मी वाचलेलं पुस्तक : केतकर वहिनी

 मी वाचलेलं पुस्तक : केतकर वहिनी

लेखिका : उमा कुलकर्णी

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस


लेखिका उमाताई कुलकर्णी ह्या मुख्यत्वे कन्नड-मराठी भाषांमधील अनुवादासाठी मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. भैरप्पा, शिवराम कारंथ, अनंतमूर्ती, सुधा मूर्ती, गिरीश कार्नाड अशा काही लेखकांनी कन्नड भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची ओळख त्यांनी मराठी वाचकाला आपल्या उत्तम अनुवादांमधून करून दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुनीता देशपांडे ह्यांचं ‘आहे मनोहर तरी’ हे मराठी पुस्तक कन्नडमध्ये भाषांतरित केलं आहे. ‘संवादु अनुवादू’ आणि ‘केतकर वहिनी’ ही त्यांनी लिहिलेली स्वतंत्र पुस्तकं आहेत. त्यातील ‘केतकर वाहिनी’ ह्या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘केतकर वहिनी’ म्हणजे मालतीबाई माधवराव केतकर. कोकणात चिपळूणजवळच्या करंबवणे ह्या गावात राहणाऱ्या स्त्रीची कथा उमाताईंनी ह्या पुस्तकात लिहिली आहे.

गेल्या शतकाच्या पूर्वार्ध. सातवी पर्यंत शिक्षण झालेली ही मुंबईतल्या मालाडची मुलगी १९३८ साली  कोकणातल्या अत्यंत दुर्गम खेड्यात लग्न करून गेली. त्यांचं सासर केतकर. केतकर त्या भागातले खोत होते. त्यांच्या मालकीची जवळपास दोन-अडीचशे एकर जमीन होती. आंब्यांची कलमं, मोठं घर-वाडी, सोनं-नाणं अशी सुबत्ता होती. सासरे सुस्वभावी होते. त्या परिसरात त्यांना ‘गोड खोत’ म्हणत. केतकर वहिनींना दहा नणंदा आणि एक दीर. दीर बाहेरगावी नोकरी करत. माधवराव शिकलेले होते. पण हा सगळा व्याप सांभाळण्यासाठी मूळ गावी राहतं होते. लग्नाच्या वेळी वहिनींना केतकरांच्या जमिनीचं किंवा सोन्या-नाण्याचं काही विशेष कौतुक वाटलं नव्हतं. वडील अकाली निवर्तल्यावर कर्जफेडीसाठी आपले सोन्याचे दागिने आईने विकल्याचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं.

वर्षानुवर्षे स्वयंपाकघर-माजघर आणि शेजघरात बंदिस्त असलेल्या स्त्रियांच्या काळोख्या आयुष्यात विसाव्या शतकाच्या सुरवातीला शिक्षणाची एक शलाका येऊ पाहतं होती. स्त्री शिक्षणाच्या अगदी सुरवातीच्या काळात वहिनींच्या नऊ नणंदा उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. ज्या काळी मुलींना अक्षरओळख झाली की पुरे. पोथी वाचता आली, हिशेब करता आले की डोक्यावरून पाणी, असं वातावरण होतं, तेव्हा ह्या केतकर सिस्टर्सनी परदेशात राहून उच्चशिक्षण घेतलं. नोकऱ्या केल्या. आयुष्याचे निर्णय स्वतः घेणाऱ्या ह्या बहिणींबद्दल समाजात खूप कुतूहल होतं. त्यांनी रूढ प्रवाहाविरुद्ध घेतलेल्या काही निर्णयाबद्दल टीकाही झाली होती. वहिनींच्या सासू-सासऱ्यांना आपल्या ह्या कर्तृत्ववान मुलींचा अभिमान होता आणि त्यांना सक्रिय पाठिंबाही. शिकलेल्या नणंदांच्या घरात आपल्यालाही पुढे शिकता येईल, अशी आशा वहिनींना वाटत होती. पण सासरच्या वाटेवरच्या कुचूकुचू काट्यांनी हे स्वप्न लगेचच भंगलं.

