मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून… 

लेखक अशोक जैन

श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत. राजधानीतून…’ ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागात, जैनांना दिसलेल्या दिल्लीबद्दल, ते तिथे असताना घडलेल्या काही घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल लिहिलं आहे. दुसऱ्या भागात त्यांनी लिहिलेल्या सुमारे पाचशे वार्तापत्रांपैकी काही निवडक वार्तापत्रे दिली आहेत. अत्यंत वेधक अशा आठवणी मार्मिक, ओघवत्या भाषेत लिहिल्या असल्याने पुस्तक वाचायला फार मनोरंजक झाले आहे. आता ह्या पुस्तकात उल्लेख असलेले फारच कमी नेते राजकारणात सक्रिय आहेत. काही निवृत्त झाले, काहींना जनतेने निवृत्त केलं तर काही काळाच्या पडद्याआड गेले. ज्या संसद भवनाबद्दल, सेंट्रल हॉलबद्दल लिहिलं आहे, तिथे अजून काही वर्षात अधिवेशनं होणार नाहीत. ते सगळं नवीन ठिकाणी जाईल. तरीही हे पुस्तक वाचताना मजा येते. मी विद्यार्थीदशेत असताना ह्यातली बरीचशी वार्तापत्रं प्रत्यक्ष वाचलेली आहेत. राजकारणातल्या घडामोडी समजून घेण्यात रस असल्यामुळे आवडीने वाचायचे. बऱ्याच वर्षांनी तीच वार्तापत्रं पुस्तक स्वरूपात वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!

सोमवारच्या वृत्तपत्रासाठी मजकुराची थोडी चणचण असते. त्यासाठी साप्ताहिक सदरं सोमवारी प्रसिद्ध करायची पद्धत होती. राजधानीतून’ हे सदर तेव्हा फार लोकप्रिय होतं. सर्वसामान्य वाचक तर ते आवडीने वाचत असत. पण आमदार, खासदार, नेते, मंत्रीदेखील आपल्याबद्दल छापून येणारी टिपणी गांभीर्यपूर्वक घेत असत. बरं, तो फॅक्ससारख्या सोयी येण्याआधीचा काळ. त्यामुळे सोमवारचं वार्तापत्र त्यांना गुरुवारी लिहून मुंबईला पाठवावं लागे. संपादक गोविंदराव तळवलकरांमुळे त्या साप्ताहिक लिखाणाला जैनांच्या वर्तुळात ‘गोविंदविडा’ असं गमतीदार नाव मिळालं होतं.

जैन ज्या काळात दिल्लीत होते, तेव्हा दिल्ली खरंच खूप दूर होती. खाजगी वृत्तवाहिन्या, चोवीस तास बातम्यांचा रतीब घालणारी चॅनल्स, जगातल्या कानाकोपऱ्यातील बित्तंबातमी क्षणोक्षणी पोचवणारं इंटरनेटचं जाळं, ह्यातलं काहीच तेव्हा अस्तित्वात नव्हतं. त्या काळात ‘मीडिया’ ह्या प्रकरणाची व्याप्ती रोजचं वर्तमानपत्र, रेडिओवरच्या बातम्या आणि बाल्यावस्थेत असलेलं दूरदर्शन इतकीच होती. त्यापैकी आकाशवाणी आणि दूरदर्शन पूर्णपणे सरकारी. त्यामुळे वर्तमानपत्र अथपासून इतिपर्यंत वाचणे, ही सवय तेव्हा बहुतेकांना असायची. एखादी गोष्ट पेपरमध्ये छापून येणे, ह्याला वजन होतं. छापलेल्या अक्षरांवर विश्वास ठेवण्याचे दिवस होते!! बातमीमागची बातमी आणि घडलेल्या घटनेच्या आसपासच्या घडामोडींबद्दल जाणून घ्यायचा वर्तमानपत्र हा एकमेव मार्ग होता. त्यामुळे वार्ताहराने जबाबदारीने लिहावं, अशी अपेक्षा असे. वाचकांची ही अपेक्षा जैनांनी व्यवस्थित पूर्ण केली. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत जैनांना कधीही चुकीच्या बातमीसाठी दिलगिरी व्यक्त करावी लागली नाही. श्री. गोविंदराव तळवलकरांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. कुठली बातमी करायची किंवा नाही करायची ह्या बाबतीत गोविंदरावांनी किंवा टाइम्स व्यवस्थापनाने कधीही ढवळाढवळ केली नाही, असं जैन नमूद करतात. कधी कोणी नेत्याने नाराज होऊन तक्रार केली, तर ‘जैनने बातमी दिली आहे, म्हणजे ती बरोबरच असणार’ असं परस्पर उत्तर मिळायचं.

