जीवनज्योती कृषी डायरी - भाग ८ 'ना कुछ मेरा, ना कुछ तेरा'


मध्यंतरी काही कारणामुळे दोन आठवडे शेतावर जाता आलं नाही. आपापले काम-धंदे सोडून शेती करायला लागलो, त्याला आता पाच वर्ष झाली. पाच वर्षात शेताचा इतका लळा लागला आहे, की बाहेरगावी गेल्यामुळे किंवा काही वैयक्तिक अडचणींमुळे जर काही दिवसांची गॅप झाली, तर माझ्या डोळ्यासमोर शेताचा रस्ता, तिथली झाडं येऊ लागतात! त्यामुळे शाळेत असताना ट्रीपला जायच्या दिवशी ज्या उत्साहाने उठायचो, तशाच उत्साहाने उठून, आवरून डबा, पाणी, शेताचे कपडे अशा ठरलेल्या गोष्टी घेऊन निघालो. दर वेळी जाताना साधारणपणे त्याच वेळी, त्याच रस्त्याने, त्याच गाडीत बसून आणि आम्हीच दोघं जातो. परिणामी आमचं सगळं सेम टू सेम असतं. बदल असतो, तो बाहेर. त्या दरम्यान झालेल्या, असणाऱ्या, होणाऱ्या सण - समारंभ -सभा- संमेलने - वाढदिवसांची माहिती झळकत असते. कुठे नव्याने रस्ते खणलेले दिसतात. एखाद्या इमारतींभोवती बांधकामपूर्व निळे पत्रे लागलेले दिसतात. त्या ठरावीक वेळेच्या ट्रॅफिकच्या पॅटर्नचा निरीक्षणातून आपोआपच अभ्यास झाला आहे. सकाळी लवकर जात असल्याने शाळांच्या संबंधातील ट्रॅफिक बराच असतो. पिवळ्या रंगाच्या स्कुल बसेस, व्हॅन, मुलांना शाळेत सोडायला जाणारे पालक दिसतात. जानेवारीनंतर तो ट्रॅफिक कमीकमी होऊ लागतो. दहावी, बारावी, वेगवेगळ्या बोर्डांच्या परीक्षा सुरू होतात. उन्हाळ्याची सुट्टी लागते.
सुट्टीच्या दिवसात सकाळच्या वेळी वाहतुकीचा रेटा जरा कमी होतो. 



कार चालवायचं काम महेशकडे असल्यामुळे मी निवांत असते. बऱ्याच वेळा बसल्या बसल्या एकीकडे काहीतरी विणकाम करते आणि दुसरीकडे रस्त्यावरच्या पाट्या, जाहिरात फलक वाचणे, त्यातलं शुद्धलेखन मनातल्या मनात दुरुस्त करणे, हा एक जोडधंदा असतोच. बहुतेक सगळ्या जाहिराती अन्न, वस्त्र, दागिने, वाहने आणि निवारा ह्या सदरातल्या असतात. शेजारून धावणाऱ्या गाड्यांवरचे ‘शेवटी नशीबच’ किंवा ‘एकच नाद-बैलगाडा शर्यत’ असे सुविचार वाचायला मिळतात. एकदा असंच शेतावर जाताना सेमी ट्रेलर दिसला. त्याचं पासिंग नागालँडचं होतं. नागालँडवरून तळेगावला आलेलं वाहन म्हणून मी आदराने बघायला लागले, तर त्याच्यावर मराठीत काय-काय लिहिलेलं होतं. ते बघून ‘अरेच्च्या’ झालं. मग तसे बरेच प्रकार दिसले. एकदा तर मुंबई ते चांदिली जाणारी, पण नागालँडच्या पासिंगची प्रवासी बसही दिसली. नंतर कळलं, की तिकडे रोड टॅक्स कमी असल्यामुळे हा उद्योग करतात!!




