माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग १ - पूर्वतयारी


                                                                                           कैलास दर्शन                                                        pc : श्री.शरद तावडे
बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मित्राच्या मावशीकडे कैलास-मानस सरोवर यात्रेचा स्लाइड शो बघितला होता. हा स्लाइड शो बघितल्यावर अक्षरशः भारावून गेले. त्या काळात मी जमेल तेव्हा गिर्यारोहण करायचे. हिमालयातही एकदा जाऊन आले होते. पण हे सगळं गिर्यारोहणापेक्षा वेगळाच प्रकार फारच वेगळं होतं. कैलास पर्वताचा तो गूढ, अद्भुतरम्य आकार, मानस सरोवराची अथांग निळाई !! वा!! 

तेव्हा मी शिकत होते. माझ्या शिक्षणासाठी, गिर्यारोहणाच्या छंदांसाठी आई-वडील आनंदाने पैसे, पाठिंबा, उत्तेजन देत होते. पण कैलासच्या महागड्या यात्रेसाठी पैसे मागायची माझी हिंमत झाली नाही. शिक्षण पूर्ण करून आपल्या पैशांनी जायचं नक्की ठरवलं होत. पण नेहमीप्रमाणे दात आणि चणेन्याय मध्ये आला. शिक्षण संपल्यावर एका वर्षात दोनाचे चार’, मग अजून दोन वर्षात चार हातांचे सहा हातझाले!! गृहकृत्य, बालसंगोपन, नोकरी-व्यवसायाची धावपळ, देशी-विदेशी घरं वसवणे ह्यात बारा-पंधरा वर्षे कुठल्या कुठे उडून गेली.

ह्या दरम्यान कुठे कैलास-मानस सरोवर यात्रे बद्दल काही वाचलं, बघितलं की मनात एक कळ यायची. पण घरच्या तसेच कामाच्या जबाबदार्‍या आहेत. सध्या नाही जमणार. पुढे कधीतरी जमेलअशी मी माझीच समजूत घालत होते. माझ्या ओळखीतले एकजण तीन वर्षांमागे ह्या यात्रेला जाऊन आले. त्यांचे वर्णन ऐकून, फोटो बघून मात्र ती दबलेली इच्छा अगदी उफाळून आली. मग मी पद्धतशीर चौकश्या सुरू केल्या.

ही कैलास मानसची यात्रा दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार म्हणजे विदेश मंत्रालय (भारत सरकार) ही यात्रा दरवर्षी आयोजित करते. चीन सरकारबरोबर झालेल्या करारानुसार, भारत सरकार दरवर्षी ९६० यात्री तिबेट मध्ये पाठवू शकते. मेच्या शेवटच्या आठवड्या पासून साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सहा-सहा दिवसांच्या अंतराने १६ ग्रुप जातात. ह्या यात्रेमध्ये आपण तिबेटमध्ये जाण्याआधी जवळ-जवळ पाच-सहा दिवस चालत किंवा घोड्यावर रस्ता कापून चीनच्या हद्दीत प्रवेश करतो. नंतर पुढच्या बारा दिवसात कैलास पर्वताची तसेच मानस सरोवराची परिक्रमा पूर्ण होते. त्यानंतर मायदेशी परतून आल्या वाटेने घरी! ह्याला एकूण एक महिना लागतो.

दुसरा प्रकार म्हणजे, प्रवासी कंपन्यांबरोबर जाणे. ह्याच्या जाहिराती सर्वांनी वाचल्या असतीलच. ह्या कंपन्या नेपाळमार्गे जीपमधून तिबेटमध्ये नेतात. परिक्रमा झाल्या की पुन्हा नेपाळमार्गे परत.

दोन्ही प्रकारात खर्च साधारण सारखाच येतो. सरकारतर्फे गेल्यास एक महिना लागतो. नेपाळमार्गे गेल्यास वीस दिवस. मात्र भारतातून गेल्यास आपण हळू-हळू वरच्या उंचीला जातो. त्यामुळे कैलास-मानसच्या समुद्र सपाटीपासून ४५५६ मीटर इतक्या उंचीवर कमी त्रास होतो. शिवाय मी अस ऐकलंय की, नेपाळमधून तिबेटमध्ये नेऊ शकणाऱ्या संस्था ठरलेल्या आहेत. ते लोक हवा खराब आहे’, ‘तुम्हाला झेपणार नाहीअसं काहीतरी सांगतात. आधीच तिथल्या विरळ हवेने माणूस गळाठून गेलेला असतो. त्यात असं काहीतरी ऐकलं की 'कैलास दर्शन होतंय ना, मग झालं तर.' असा विचार करून कैलास परिक्रमेचा विचार सोडून देतात.

ही झाली प्राथमिक माहिती! आता मी माझे स्वतःचे अनुभव सांगते.