साहित्याच्या जगात पूर्णपणे रमलेल्या श्री. अशोक जैन ह्यांना राजकारणाची मुळात आवड नव्हती. त्यांचा पिंड साहित्य, संगीतात, माणसात रमण्याचा होता. दिनकर गांगल, अरुण साधू, कुमार केतकर अशा अनेक दिग्ग्जजांबरोबर तेही ग्रंथालीत सक्रिय होते. ग्रंथाली ही केवळ प्रकाशनसंस्था नव्हती. १९७० च्या दशकातील ती एक वाचक चळवळ होती. नवे लेखक शोधून त्यांना लिहिण्यासाठी उद्युक्त करणे. त्यांची पुस्तकं प्रकाशित करणे. साहित्यप्रसार व्हावा, वाचन संस्कृती रुजावी ह्या उद्देशाने अगदी लहान गावांमध्ये पुस्तक प्रदर्शने, लेखकांच्या मुलाखतींचे कार्यक्रम ग्रंथाली करत असे. हे काम जैनांना अगदी मनापासून आवडत असे. ह्या आवडींना सुसंगत असं काम त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये मिळालं होतं. नवीन इंग्रजी सिनेमांचं परीक्षण ते ‘चित्रपश्चिमा’ ह्या सदरात लिहीत असत. असं सगळं सुशेगात चालू असताना अचानक त्यांची नेमणूक दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून झाली. काहीशा नाखुशीनेच जैन ह्यांनी त्यांची दिल्लीतील कारकीर्द सुरू केली. दिल्लीत त्यांना मुळीच करमेना. तिथल्या सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या माणसांचा, चेहऱ्यांपेक्षा मुखवटे जास्त आढळणाऱ्या वातावरणाचा त्यांना अगदी उबग आला. माननीय यशवंतराव चव्हाणांचा आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री.गोविंदराव तळवलकरांचा चांगला परिचय होता. जैनांनी चव्हाणांना भेटून तुम्ही ‘जैनला इथलं काम जमत नाही. त्याला मुंबईला बोलावून घ्या’ असं गोविंदरावांना सांगायची विनंतीही केली होती. यशवंतरावांनी जैनांची समजूत घातली. ‘प्रत्येक पत्रकाराने किमान पाच वर्षे दिल्लीत राहायला हवं. इथलं राजकारण जवळून बघितल्यामुळे दृष्टिकोन व्यापक होतो. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कुठे आहे, हे कळत. तुम्ही थोडी कळ काढा.’ असं सांगून त्यांना दिल्लीत राहायला प्रोत्साहन दिलं. हळूहळू त्यांना दिल्लीचा ताल सापडला, तिथल्या संवादाची लय कळली.

राजकारण, तेही भारताच्या राजधानीतलं राजकारण हा दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चालणारा क्रूर खेळ आहे. राजकारणाचे डावपेच आणि प्रति-डावपेच जिथे सतत चालू असतात, ते शहर म्हणजे दिल्ली. आघाड्या, कुरघोड्या करणे आणि बिघडणे हे सतत चालूच असतं. सत्तानारायणाची आळवणी हाच ह्या शहराचा धर्म. एकदा जैन आणि एक नेते चहा घेत होते. तेव्हा एक चमचा खाली पडून तुटला. तेव्हा त्या नेत्यांनी ‘कमाल आहे! ह्या दिल्लीत चमच्यांना काही होत नाही. कप फुटतात. चमचे मात्र अलगद ह्या कपातून त्या कपात जातात’ असं तिथल्या ‘चमचे’ संस्कृतीचं वर्णन केलं होतं, ते अगदी बरोबर वाटतं. दिल्ली ही कायमची संक्रमण छावणी आहे, असं गमतीने म्हटलं जातं. भारताच्या निरनिराळ्या कोपऱ्यातून आलेले सरकारी बाबू इथे राहतात आणि निवृत्त झाल्यावर पुन्हा आपल्या गावी परत जायची स्वप्न पाहतात. एका अर्थाने ही राजकारण्यांचीही संक्रमण छावणीच आहे. गल्लीतले नेते कधी दिल्लीत येतील आणि दिल्लीतले गल्लीत जातील, ह्याचा नेम नसतो. त्यामुळे दिल्ली सर्वांची आहे पण दिल्ली कोणाचीच नाही, अशी परिस्थिती सदैव असते. एकीकडे गरिबांच्या झोपड्या, कशीबशी राहणारी माणसं तर दुसरीकडे ल्यूटन्स दिल्लीतले ऐटबाज बंगले, सुरेख-सुंदर-हिरवाईने नटलेल्या प्रशस्त बागा, रुंद-गुळगुळीत रस्ते. इंडिया आणि भारतातली ही दरी इथे काही किलोमीटरच्या अंतरात बघायला मिळते.