केतकर वहिनींची कन्या शकुंतलाताई पुंडे आणि उमाताई मैत्रिणी. साहजिकच उमाताईंच्या मनात ह्या प्रसिद्ध ‘केतकर सिस्टर्स’ बद्दल खूप कुतूहल होतं. करंबवण्याला गेल्यावर त्या प्रदेशाची दुर्गमता पाहताना त्या बहिणींच्या शिक्षणाची अपूर्वाई उमाताईंना अधिकच जाणवली. १९८४ साली पुंडे आणि कुलकर्णी दांपत्य मिळून करंबवण्याला गेले होते. तोपर्यंत ह्या खेड्यात वीज आलेली नव्हती. दळणवळणाच्या सोयी धड नव्हत्या. दोन बस बदलून पुन्हा शेवटी डोंगर-शेतातून तासभर चालत जावं लागत असे. चालायला धड रस्ताही नव्हता. शेताचे बांध. मधूनच पायवाट. मध्येच दोन्ही बाजूच्या झाडांमधून जाणारी वाट. पाचोळ्यावरून चालताना साप-विंचवाची भीती. अशा ह्या करंबवण्यातल्या ‘सुखनिवासात’ वहिनी गेली पंचवीस वर्षे एकट्या राहतं होत्या. तिथे राहत असताना उमाताईंना फारशा न शिकलेल्या, खेड्यात राहणाऱ्या पण ठामपणे पुढ्यात आलेलं आयुष्य जगणाऱ्या वहिनींच्या आयुष्याबद्दल खूप कुतूहल वाटायला लागलं. पुढे सहवासातून वहिनींचे आणखी पैलू कळत गेले आणि उमाताईंनी त्यांची ही पहिली स्वतंत्र कादंबरी लिहिली. गेल्या शतकातील स्त्री जीवन आणि त्या काळातही प्रतिकूल परिस्थितीचा, उन्मळून टाकतील अशा वादळवाऱ्यांचा ताठ मानेने आणि ताठ कण्याने सामना करणाऱ्या स्वतंत्र स्त्रीचं दर्शन आपल्याला ह्या पुस्तकातून घडतं.

उंच-सखल अशा पाच-सहा एकर जागेत केतकरांचं एकच घर होतं. घर पुष्कळ मोठं होतं. मागे मोठा डोंगर. घराच्या आसपास मोठमोठी झाडं. हाकेच्या अंतरात वस्ती नाही. माणूस दिसायची देखील मारामार. साप-विंचवापासून बिबटे-कोल्ह्यापर्यंत प्राणी सदैव सोबतीला. कोकणाचा भाग म्हणजे प्रचंड पावसाळा आणि कमालीचा उकाडा. आसपासच्या डोंगरांवर नेहमी वणवे लागत असत. एरवीच नजरेला माणूस दिसणं अवघड. संततधार पडणाऱ्या पावसात तर एखाद्या निर्जन बेटावर राहत आहोत, असं वाटत असे. हळूहळू त्या कोकणातल्या आयुष्याशी समरस झाल्या. घरकाम, आला-गेला, झाडांचं-गुरांचं करणं ह्यात रमून गेल्या. पुढे त्यांच्या संसारात बाळपावलं आली. इतक्या लहान खेड्यात शिक्षणाच्या धड सोयी नव्हत्या. त्यामुळे आपला एक मुलगा आणि तीन मुलींना त्या घरीच शिकवत असत. सात-आठ वर्षांची झाली की मुलं मध्य प्रदेशात राहणाऱ्या काकांकडे किंवा एखाद्या आत्याकडे शिकायला जायची.