शेताच्या सातबाऱ्यावर आमची नावं लागली, त्याला आता वीस वर्ष होऊन गेली. वीस वर्षात काय बदलत नाही? आमच्यात, आमच्या कुटुंबात पुष्कळ बदल झाले. शेताच्या आसपासच्या परिसरातही बदल झाले. शेतावर जायला लागलो, तेव्हा त्या भागाला शहरीकरणाचा वारा लागला नव्हता. शेती, पशुपालन आणि थोडे जोडधंदे इतकाच पसारा होता. मग तिथे फ्लोरिकल्चर एम आय डी सी सुरू झाली. पॉलीहाउसेस उभारली गेली. परदेशी भाज्या, गुलाबाची फुलं विमानात बसून देशात-परदेशात जाऊ लागली. एक मोठं शैक्षणिक संकुल उभं राहिलं. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याच्या-जेवणाच्या सोयी पाठोपाठ आल्या. शेतावर जायच्या रस्त्यावर एक दगडाची प्रचंड मोठी खाण सुरू झाली. त्याच्या जवळ दगडाची खडी करण्याचं काम, रेडी मिक्स काँक्रीटचे प्लांट आले. शहरातल्या घरांच्या, रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या दगड, खडी, काँक्रीटची वाहतूक करणारे डम्पर त्या खेड्यातल्या रस्त्यांवरून अहोरात्र धावायला लागले. डंपर चालवणारी मंडळी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी चाळवजा घरं आणि गरजा पुरवणारी दुकानं आली. दुकानांचा लसावि काढला, तर सलून, किराणा, मोबाईल दुरुस्ती, ‘ताजं आणि स्वच्छ’ चिकन आणि चायनीस रेस्टोरंट असा असतो !! हळूहळू फ्लोरिकल्चर एम आय डी सी मध्ये ऑटोमोबाईल कंपन्यांनी बस्तान बसवलं. त्यांच्यासाठी चांगले चकाचक रस्ते झाले. ह्या सोयीचा आम्हीही लाभ घेऊ लागलो. त्यातल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचा मोठा प्लांट एका कोरियन कंपनीने घेतला आणि अचानक त्या रस्त्यावर कोरियन भाषेतल्या पाट्या दिसू लागल्या. आत्ता आत्त्तापर्यंत पोहे आणि वडापाव विकणाऱ्या टपरीवजा जागांनी कोरियन बाप्तिस्मा घेऊन त्या तिकडचं काहीबाही विकायला सुरवात केली. आता तर त्या रस्त्यावर पंचतारांकित हॉटेलचं काम सुरू झालं आहे!! ‘शेताजवळ धड खायची-जेवायची सोय नाही. घरून डबा न्यावा लागतो’ हे आमचं ठरलेलं वाक्य आहे. लवकरच ते बदलून मोठ्या रस्त्याला लागलात की कोरियन रेस्टोरंट आहेत, तिथे जेवा. ते नसेल आवडत तर ताज विवांता आहेच’ असं म्हणावं लागेल. तो मोठा रस्ता सोडून शेताकडे जातानाही विकासाच्या रेट्याने घडवून आणलेले बदल दिसतात. गेल्या काही महिन्यात तिथे दोन पेट्रोल पंप सुरू झाले. मोकळ्या जागा सपाट करून तिथे लहान-मोठ्या किंवा खूप मोठ्या शेड उभारल्या गेल्या. प्रत्येक वेळी जाताना एखाद्या जागी सपाटीकरण सुरू झालेलं दिसतं. वीस वर्षांपूर्वी त्या रस्त्याला वाहनं जवळपास नसायची. अजून दोन-चार वर्षात तिथेही ट्रॅफिक अडकणे, हा प्रश्न उग्र होत जाणार, ह्याची स्पष्ट लक्षणं दिसत आहेत. 