श्री. अशोक जैन दिल्लीत दाखल झाले, त्याच्या थोडंसं आधी म्हणजे १९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिराबाईंचा पराभव होऊन जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलेलं होतं. देशात एक आनंदाची, अपेक्षेची लाट आली होती. बंदिवासातून बाहेर पडलेल्या नागरिकांनी मोकळा श्वास घेता यावा, म्हणून मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या ह्या सरकारचा एक-एक चिरा दोन वर्षात ढासळायला लागला होता. त्या काहीशा निराशेच्या वातावरणात जैनांनी कामाला सुरवात केली. मोरारजीभाई देसाई, चरणसिंग ह्यांची पंतप्रधानपदाची अल्प कारकीर्द, १९८० साली इंदिरा गांधींचं थाटात झालेलं पुनरागमन आणि त्यांच्या आकस्मिक निधनानंतर १९८४ साली पंतप्रधान झालेल्या राजीव गांधीचे दिवस त्यांनी अगदी जवळून बघितले. त्या दरम्यान महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीही वेगाने बदलले. वसंतदादा पाटील, शरद पवार, अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण आणि पुन्हा एकदा शरद पवार इतक्या महाराष्ट्रातल्या सत्तांतराचे जैन साक्षीदार झाले.

हे काम करताना रोजचा संबंध नेते, कार्यकर्ते ह्याच्यांशी येणार, हे तर उघड होतं. पण कुठल्याच पक्षाचा शिक्का आपल्यावर बसू नये, ह्याबद्दल जैन अत्यंत जागरूक होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांची बऱ्याच नेत्यांशी मैत्री होती. यशवंतराव त्यांचे हीरो होते. मात्र त्यांच्या राजकारणाचे मावळतीचे दिवस, त्यांच्या उपेक्षेचा कालखंड जैनांना बघायला मिळाला. मधू लिमयेंनी त्यांना पं. मल्लिकार्जुन मन्सूरांच्या संगीताचा आनंद घ्यायला शिकवला, त्यांना स्वतःच्या हाताने खिचडी-पुलाव रांधून खाऊ घातला आणि जैनांच्या कन्येला तिच्या वयाला योग्य भाषेत शाळेचा निबंधही लिहून दिला. चिकित्सक दृष्टी, विश्लेषक मन असलेल्या श्री. मधू लिमयेंमुळे आपल्याला संशोधनाची गोडी लागली, असं जैन कृतज्ञतेने नमूद करतात. अत्यंत क्लिष्ट आणि अनाकर्षक असे निरनिराळ्या समित्यांचे अहवाल वाचायची सवय त्यांना लागली. त्यामुळे खूप गाजलेले ‘मौनी खासदार’ संशोधन ते करू शकले. मधू दंडवते अजून एक अभ्यासू, विद्वान खासदार. त्यांनी १९७७ साली रेल्वेमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं वाहन नव्हतं. तेव्हाचे सकाळचे प्रतिनिधी श्री.विजय नाईक ह्यांच्या स्कूटरवर डबलसीट बसून ते शपथ घ्यायला गेले होते. आज पन्नास वर्षांनंतर अशी कल्पनाही करणं कठीण आहे. श्री.दंडवतेंची मुलाखत घेणं फार सोपं. कारण प्रश्नही तेच सांगतात आणि उत्तरही! अशी मिस्कील टिपणी जैन करतात. नेत्यांचे स्वभाव, त्यांची राहणी, बोलण्याची- काम करण्याची पद्धत ह्यावर कुठेही पातळी न सोडता केलेले विनोद, कोट्या, निरीक्षणं पानापानावर वाचायला मिळतात. ते लिहायचे तर सगळं पुस्तकंच उतरवून काढावं लागेल.

