दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग सातवा (अंतिम) - टेक्सास ते व्हर्जिनिया
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग सहावा : नेवाडा ते टेक्सास https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post.html
१० ऑक्टॉबर २०१९ व्हिडोर टेक्सास ते सलीडेल लुईझियाना
आजचा दिवस भरगच्च होता. डायव्हिंगचं अंतर साधारण अडीचशे मैल, म्हणजे आमच्या सरासरीपेक्षा जरा कमी होतं. पण दोन जागा बघायच्या होत्या. दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळापासून मुक्कामाची जागा अगदी जवळ होती. तसं नसेल तेव्हा फिरताना पुढच्या अंतराचं, संध्याकाळच्या गच्च रस्त्यांचं भान ठेवावं लागायचं. आज तसा काही प्रश्न नव्हता. निवांत फिरता येणार होतं.
आमच्या ह्या ट्रीपचा मुख्य उद्देश जास्तीतजास्त राज्यांना भेट देण्याचा असल्यामुळे आम्ही कुठल्याच राज्यात फार रेंगाळलो नाही. एखाद्या राज्यात तर एकही मुक्काम झाला नाही. टेक्सास राज्यात मात्र तीन मुक्काम झाले होते. आज निघाल्यावर लगेचच टेक्सासची हद्द संपली आणि आम्ही लुईझियाना राज्यात प्रवेश केला. सुरवातीचा बराचसा रस्ता ‘जंगल झाडीत’ लपलेला होता. उंच उंच झाडी आणि वळणाचा रस्ता. मध्येच लांबवर एखादं तळंही दिसत होतं. छान वाटत होतं. हवा चांगली होती. इतक्या झाडीमुळे ऊन लागत नव्हतं. रस्ता सोडून एखाद्या तळ्यापाशी जावं, असा मोह व्हायचा. पण जवळच आहे, अशा दिसणाऱ्या जागा प्रत्यक्षात बऱ्याच लांब असतात, हा अनुभव घेऊन झालेला असल्यामुळे ‘दुरून तळी साजरी’ असा जप करत गप्प बसले!! शिवाय आज ज्या दोन जागा बघायच्या होत्या, त्या पाण्याजवळच्या होत्या. त्यामुळे पाणी बघून डोळे थंडावणार होतेच.
हा सगळा हिरवा भाग संपला आणि आम्ही बॅटन रुश नावाच्या एका छानशा गावी पोचलो. यु.एस.एस. किड नावाच्या युद्धनौकेचं मिसिसिपी नदीच्या किनारी जतन केलेलं आहे, ते बघायला गेलो. नेव्हीमधून निवृत्त झालेली मंडळी आपले गणवेश आणि इतर बिरुदं मोठ्या अभिमानाने मिरवत होती. इथे आलेल्या प्रवाशांना तिकीटे, माहिती देणं, तिथल्या भेटवस्तूच्या दुकानाची व्यवस्था बघणं ही सगळी कामं ह्या लोकांकडे होती. आम्हीही तिकिटं घेऊन बोटीकडे निघालो.
एक लहानसा पूल ओलांडून बोटीत पोचलो. सगळ्यात आधी डोळ्यात भरलं ते मिसिसिपी नदीचं पात्र. रुंद पात्र, स्वच्छ पाणी. मला पाण्याचं फार आकर्षण आहे. पाणी दिसलं की मी खूष!! एकेकाळी कल्याणच्या खाडीवर पोहणे, हा आयुष्यातला मुख्य कार्यक्रम होता, तेव्हा पाणी दिसलं की पोहायला उतरायचं हा अलिखित नियम होता. ‘चला, चार हात मारूया’ हे बोधवाक्य होतं. आता तसं करणं अशक्यच आहे. पण पाणी दिसलं की मी कल्पनेत का असेना, त्यात उडी मारून पोहून येते!!
बोट फार मोठी नव्हती. हातात नकाशा होताच. त्याच्या मदतीने खलाशांच्या राहण्याची सोय, मॅप रूम, दारुगोळा साठवण्याची कोठारं असं बरंच कायकाय बघितलं. दुसरं महायुद्ध, कोरिया युद्ध, शीतयुद्ध अशी देशाची सेवा करून निवृत्त झालेली ही बोट आहे. बघून झाल्यावर संग्रहालय बघायला गेलो. तिथे त्या राज्यातल्या हुतात्म्यांची माहिती होती. असं सगळं बघून झाल्यावर पुन्हा गाडीत बसलो आणि न्यू ऑर्लिन्सच्या रस्त्याला लागलो.