शेत गावापासून थोडं बाहेरच्या बाजूला आहे. तिथून जाताना ओळखीचे एक आजोबा चालत जाताना दिसले. ह्या आजोबांचा मुलगा काही वर्ष शेतावर मदतनीस म्हणून काम करत होता. आता त्याचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे. स्वतंत्र व्यवसाय आणि शेती मिळून त्या मुलाची चांगली प्रगती झाली आहे. त्या मुलामुळे त्याच्या सगळ्या कुटुंबाशी आमचे बांध जुळले, त्या गावात थारा मिळाला . ते सगळे आता शेताचे लोकल गार्डियन आहेत. शेतकऱ्यांच्या गोठ्यात गाई-म्हशी असणं, हे वैभव असतं. आपला गोठा भरलेला असावा, असं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं. ह्या आजोबांच्या म्हशी आहेत. त्या म्हशीचं दूध गावातल्या डेअरीत घालायला त्यांची रोजची चक्कर असते. आमची आणि त्यांची वेळ जुळली, तर त्यांचे चालायचे बरेच कष्ट वाचतात. गाडीत बसल्यावर मुलाबाळांची-पीकपाण्याची चौकशी होते. दिवाळी झाली, तरी यंदा  पाऊस थांबला नाहीये. त्यामुळे आमच्या आसपासचे इंद्रायणी तांदुळाचे शेतकरी चिंतेत आहेत. पण आजोबांच्या शेतातल्या भाताची कापणी झाली. पुढचे सोपस्कार करून भाताची पोती घरात गेली सुद्धा. त्यांचं नुकसान झालं नाही, हे कळल्यावर बरं वाटलं. आज कार्तिकी द्वादशी. गावातल्या काळभैरवाच्या मंदिरात कालच्या एकादशीला भजन-कीर्तन झालं आणि आज पारणं म्हणून आमटी-भाताचा प्रसाद होता, ही बातमी कळली. शेताजवळ आल्यावर आजोबा त्यांच्या रस्त्याने गेले, आणि आम्ही आमच्या. 



शेतावर गायी-गुरं हवी, तसं राखणीला कुत्राही हवा. आमच्या मदतनिसाने दोनदा कुठून कुठून कुत्र्याची पिल्लं आणली. पण ते काही जमलं नाही. काही महिन्यांपूर्वी एका कुत्रीने शेताला दत्तक घेतलं. म्हणजे कोणी तिला कुठून आणलं नाही. ती आपली आपली येऊन शेतावर राहायला लागली. तिला मनात येईल, तेव्हा ती उंडारायला जाते. अशीच एकदा इकडे-तिकडे फिरत असताना जवळच्या ठाकरवाडीतल्या मुलांनी तिला पकडून बांधून ठेवलं. पण दोरी तोडून ती पळून आली. अशी ही आमची स्वतंत्र वृत्तीची ‘कोको’. आम्ही शेताजवळ कार पार्क केली रे केली की ती धावत आमच्या स्वागताला येते आणि घरी जायला निघालो की सोडायलाही येते. शेतावर चक्कर मारतो, तेव्हा पायात-पायात करून त्रासही देते.. आज गेल्यावरही तिने येऊन आमचं स्वागत केलं. ह्या स्वागत समारंभात ती वेगळेच ‘कुई-कुई’ असे आवाज काढते आणि कंबर हलवून नाच करते!! त्या नाचाची बिदागी म्हणून तिला एक पोळी खायला मिळते. शेतावरच्या मोकळ्या हवेत आणि शांततेत गेल्यावर आमचा सगळा शीण उतरला. शेताच्या रंगात रंगलेले कपडे आणि पायात गमबूट घालून आम्ही शेत-फेरीला निघालो. 



पावसाळा संपला तरी कुठला कमी दाबाचा पट्टा, कुठलं वादळ अशी कारणं काढून पाऊस आपला मुक्काम वाढवतोच आहे. त्यामुळे अजून गवत हिरवं आहे. थोडी हळद लावली आहे. ती आडवी झाली आहे. हळदीची पानं सुकली, की कंद काढायला तयार झाले. घरच्यापुरती हळद झाली, तरी पुष्कळ. भोपळ्याच्या वेलावर दोन गरगरीत भोपळे दिसले. पण अजून हिरवेगार आहेत. वेळ आहे उतरवायला. प्रत्येक भागातली नवी-जुनी झाडं बघत पुढे जात होतो. पावसाळ्याच्या दिवसात वेली अगदी वेगाने वाढतात. आवळ्याच्या झाडांच्या खरबरीत खोडाला पकडून आवळ्याला वेढून टाकतात. थोड्या दिवसात आवळ्याला मोहोर येईल. त्याची पूर्वतयारी म्हणून काही झाडांवर चढलेले वेल कापून त्यांना मोकळं केलं. पुढे गेल्यावर गायी चरायला बांधलेल्या दिसल्या. ऋषी पंचमीच्या दिवशी शेतावरच्या गायीला कालवड झाली. अशा शुभ दिवशी जन्माला आलेल्या त्या बाळाचं नाव आहे ‘पंचमी’. मागच्या वेळी बघितलं, तेव्हा गोठ्यात असायची. आता मात्र पंचमी वासरू आता तिच्या आईबरोबर म्हणजे शुभ्राबरोबर शेतात फिरायला लागली. थोडं गवतही खायला लागली. जन्मल्यावर ती दिसायची हरणासारखी आणि बदकासारखी फेंगडं चालायची. त्यामुळे आम्ही गमतीने ‘नक्की काय मॅटर आहे हे!’ असं म्हणायचो. दिड-दोन महिन्यात चांगली खुटखुटीत झाली आहे. तिच्या मऊ-मऊ अंगावरून हात फिरवला. मानेखाली खाजवलं. ती लाड करून घेत होती, पण घाबरतही होती. सोडल्यावर लगेच आईजवळ जाऊन चिकटून उभी राहिली. 