सुरवातीला हे वार्तापत्र कसं लिहायचं ह्याची पकड आली नव्हती, तेव्हा रकाने भरून काढण्यासाठी कायकाय कॢप्त्या करता येतील, त्याबद्दल जैनांना बरेच गमतीदार सल्ले मिळाले. पण त्याकडे दुर्लक्ष करून सगळ्यांना दिसणाऱ्या बातमीमागची अदृश्य बातमी द्यायला आणि नुसत्या बातम्या न देता अनुभवांचे वर्णन करायला त्यांनी सुरवात केली. ते वाचकांच्या पसंतीस आलं. २६ जानेवारीला गणतंत्र दिवसाचं दिमाखदार संचलन झाल्यावर २९ जानेवारीला संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर ‘बिटिंग रिट्रीट’ समारंभ होतो. गणतंत्र दिवस सोहळ्याचा तो समारोप असतो. त्या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर वर्णन जैनांनी त्यांच्या एका वार्तापत्रात केलं होतं. बऱ्याच वाचकांना ते वाचून असा काहीतरी कार्यक्रम असतो, ह्याची माहिती मिळाली होती. वर्तमानपत्राच्या दिल्लीच्या विशेष प्रतिनिधीने साहित्य, कला क्षेत्रातील बातम्या द्याव्या, ही अपेक्षा नसते. पण कला-साहित्य-संगीत ह्या सगळ्यात रस असल्याने जैन ह्या बातम्या आवडीने पाठवत असत. हे केलं नसतं, तर २४ तास राजकारणात डुंबून राहिल्याने डोक्याचा पार भुगा झाला असता, अशी त्यांना खात्री होती.

संसद भवन म्हणजे भारतीय प्रजासत्ताकाचे मंदिर. इथल्या भिंतींनी सत्तेचे बदलणारे रंग बघितले. सत्तेच्या परावर्तित उजेडात चमकणारे ग्रह बघितले आणि मदांध सत्ता अस्ताला जातानाही बघितल्या. संसद भवनातील सेंट्रल हॉल म्हणजे गप्पांचा, वावड्यांचा आणि विनोदांचा उगम. रोजच्या रोज अनेक कहाण्यांना इथे जन्म मिळत असे. कोणाला सकाळी एखादा किस्सा सांगावा आणि संध्याकाळी तोच किस्सा भर घालून स्वतःचा म्हणून कोणीतरी ऐकवावा, असं जैनांच्या बाबतीत सेंट्रल हॉलमध्ये घडलं. तिथल्या लॉबीत महानायक अमिताभ बच्चन आणि अनेक चित्रतारे-तारका, कलाकार, राजकारण्यांशी निकटचा परिचय झाला. संसद भवनाच्या उपाहारगृहात सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ मिळत असत. एकदा जैन आणि अमिताभ कॉफी प्यायला गेले. दोघांचे मिळून १ रु. १० पैसे बिल झालं. अमिताभने शंभराची नोट पुढे केल्यावर कर्मचाऱ्याने सुट्टे पैसे नसल्याचं सांगितलं. अमिताभने त्या कर्मचाऱ्याला ९८ रु.९० पैसे टीप देऊन टाकली!! अमिताभला दोन रुपये उसने देण्याची संधी मात्र त्याने जैनांना दिली नाही, ह्याची त्यांना कायमची हळहळ वाटत राहिली… अमोल पालेकर, बाबा आमटे, विजय तेंडुलकर, गंगाधर गाडगीळ, ना.धों. महानोर ह्यांच्याबद्दलचे बरेच किस्से पुस्तकात आहेत. परंतु, ते मुळातूनच वाचलेले बरे.

