जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-४ : आमची माती, आमची शेती

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-भाग ३ वाचण्यासाठी खालील लिंक बघा https://aparnachipane.blogspot.com/2020/10/blog-post.html हे सगळं सुरू झालं साधारण पंधरा-सतरा वर्षांपूर्वी. तोपर्यंत आम्ही आमच्या संसारात, नोकरी-व्यवसायात बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. सर्वसाधारण कुटुंबात सुरवातीच्या ज्या गरजा असतात, त्या असतात स्वतःच्या मालकीचं घर, चारचाकी असणे. त्या पूर्ण झाल्या होत्या. महेशच्या, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून शेतजमीन घ्यायचे विचार होते. त्याच्या एका नातेवाइकांच्या अशा एका शेतावर त्याने लहानपणीच्या सुट्ट्या घालवल्या होत्या, ते मॉडेल त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्यासाठी त्याची धडपड चालू होती. पुण्याच्या आसपास काही जमिनी बघूनही आलो होतो. पण अजून गणित जुळून आलं नव्हतं. आज तशीच एक फेरी होती. त्या ठिकाणी पोचलो. शेतजमीन म्हणजे नुसतं माळरान होतं. उन्हाच्या माऱ्यामुळे सोनेरी-पिवळं पडलेलं भरपूर गवत आसपास सगळीकडे होतं. आजूबाजूला बघितलं की लांबवर गावातल्या घरांची लाल कौलारू किंवा निळ्या पत्र्याची छपरं दिसत होती. त्याच्याही मागे पावसाळ्यातल्या धबधब्यांच्या खुणा अंगावर वागवणारे काळे...