भारताला स्वातंत्र्य मिळालं. हळूहळू कायदे बदलू लागले. कूळ कायदा, कमाल जमीन धारणा कायदा असे कायदे आल्यावर गाव-खेड्यातलं वातावरण ढवळलं जाऊ लागलं. कुटुंबाच्या नावावर रगडा जमीन होती, पण उत्पन्न मात्र यथातथा होतं. त्या काळी अशी अवस्था बऱ्याच कुटुंबांची असायची. जमीन-जुमला भरपूर, पण हातात पैसा नसे. कुळाने खंड दिला नाही की कोर्ट-कचेरी करावी लागे. माधवराव केतकरांनी कायदे समजून घेतले होते. अशाच एका जमिनीच्या खटल्याच्या वादातून साधारण १९५० च्या आसपास माधवराव केतकरांचा खून झाला. आई-वडिलांचा आधार गेला. बहिणींचा लाडका भाऊ गेला. वहिनींवर तर आभाळच कोसळलं. त्यांच्या पदरात चार अजाण मुलं होती. त्या मुलांचं शिक्षण, लग्न-कार्य कसं होईल, ह्या विचाराने त्या वेड्यापिश्या झाल्या. माधवराव असे विपरीत परिस्थितीत गेल्यानंतर ‘तुमचा अण्णा खोत करून टाकू’ अशा धमक्या येणं, रात्रीबेरात्री घरावर दगड पडणं, गावातील लोकांनी पूर्णपणे असहकार करणं असे प्रश्न तर होतेच. पण घरातील समीकरणंही त्रासदायक होऊ लागली होती. घरात सारखी ‘माधवरावांच्या मागे वहिनी आणि त्यांच्या चार मुलांची जबाबदारी कोण घेणार,’ अशी चर्चा होत असे. ह्या वातावरणाचा परिणाम लहान लेकरांवर झाला नसता, तरच नवल. एकदा त्या आणि त्यांची मुलं होडीतून वसिष्ठी नदीतून जात होती तेव्हा त्यांची मुलगी त्यांना म्हणाली ‘वहिनी, आत्ता ही होडी बुडली, तर किती छान होईल ना, आपल्याला कोणी सांभाळायचा प्रश्नच राहणार नाही’

माधवराव गेले तेव्हा सासू-सासऱ्यांचं छत्र डोक्यावर होतं. सासरे अतिशय सुस्वभावी होते. वहिनींवर त्यांची माया होती. सासरे अगदी लहान असताना त्यांचे वडील गेल्यावर त्या कालच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या आईचं केशवपन केलं होतं. त्या घटनेचे व्रण अजूनही त्यांच्या मनावर होते. त्यामुळे माधवराव गेल्यावर त्यांनी वहिनींना ‘आमचा मुलगा गेल्याचं अपार दुःख आहे. तुझं पांढरं कपाळ बघून रोज ते दुःख वाढवू नकोस. आधी कुंकू लावत होतीस, तसंच लावत राहा’ असं ठामपणे सांगितलं होतं.

वयोमानाने सासू-सासरे निवर्तल्यानंतर मात्र त्यांना आपला चरितार्थ स्वतःच चालवायची वेळ आली. वहिनींचे वडील त्या लहान असतानाच निवर्तले होते. भाऊ वहिनींहून बरेच लहान. मुलं शिक्षणासाठी बाहेर. असं एका बाजूचं घर, मायेचं माणूस नाही, माहेरचा आधार नाही, जमिनींचे खटले चालू, पैशाचं पाठबळ नाही. आजच्या आधुनिक युगातही खचायला होईल अशी परिस्थिती. तेव्हा ना वीज, ना संपर्कांची साधनं, ना दळणवळणाच्या सोयी. अशा स्थितीत त्यांच्यापुढे दोनच पर्याय होते, एकतर कोणाच्या तरी वळचणीला खालमानेनी दिवस काढायचे किंवा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देऊन कायद्याची लढाई लढत राहायची. वहिनींनी दुसरा पर्याय निवडला.