फ्रेंच क्वाटर्स. ह्या जागेवर सतराव्या शतकात फ्रेंच लोकांचं राज्य होतं. त्यामुळे इथल्या बऱ्याच रस्त्यांना फ्रान्समधल्या राजघराण्यातील व्यक्तींची आणि कॅथॉलिक संतांची नाव दिलेली आहेत. पण इथली भरभराट झाली ती स्पॅनिश अमलाखाली. त्यामुळे इथल्या इमारतींच्या वास्तुशैलीवर स्पॅनिश शैलीचा अधिक पगडा आहे. हा सगळा भाग अमेरिकेचा राष्ट्रीय वारसा म्हणून जतन केलेला आहे. जॅझ संगीताची सुरवात ह्याच भागात झाली. एप्रिल-मे महिन्यात इथे जॅझ फेस्टिव्हल असतो, तेव्हा संगीताचे दर्दी इथे गर्दी करतात.
आम्ही गेलो होतो, तेव्हा असा काही फेस्टिव्हल नव्हता. तरीही ही जागा म्हणजे खूप मोठी जत्रा आहे, असं वाटलं. सगळीकडे मजा चालू होती. गाणी-नाच-कसरती-जादूचे प्रयोग अशी गंमत चालू होती. उत्साह, हसण्या-खिदळण्याला ऊत आला होता. बार आणि पब्जमध्ये चाललेली धमाल फसफसून रस्त्यावर येत होती. आम्हीही त्या मजेत सामील होऊन हिंडत होतो. बोहेमियन कपडे, दागिने ह्यांची दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, गेस्ट हाउस अशी भाऊगर्दी होती. पर्यटकांच्या यच्चयावत गरजा पूर्ण होतील, असा सेटअप होता.
फिरत फिरत जॅक्सन स्क्वेअरमध्ये आलो. मोठं पार्क, चर्च आणि प्रचंड मोठा चौक. इथे अजून मोठी जत्रा होती. समोर बसवून लगेच आपलं कॅरिकेचर काढून देणारे चित्रकार, टॅरो कार्ड किंवा हात बघून भविष्य सांगणारी मंडळी बसली होती. एकीकडे गाण्याचे-वाद्यांचे आवाज घुमत होते, कुठे गर्दीच्या वर्तुळात गमतीचे खेळ चालू होते. हे सगळं बघत बघत आम्ही नदीकाठी आलो. एकीकडे पाण्याचा संथ-शांत प्रवाह आणि दुसरीकडे ‘खिलाना-पिलाना‑हसना‑हसाना’ चा गडबडीचा प्रवाह वाहत होता. दोन्हीचा आनंद घेत थोडावेळ तिथेच थांबलो. निघताना पाण्याच्या कडेला एक जाळी आणि त्यावर लावलेली असंख्य कुलुपं दिसली. आधी हा काय प्रकार आहे, ते कळलं नाही. मग जवळ जाऊन बघितलं तेव्हा तिथले ‘Love Wins’ वगैरे सुविचार वाचल्यावर ही कुलुपं म्हणजे ‘तुम्हे दिलमें बंद करके दर्यामें फेक दू चाबी!!’ ह्या गाण्याचा अमेरिकेतील प्रेमिकांनी वाक्यात उपयोग केलेला आहे, हे लक्षात आलं….