जैनांनी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातल्या खासदारांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत केलेल्या कामाचा अभ्यास केला. लोकसभेच्या रोजच्या कामकाजाचा सायक्लोस्टाईल वृत्तांत दुसऱ्या दिवशी मिळत असे. रोजच्या कामकाजाची साधारण पाचशे पानं असतात. असे वर्षातले साधारण सहा महिने. अशी पाच वर्षे मिळून होणारा कागदपत्रांचा पर्वत जैनांनी वाचून काढला. महाराष्ट्रातले ४८ खासदार कधी, कोणत्या विषयावर बोलले, त्यांनी किती प्रश्न विचारले, ह्याचं सविस्तर टिपण तयार केलं. ह्या माहितीप्रमाणे ४८ पैकी १४ खासदारांनी पाच वर्षात एकदाही तोंड उघडलं नव्हतं. हा सगळा तपशील त्यांनी ‘राजधानीतून’ ह्या सदरात सविस्तर मांडला. संपादक गोविंदराव तळवलकरांनी त्यावर ‘मौनी खासदार’ असा अग्रलेख लिहिला. महाराष्ट्रात ह्याचा बराच बोलबाला झाला. ‘मौनी खासदार’ हा नवा शब्द राजकारणात रुळला. ज्या खासदारांची कामगिरी चांगली होती, त्यांनी ह्या लेखाच्या प्रती आपल्या प्रचारासाठी वापरल्या होत्या.

पुढे काँग्रेस पक्षानं ह्या चौदाही खासदारांना तिकीट दिलं आणि त्यातले नऊ पुन्हा निवडूनही आले! ही एक वाढीव गंमत म्हणायची!!

निरस, कोरडं, संधीसाधू राजकारण रंजक, वेधक भाषेत सांगायची विलक्षण अशी हातोटी जैनांकडे होती. त्यामुळे चटकदार, मिस्कील किस्से आणि कहाण्या ह्या पुस्तकात भरपूर आहेत. मात्र कुठेही पातळी सोडलेली नाही. कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहून त्यांच्यावर बदनामीचा चिखल जैन उडवत नाहीत. राजकारणासारख्या विषयात असंही मजेदार लिहिता येतं, किंवा येत होतं हे आता खरं वाटत नाही. जैनांनी नंतर बऱ्याच पुस्तकांचे मराठी अनुवाद केले. उत्तमच केले. ज्या काळात देशाच्या राजकारणात खूप बऱ्या-वाईट घडामोडी घडल्या, अशा एका महत्त्वाच्या कालखंडाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. अत्यंत सुंदर, प्रसन्न लिखाणाची शैली त्यांना लाभली होती. आपल्या लिखाणात, बातम्या देताना काही चूक राहू नये म्हणून परिश्रम घेण्याची तयारी होती. असं सगळं असूनही ‘राजधानीतून’ आणि ‘कानोकानी’ ह्या पुस्तकांव्यतिरिक्त राजकारणाशी संबंधित स्वतंत्र लिखाण त्यांनी केलं नाही. बऱ्याच दीर्घ आजारपणानंतर २०१४ साली त्यांचं निधन झालं. अशी सूक्ष्म आणि मार्मिक निरीक्षणं, राजकारण्यांचे स्वभावविशेष टिपण्याची आणि खुसखुशीत शैलीत मांडण्याची खुबी असलेलं लिखाण आता कधीच वाचायला मिळणार नाही, ह्याची हळहळ कायमच वाटत राहील.

मला आवडलेल्या अन्य काही पुस्तकांबद्दल

  • राजधानीतून… लेखक अशोक जैन

https://aparnachipane.blogspot.com/2023/05/blog-post.html
  • केतकर वहिनी लेखिका : उमा कुलकर्णी

https://aparnachipane.blogspot.com/2023/04/blog-post.html

  • थिओडोर बून (स्कँडल) लेखक : जॉन ग्रिशॅम

https://aparnachipane.blogspot.com/2017/08/blog-post_29.html

  • वाईल्ड स्वान्स :थ्री डॉटर्स ऑफ चायना लेखिका जुंग चँग

https://aparnachipane.blogspot.com/2019/11/blog-post.html

  • ओपन लेखक : आंद्रे आगासी

https://aparnachipane.blogspot.com/2017/07/blog-post.html

  • काबुलनामा लेखक : फिरोज रानडे

https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post_76.html

  • गौरी नावाचं गारुड

https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post.html


Comments

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५