माधवरावांनी, त्यांच्या वडिलांनी जमिनीच्या नोंदी अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या. ती कागदपत्रच आता त्यांची साथीदार आणि कोर्टात साक्षीदार झाली. आधीही त्या सासऱ्यांना कागदपत्रांच्या कामात मदत करायच्या. पण व्यवहारात फारसं लक्ष घातलं नव्हतं. आता पुढ्यातच आलं म्हटल्यावर धीर धरून त्यांनी वकील, कोर्ट, कायद्यातल्या तरतुदी सगळं हळूहळू माहिती करून घेतलं. एकट्या बाईला समाजात वावरताना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यात ह्यांच्याकडे माणूसबळ नाही. मग त्यांनी आपले नियम, आपल्या वागण्याचा परिघ ठरवून घेतला. त्याच्या आत पक्कं राहायचं हा निश्चय केला. आपल्या चारित्र्यावर, व्यवहारावर एकही शिंतोडा उडणार नाही, ह्याची काळजी घेत त्या पुढे जात राहिल्या. लहान गावात राहताना आसपासच्या माणसांचं खूप भान ठेवावं लागायचं. ज्या कुळाशी कोर्टात खटला चालू आहे, त्याच्याशी एरवी समजुतीने बोलायचं, त्याच्या अडीअडचणीला मदत करायची असं त्यांचं धोरण होतं. पण आपले पती कायद्याची लढाई लढत होते, आपल्या चरितार्थासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी तो लढा पुढे न्यायचा आहे, हे भानही होतं. अतिशय किचकट अशा न्यायालयाच्या प्रक्रियेतून त्या असंख्य वेळा गेल्या. शेतसारा, नोटीस, कागदपत्रं, सुनावण्या, निकाल, वसुली ह्या क्लिष्ट चक्रातून त्या वर्षानुवर्षे जात राहिल्या. एखाद्या निष्णात वकिलाच्या तोडीस तोड असं ज्ञान मिळवलं. ह्या सगळ्या प्रक्रियेत कुळांना त्रास व्हावा हा उद्देश नव्हता. सामोपचाराने प्रश्न सुटावे, हाच प्रयत्न असे. पण दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, आपल्या पायावर उभं राहता येईल, असं शिक्षण नाही अशी परिस्थिती. जमिनीतून येणारं उत्पन्न हेच चरितार्थाचं एकमेव साधन होतं. त्या जीवावर चार मुलांची शिक्षणं, लग्नकार्य ही जबाबदारी त्यांनी पार पाडली.

एक माणूस गेला, म्हणून काळ थांबत नाही. तसेच केतकर वहिनींचं आयुष्यही पुढेपुढे जात राहिलं. मुलांची शिक्षणं झाली. जावई, सून, नातवंडांनी त्यांचं घर भरलं. अगदी लहान वयात दुसऱ्याकडे राहून शिक्षण घेतल्यामुळे मुलांच्या मनात आईबद्दल थोडा दुरावा राहिला. पण वहिनींनी माधवरावांना अशा क्रूर पद्धतीने गमावलं होतं. तिथे मुलांना जवळ ठेवून विषाची परीक्षा घेण्याची त्यांची तयारी नव्हती. मुलं सुरक्षित राहावी, म्हणून त्यांनी आयुष्यभर आपल्या आईपणावर दगड ठेवला. जगंही पुढे गेलं. करंबवण्यात वीज आली. गावात बस येऊ लागली. दारापर्यंत रस्ता आला. सगळं बदललं. पण वहिनींच्या कोर्टाच्या फेऱ्या काही थांबल्या नाहीत. करंबवण्यातलं घर, सुखनिवास, त्या भोवतालाची झाडं, गोठ्यातल्या गाई-म्हशी, गावातली माणसं आणि त्यांची कोर्टातली कामं त्यांना शहरातून पुन्हापुन्हा ओढून आणत असत. मुलांनी कितीही आग्रह केला तरी त्यांच्या जीवाला घरची ओढ स्वस्थ बसू देत नसे

ह्या पुस्तकातला चांगला भाग म्हणजे नात्यातल्या अप्रिय भागांवर गोष्ट रेंगाळत नाही. त्या विषयाला नुसता स्पर्श करून विषय पुढं जातो. गॉसिपकडे झुकत नाही. इतके प्रसंग आले, तरी केतकर वहिनींच्या बोलण्यात बिचारेपणाचा स्पर्श नाही. त्यांचा कणखरपणा, आत्मविश्वास आणि वैयक्तिक तसंच आर्थिक बाबतीत कणभरही बालंट येऊ नये म्हणून घेतलेली काळजी जाणवत राहते. पुस्तकातले काही प्रसंग वाचताना मन अक्षरशः हेलावतं. त्यांच्या आईने कर्जफेडीसाठी नव्वद तोळे सोनं विकलं तो प्रसंग. त्यांच्या सासऱ्यांचे वडील निवर्तल्यानंतरचा प्रसंग. वहिनींच्या मोठ्या मुलीच्या लग्नात त्यांच्या अगदी कोवळ्या वयाच्या मुलाने कनवटीला सुपारी लावून देवक बसवलं तो प्रसंग. असे बरेच आहेत. त्या एकट्या राहतं असतानाचं वर्णन वाचायला फार त्रासदायक वाटतं. अशा कश्या ह्या धीर धरून राहिल्या असतील? असं सतत वाटतं. कोकणातला प्रलयकारी पाऊस, दिवसेंदिवस माणूस दृष्टीस पडणार नाही. माणसाच्या अस्तित्वाची चाहूलही लागणार नाही. टीव्ही-रेडिओसारखी बाहेरच्या जगाशी जोडणारी साधनं नाहीत. जीवाभावाचं माणूस नाही. आजचा, उद्याचा, परवाचा सगळे दिवस सारखे. आसपासची तीच झाडं, तेच डोंगर आणि वाऱ्याच्या आवाजातून आणि हालणाऱ्या सावल्यांतून होणारे अगोचराचे चित्रविचित्र भास. अशा विचित्र अवस्थेत कोणती शक्ती ह्या माउलीला धीर धरून राहायला बळ देत असेल? कोण जाणे?