११ ऑक्टोबर २०१९ सलीडेल लुईझियाना ते गार्डनडेल ,अलाबामा
काल फ्रेंच क्वाटर्समध्ये फिरताना इतकी मजा येत होती की आपण नक्की किती फिरलो, हे कळलंही नाही. हॉटेलमध्ये आल्यावर मात्र त्या चालण्याचा शीण जाणवला होता. त्यामुळे लवकर उठायचं असं ठरवूनही जरा उशीरच झाला. मग घाईघाई आवरून ब्रेकफास्ट केला, सामानाच्या मुसक्या बांधल्या आणि जायला निघणार तेवढ्यात चक्क वीजपुरवठा खंडीत झाला!! मायदेशी जी शक्यता कायम गृहीत धरावी लागते, ते इथे अमेरिकेत होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. वादळ-बर्फ असलं काही अपरिहार्य कॅटॅगरीतलं कारणही नव्हतं. हॉटेल होतं तीन मजली आणि आम्हीच हौसेने तिसऱ्या मजल्यावरची खोली मागून घेतली होती. थोडा वेळ थांबून काही प्रगती होते का ह्याची वाट बघितली. पण सगळं आवरून झाल्यावर नुसतं बसायला कंटाळा आला. मग काय, सगळं सामान उचलून जिने उतरलो आणि हाश्श‑हुश्श्य करत गाडीत जाऊन बसलो. आता ह्या रूटीनची इतकी सवय झाली होती, की गाडी सुरू केल्यापासून पहिल्या पाच मिनिटात आम्ही व्यवस्थित सेटल व्हायचो. कुठे काय ठेवायचं, कधी काय लागतं हे गणित अगदी हातच्यांसकट पक्कं झालं होतं.
साडेतीनशे मैल अंतरातलं तीनशे मैल संपवून आम्ही बर्मिंगहॅमला पोचलो. नाही, नाही. ते राणीचं बर्मिंगहॅम नाही. हे वेगळं. अमेरिकेत ही मजेदार गोष्ट आहेच. जगभरातल्या जवळपास सगळ्या प्रसिद्ध शहरांची नावं इथल्या शहरांना मिळालेली आहेत. आम्ही फिरताना गमतीत म्हणायचो की त्या अर्थाने अमेरिकेत फिरलं की जगभर फिरल्यासारखंच आहे!! अलाबामा राज्यातल्या ह्या अमेरिकन बर्मिंगहॅममध्ये व्हिन्टेज मोटरस्पोर्ट्स म्युझियम आणि त्याला लागून रेसट्रॅक अशी जागा आहे, ती बघायला गेलो. अगदी जुन्या काळातल्या व्हिन्टेज बाइक्सपासून अत्याधुनिक बाइक्स आणि रेसकार्स मिळून जवळपास सोळाशे वाहनं आहेत. चिरपरिचित अशा बजाज M-80 आणि स्कूटरची मूळ डिझाइन्स बघून मजा वाटली.
गाड्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर त्या इमारतीच्या मागे कार रेसिंग ट्रॅक होता, तो बघायला गेलो. शर्यतीच्या गाड्या सूं सूं करत पळत होत्या. आत्ता स्पर्धा चालू नव्हती. प्रॅक्टिस राउंड होते. त्या ट्रॅकवरून जाणारा एक पूल होता, तिथे बघण्यासाठी बरेच लोकं थांबले होते, आम्हीही थोडावेळ बघितलं. महेशला ह्या प्रकाराची फारच आवड आहे, त्यामुळे त्याला मजा येत होती. त्या पुलाच्या काही भागात काचेची जमीन होती. तिथूनही गाड्या दिसत होत्या. थोड्या वेळाने पलीकडे बाग होती, तिथे गेलो. छोटीशी तळी, झाडं, हिरवळ, बसायला बाक अशी छान जागा होती. एका वळणावर एक मोठा साप दिसल्यावर मी अस्फुट का काय म्हणतात तशी किंचाळले. मग तो खोटा आहे, हे लक्षात आल्यावर त्या सापाला कुरवाळतानाचा फोटो काढून घेतला! थोडा वेळ तिथे आरामात बसलो. बाहेर पडताना एका ठिकाणी मोठा जगाचा नकाशा होता. भेट देणाऱ्या मंडळींनी आपल्या गावावर पिन लावायची, अशी कल्पना होती. आम्ही कल्याण, पुणे, धुळे सगळ्या गावावर ठसा उमटवला आणि बाहेर आलो.
ट्रीप सुरू करताना काय बघायचं, कुठे जायचं, राहायच्या जागा, जेवायचं कुठे सगळ्याच्या याद्या केल्या होत्या. एकेक दिवस पुढे सरकत गेला, तशी यादी लहान होत गेली. आज तर ह्या सगळ्याच याद्या संपल्या. नवीन राज्यांच्या यादीतलं शेवटचं राज्य अलाबामा होतं. तिथे पोचलो होतो.बघायच्या जागांमधलं शेवटचं मोटरस्पोर्ट म्युझियम बघितलं आणि यादीतल्या शेवटच्या हॉटेलमध्ये चेक-इन केलं. उद्याचा मुक्काम मित्र कुटुंबाकडे आणि परवा रात्री घरी!!!