शेताचा भाग भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. आसपासच्या शेतातील सोनेरी भात कापणीला तयार झालाय. 
पावसाचे दिवस चालू असताना शेतावरची सगळी झाडं समाधी अवस्थेत असल्यासारखी शांत होती. आता ऋतू बदलायची वेळ आली. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला भुरळ घालणारा मार्गशीर्ष महिना येईल. शरद ऋतूतील सुखद हवामानात  ध्यान लावून बसलेली झाडं हळूहळू जागी होऊ लागली आहेत.  नवीन कोवळी चमकदार पानं, फुलं आणि त्यामागून फळं येण्याचे दिवस आले. फणसाच्या झाडावर फुलं आणि करंगळीएवढे लांब फणस दिसत आहेत. फणसाच्या फुलांना सौम्य वास असतो. आंब्याच्या मोहोराचा वास घमघमतो. तसं फणसाचं नाही. पण झाडाखाली उभं राहिलं, तर तो वास निश्चित जाणवतो. बोराच्या झाडावर फुलं दिसायला लागली आहेत. काजूच्या झाडांवर नवी, कोवळी, लालसर पानं आणि चुकार कळ्या दिसत आहेत. चिकूच्या झाडांनाही नवी पालवी फुटली आहे. चिकूची जी रोपं गेल्या दोन वर्षात लावली आहेत, ती कमरेएवढी उंच आहेत. त्या रोपांवर सध्या खाली गर्द हिरवी जुनी पानं आणि वर पोपटी पानं असा दुरंगी साज आहे. आता पुढचे दिवस अशा गमतीचे असतात. प्रत्येक वेळी कुठल्यातरी झाडाला फुलं-फळं लागलेली दिसतात. इतकी फळं निर्माण करण्यामागे निसर्गाचा उद्देश्य माणसाला किंवा बाकीच्या जीवसृष्टीला खायला मिळावं हा नसतो. वंश पुढे जावा, जीवनाची साखळी पुढे चालू राहावी, इतक्या फळांच्या बियांमधल्या थोड्या तरी रुजाव्या ह्या आदिम  उद्देशाने निसर्ग भरपूर फळांची निर्मिती करतो. ह्या विपुल भांडाराचं प्रत्येक वेळी आश्चर्य वाटतं.. 