वहिनी घरात एकट्या होत्या. पण एकटेपणा फक्त माणसं आसपास नाहीत, म्हणूनच येतो असं नाही. त्यापेक्षाही कठीण असतो, तो मनाचा एकटेपणा. डोक्यातले विचार, मनातले तरंग व्यक्त करायला जागा नसणे, हा एकटेपणा भरल्या घरातही असू शकतो. वहिनींची माधवरावांशी मैत्री होती. ते अशा विपरीत अवस्थेत जग सोडून गेले. त्यांचं मैत्र हरपलं. कुठल्या ना कुठल्या प्रकारे, कुठल्यातरी मितीत त्यांच्याशी संवाद होईल, अशी वेडी आशा त्यांनी उराशी बाळगली होती. बाकी कुटुंबीयाकडून होणारे त्रास, टोमणे, मुलांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची काळजी ह्या सगळ्यात त्यांना शल्य होतं ते आपलं मैत्र हरपल्याचं.

हे पुस्तक साधारण 2003 च्या सुमारास प्रसिद्ध झालं आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांचं हे वाचून झालंही असेल. मग आता हा परिचय लिहायचं काय कारण? २०२० मधल्या करोनाच्या साथीत आपण सगळेच घरात होतो.सगळीकडे सुन्न शांतता होती. त्या काळात शहरात, भर वस्तीत असूनही एकटं असल्याचा, सोबतीला कोणी नसल्याचा अनुभव आला. आधी वाचलेलं हे पुस्तक लॉकडाऊनच्या काळात वाचलं, तेव्हा केतकर वहिनींच्या एकटेपणाची जाणीव अधिक तीव्रतेने झाली.

केतकर वहिनी आधीच्या पिढीतल्या. नऊवारी लुगडं, केसांचा अंबाडा अशा वेषातल्या. फक्त सातवीपर्यंत शिकलेल्या. इंग्रजी न येणाऱ्या. चूल पेटवून चहा-जेवण करणाऱ्या. एखाद्या बाईचं असं वर्णन केलं तर सकृतदर्शनी जुनाट विचारांची, आधुनिकतेचा वारा नसलेली वाटेल. स्वतंत्र व्यक्तीचा जो साचा सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर असतो, त्यात केतकर वहिनी मावणाऱ्या नाहीत. सुरवातीला चूल आणि मूल इतकंच विश्व असलेल्या ह्या बाईचं जगणंच परिस्थितीने पणाला लावलं. पुस्तकाच्या पानातूनही त्यांच्यातलं तेजाचं स्फुल्लिंग आपले ‘वरलीया रंगा’ भुलणारे डोळे दिपवतात.

मला आवडलेल्या अन्य काही पुस्तकांबद्दल

  • केतकर वहिनी

लेखिका : उमा कुलकर्णी

  • थिओडोर बून (स्कँडल)

लेखक : जॉन ग्रिशॅम

https://aparnachipane.blogspot.com/2017/08/blog-post_29.html

  • वाईल्ड स्वान्स :थ्री डॉटर्स ऑफ चायना

लेखिका जुंग चँग

https://aparnachipane.blogspot.com/2019/11/blog-post.html

  • ओपन

लेखक : आंद्रे आगासी

https://aparnachipane.blogspot.com/2017/07/blog-post.html

  • काबुलनामा

लेखक : फिरोज रानडे

https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post_76.html

  • गौरी नावाचं गारुड

https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post.html


Comments

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५