मनाने जायचं नक्की केलं तरी ते घडवून आणण्यात अक्षरशः कैलास पर्वता एवढ्याच मोठ्या अडचणी होत्या. वृद्ध सासू-सासरे, लेकाची दहावी, माझा स्वतःचा वास्तू-विशारदाचा व्यवसाय, इत्यादी, इत्यादी. ह्या यात्रेआधी एकदम जोरदार मेडिकल असते. बाकी तसा प्रश्न नाही पण माझं हिमोग्लोबिन कायम गरजेपेक्षा कमी, आणि वजन गरजेपेक्षा जास्त!!! ( साधारणपणे लग्नाला प्रत्येक वाढदिवसाला एक-एक किलो ह्या प्रमाणात वजन वाढलं होतं!!) ह्या सगळ्याची काळजी होतीच नाहीतर एवढी जाहिरात करून, अश्रू ढाळून, समारंभाने जायचं आणि आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घराअस म्हणत मी दिल्लीहून परत!!

पण प्रश्न येतात तसे सुटतातही.

ऑफिस स्वतंत्रपणे सांभाळू शकेल, अशी एक असिस्टंट शोधली. ती जानेवारीपासून यायला लागली. ती चांगल्यापैकी रुळल्यावर मार्चमध्ये तिला जून-जुलैत महिनाभर तुलाच ऑफिस सांभाळायचंय बरं काअस सांगितल्यावर एकदम उडालीच. लेकाने सुरवातीला आई, इतर मुलांच्या आया दहावी म्हणून नोकऱ्या सोडतात. तू महिनाभर ट्रीपला कसली जातेसअशी कुरकूर केली. पण नंतर त्यालाही तो ज्वर चढला. मी अठरा वर्षांचा झालो की मी पण जाणारअश्या बोलीवर आमची माय-लेकांची मांडवली झाली. माझ्या क्लाएंटस् पैकी काहीजण जरा नाराज झाले पण काहींनी जाऊन या हो. महिना काय असातसा जाईलअशी समजूत घातली. नवरा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा. सतत देशी-विदेशी दौरे चालूच असतात. यात्रेच्या काळात तसे काही दौरे ठरलेले तरी नव्हते. त्यामुळे घरची आघाडी सांभाळायला तो पुण्यात असायची शक्यता बरीच होती.

हे सगळं चालू असताना एकीकडे दिल्लीशी पत्र-व्यवहार सुरू होता. साधारण जानेवारीत विदेश मंत्रालयाची जाहिरात सर्व भाषांमधील प्रमुख वृत्तपत्रात येते. तो फॉर्म, पारपत्राची प्रत आणि स्वतःच्या पत्त्याचे पोस्ट-कार्ड असा जामानिमा पाठवला. मग दोन महिने फक्त वाट बघणे. ती अवस्था म्हणजे पु.ल.देशपांडेंच्या नारायणमधल्या मुलगी बघायला आलेल्या मुलासारखी! यात्रेला जाण्याची स्वप्नं बघावी की नको?’, ‘फिटनेस साठी सिंहगडाला रविवारची साखर झोप मोडून जावे की नाही?’,’ज्याला-त्याला मी कैलास-मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे सांगून नको करावे की नाहीइत्यादी इत्यादी प्रश्न पडत होते.

एकदाचे दिल्लीचे पत्र आले. त्यात माझा १० जूनच्या, म्हणजे तिसऱ्या बॅचमध्ये प्रतीक्षायादीत १३वा क्रमांक असल्याचे शुभवर्तमान कळले! पुन्हा मी लटकलेली. हो-नाही धड कळलेलं नाही, अशी अवस्था फार वाईट. पण लवकरच विदेश मंत्रालयाचे निवड झाल्याचे पत्र आले. आता एकदम चित्रच बदलले. विदेश मंत्रालयाकडून माहितीपुस्तक आले. एका काकांनी त्यांच्या जवळचे अपूर्ण परिक्रमा कैलास-मानस सरोवराचीहे श्री.मोहन बने ह्यांचं पुस्तक वाचायला दिल. ह्या दोन्ही पुस्तकांचा माहिती मिळवायला खूपच उपयोग झाला. त्यातले फोटो बघून कधी एकदा हे सगळं प्रत्यक्ष बघतोय अशी घाई झाली.

आता तयारीला चांगलाच वेग आला.

माझे सासू-सासरे नणंदेकडे काही महिन्यांकरता गेले आणि आई-बाबा पुण्यात जावई आणि नातवासाठी आले. एरवी ते भावाकडे असतात. दिवसभर भाची त्यांच्याजवळ असते. तिला बघायला वाहिनीची आई नाशिकला गेली. असे कौटुंबिक पत्ते पिसून झाले!! घर आणि ऑफिसचे प्रश्न झाले.

आता प्रश्न सामान जमवणे आणि भरणे!!

