणे ते हृषीकेश
https://aparnachipane.blogspot.com/2026/09/blog-post.html



.jpeg)
Comments
Post a Comment