पोपटी, पिवळसर पेरू, चिकू, थोडे आवळे मिळाले. एक-दोन पॅशनफ्रूट सापडली. असा मेवा गोळा करून परत येतोय, तर ज्या आजोबांना सकाळी शेतापाशी सोडलं, ते मदतनिसांशी बोलत बसलेले दिसले. पुढे जाऊन विचारल्यावर म्हणाले,’मघा घरी गेलो. आमच्या मंडळींना सांगितलं की साहेब बाहेरगावी गेले होते ते आले परत. त्यांनी गाडीतून सोडलं मला. तर आमच्या मंडळी म्हणाल्या, त्यांना प्रसाद दिला की नाही? नाही म्हटल्यावर माझ्यावर खवळल्या. प्रसाद घेऊन धाडलं मला लगेच!!’ झालं. आम्हाला वाटलं होतं की आज आपण आजोबांचे चालायचे कष्ट वाचवले. पण आम्हाला प्रसाद मिळावा, म्हणून ते बिचारे परत तेवढंच चालत आले. प्रसादाची आमटी, इंद्रायणी तांदुळाचा भात, शिरा आणि थोडे फराळाचे पदार्थ. ‘डबा मोकळा करून द्या, म्हणजे मी जातो.’ हे पालुपद चालू. शेतावर आमच्याकडे भांडी, पातेली काही नाहीयेत. मग जेवायला नेलेल्या दोन ताटल्यांमध्ये अन्न काढलं. डबे स्वच्छ करून, त्यात थोडी फळं, रताळी घालून दिली. आजोबा हळूहळू चालत घरी जायला निघाले. त्या प्रसादाच्या आमटी-भाताचा सुगंध येत होता. एक ताटली मदतनिसाला दिली. एक घास कोकोला दिला. जेवायची वेळ नव्हती, तरी आम्ही प्रसाद खायला सुरवात केली. गरम, सुग्रास अन्न खाऊन तृप्त झालो. 


थोडा वेळ काहीबाही काम केलं. नंतर पावसाची लक्षणं दिसायला लागली, त्यामुळे घाईघाईने निघालो. शेत ते कार ह्या रस्त्यात कोको आमची सोबत करते. कधी महेश बरोबर जाते तर कधी माझ्या मागे येते. आम्ही गाडीत बसेपर्यंत पायात घोळत असते. गाडी सुरू झाली की पार गावापर्यंत गाडीच्या पुढे धावत असते. माळावर गायी-म्हशी चरत असल्या, त्यांच्या आसपास बगळे-टिटव्या उडत असले, तर त्यांच्याबरोबर खेळायला जाते. कोणी गुरं राखणारे असले, तर त्यांच्याशी मैत्री करायला जाते. तिचं असं निर्भरपणे कुठेही मोकळं बागडणं बघायला फार गंमत वाटते आणि तिने कंपाउंडच्या आत सुरक्षित रहावं असंही वाटतं. पण हे कंपाउंड, ही सीमारेषा, आत-बाहेर हे तिला कुठे माहिती आहे? तिच्या दृष्टीने हे सगळं तिचंच आहे. एका कागदावर सही केल्यावर जमिनीच्या एका तुकड्याला आम्ही ‘आमच्या मालकीचा’ म्हणू लागलो. तिथे झाडं लावली. पाण्याची व्यवस्था केली. ती झाडं ‘आमची’ आहेत का? खूप प्रयत्न केले, तरी काही झाडं वाढत नाहीत आणि कुठलं तरी कोपऱ्यातलं झाड पाहतापाहता डोक्यावर जातं. असंख्य जीवजंतू, कीटक, पक्षी आणि प्राण्यांचं घर असलेला तो तुकडा ‘आमचा’ कसा म्हणावा? खरं तर हे जग त्यांचं आहे, त्यांच्यामुळे चालू आहे. निसर्गापुढे माणूस आणि बाकीचे सगळे जीव सारखेच. फरक इतकाच की बाकी कोणाला ‘ना कुछ तेरा, ना कुछ मेरा, दुनिया रैनबसेरा’ हे तत्त्व शिकवावं लागत नाही आणि कितीही शिकवलं तरी माणसं ते शिकत नाहीत. 





________________________________________________________________

जीवन ज्योती कृषी : शेतीविषयावरील लिखाण 


दिव्याखाली अंधार

https://aparnachipane.blogspot.com/2020/07/blog-post.html


आम्र-विक्री योग

https://aparnachipane.blogspot.com/2019/09/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग एक 

https://aparnachipane.blogspot.com/2020/09/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग दोन 

https://aparnachipane.blogspot.com/2020/09/2.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग तीन 

https://aparnachipane.blogspot.com/2020/10/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग चार 

https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post_21.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग पाच 

https://aparnachipane.blogspot.com/2023/11/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग सहा 

https://aparnachipane.blogspot.com/2024/02/blog-post.html


जीवनज्योती कृषी डायरी भाग सात 

https://aparnachipane.blogspot.com/2025/01/blog-post.html



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जीवन ज्योती कृषी डायरी - भाग ७ धीरे धीरे रे मना.....

आनंदाचा कंद : लंपन