हे फार मोठे काम होते. काही कळत नव्हत, काय न्यावं ते. खरं तर काय नेऊ नये हा मोठा प्रश्न होता. कारण मला सगळं कपाटच उचलून न्यावंसं वाटत होत!! किंवा जमल्यास सगळं घरच!! मी ह्या आधी यूथ हॉस्टेलच्या ट्रेकना जाऊन आले होते. पण ही यात्रा महिन्याची. त्यातही दिल्लीच्या कडक उन्हाळ्यापासून ते तिबेटच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीपर्यंत व्हरायटी!! हिमालयात कधीही जायचं म्हणजे पाऊस जमेला धरावाच लागतो. विदेश मंत्रालयाकडून आलेल्या माहिती-पत्रका प्रमाणे २० किलो पर्यंत समान न्यायला परवानगी होती. त्यातच सगळं बसवायचं होतं.

भरीत भर म्हणून मिळणारे असंख्य सल्ले. माझ्या वडिलांचे एक स्नेही ह्या यात्रेला जाऊन आले होते (नेपाळमार्गे. त्यांचीही फक्त मानस सरोवराची परिक्रमा झाली, कैलासाची नाही.) मी आणि बाबा जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आलो. भरपूर सुका मेवा घेऊन जाह्या त्यांच्या सल्ल्यानुसार बाबा प्रचंड प्रमाणात सुका मेवा घेऊन आले. मग आम्ही तो छोट्या-छोट्या प्लास्टिक पिशव्यांमधून भरला.

गरम गार आणि पावसाचे कपडे काय घ्यावे हा विचार करण्यात मी पुष्कळ दिवस घालवले. शेवटी हे दोन १२-१५ दिवसांचे ट्रेक लागोपाठ करतोय असा विचार करून समान जमवलं. एका ओळखीच्यांची भव्य सॅक आणली. त्याच्या मानाने सामान भरायला सुरवात केली. एक बेताची सॅक पुणे-दिल्ली-तिबेट सीमा ह्या सामानाची केली. सगळे जड गरम कपडे दुसऱ्या सॅकमध्ये भरले. ही परिक्रमा सॅक. दिल्लीत आणि काही पुढच्या काही मुक्कामाच्या ठिकाणांवर सामान ठेवता येते असे कळले. वापरून झालेले आणि येताना घालायचे कपडे तिथे ठेवायचे ठरवले.

कैलास- मानस म्हणले की आठवतो तो मालपा येथे १९९८ साली दरड कोसळून झालेला अपघात. ह्यात सुप्रसिद्ध नृत्यांगना प्रोतिमा बेदी ,त्यांची पूर्ण ६० जणांची बॅच, तेवढेच पोर्टर, पोनीवाले, व्यवस्थेतील लोक, स्थानिक नागरिक असे जवळ जवळ २०० लोक ठार झाले होते. ह्या अपघाताचे एक अप्रत्यक्ष दडपण मनावर होतेच. (लेकानेही ,’आई, ती जागा पार केलीस की फोन कर बरं का.अस सांगून ठेवलं होतं) विदेश मंत्रालय सुद्धा तिबेटमध्ये काही बरं-वाईट झाल्यास अवशेषपरत भारतात आणले जाणार नाहीत अस लिहून घेते!!

अशी सगळी प्रतिज्ञापत्रे, डिमांड ड्राफ्ट, विमानाची जाण्या-येण्याची तिकिटे इत्यादी तयारी झाली. आणि वर्षानुवर्ष मी ज्याची स्वप्न पाहत होते, त्या यात्रेसाठी, मी घर-ऑफिस-कुटुंब सर्वांची काळजी करत आणि सर्वांना माझ्या काळजीत टाकत एकदाची निघाले.
_______________________________________________________________________

ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा

भाग-२ दिल्ली मुक्काम https://aparnachipane.blogspot.com/2018/06/blog-post.html

Comments

  1. Sundar .. aata pudhchya bhagachi utsukata aahe!

    ReplyDelete
    Replies
    1. Manjusha, thank you so much!
      Will post next part in a week's time. Please share this like with your friends and family.
      regards

      Delete
    2. Thanks Varsha. Will post the next part next week.

      Delete
    3. I think. I will have to keep reading your book and see when I can possibly think of visiting this heavenly place ❤💕

      Delete
  2. Aparna ji. Rochak, oghavti lekhan shaili. Await for the next part....

    ReplyDelete
  3. Utsukta vadhali mast lihila ahes

    ReplyDelete
    Replies
    1. पुढचा भाग नुकताच पोस्ट केला आहे.
      प्रतिक्रियेबद्दल आभार

      Delete
  4. व्वा. माझ्या मनाच्या जवळचा विषय. तुमचं वाचताना जणुकाही मी माझंच लेखन वाचतेय असं वाटावं इतकं आपल्या लेखनात साम्य आहे.....जसं पहिलं नाव एकच आहे. आता मी माझा ब्लॉग रिव्हाईव्ह करेन आणि सगळे लेखन त्यावर टाकेन. टोपण नावाने ब्लॉग लिहीते "शांतिसुधा" या नावाने. पुढचा भाग लगेचच चालू करते. ----------- डॉ. अपर्णा लळिंगकर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५