आजचा निवांत आणि मजेदार दिवस होता. आज मैत्रीण भेटणार होती. आमचं पुत्ररत्न शाळेत जायला लागलं तेव्हा त्याची त्याच्या वर्गातल्या मुलांशी मैत्री व्हायच्या आधी माझी त्याच्या वर्गमैत्रिणीच्या आईशी मैत्री झाली होती. नंतर शोध लागला की घरापासून अक्षरशः एक मिनिटाच्या अंतरावर राहते. मग मुलांना शाळेत नेणे-आणणे, त्यांचे खेळ, पालक सभा, कारणाशिवाय भेटून गप्पा-टाईमपास सगळं बरोबर होऊ लागलं. तिची माझी मैत्री फार चांगल्या मुहूर्तावर झाली असणार. त्यामुळे तिच्या मैत्रिणींच्या गोतावळ्यात मी अलगद सामावले गेले. पुण्यात कुठे, काय चांगलं मिळतं हे ज्ञान ह्याच मैत्रिणीमुळे मिळालं. मी ह्या मैत्रिणीमुळे खऱ्या अर्थाने पुण्यात स्थिरावले. आमची मुलं माध्यमिक शाळेच्या वयाची असताना हे लोकं अमेरिकेत आले. त्यालाही आता बरीच वर्षं झाली. मुलं मोठी झाली. शिक्षण संपवून आपल्या मार्गाला लागली. आम्ही अमेरिकेत आल्यामुळे आता ह्या सगळ्या मंडळींना भेटून मधल्या काळातल्या गाळलेल्या जागा भरायची नामी संधी होती.
आजचं ड्रायव्हिंगचं अंतर अगदीच कमी म्हणजे दोनशे मैल होतं. सकाळी जरा निवांत उठून सगळं आवरलं. यादीतल्या शेवटच्या हॉटेलमधून चेक-आउट करताना मिश्र भावना होत्या. जितके कष्ट त्या यादीला तयार करायला लागला त्यापेक्षा कमी वेळात ही यादी संपलीसुद्धा, असं काहीतरी फिलिंग येत होतं. सवयीनुसार सगळं सामान गाडीत चढवलं आणि निघालो. एकीकडे मैत्रिणीशी गप्पा चालूच होत्या. ‘बरेच दिवस घराबाहेर आहात. उद्या घरी जायची प्रॅक्टिस म्हणून तुम्ही इकडे येताय ना!’ अशी चेष्टा-मस्करी चालू होती.
निवांत वेगाने गेलो, तरी अंतरच कमी असल्याने चार तासात तिच्या दाराशी पोचलोदेखील. मग काय मजाच मजा. फिनिक्सला अश्विनीकडे गेलो होतो, तेव्हा चर्चेचा मुख्य विषय ‘कल्याण’ होता. आता तो ‘सहकारनगर-02, पुणे-०९’ हा होता. त्या बरोबर कॉमन ओळखीच्यांचे अपडेट्स, फारच वेगाने मोठ्या झालेल्या मुलांच्या बाळपणीच्या आठवणी, थोडं चटकदार गॉसिपही. ह्या सगळ्यातून वेळ काढून नाश्ते-जेवण-चहापाणी वगैरे. दिवस कसा संपला हे कळलं देखील नाही. रात्री सगळे मिळून बोर्ड गेम खेळलो. नंतर पुन्हा कॉफीबरोबर एक गप्पांचा राउंड झाला आणि अगदी डोळे मिटायला लागले तेव्हा जाऊन झोपलो. आजचा दिवस तर छानच गेला होता, रात्री झोपताना आता उद्या घरी जायचं ह्या कल्पनेने अजूनच छान वाटत होतं!
आज घरी जायचं ह्या कल्पनेने पहाटे लवकर जाग आली. घर सोडून चार दिवस झाले की मला कधी एकदा परत जाते, असं वाटायला लागतं. प्रवासाला जायची जेवढी उत्सुकता वाटते, त्यापेक्षाही घरी जायची जास्त वाटते. अगदी खरं सांगायचं तर ‘घरी जायचं’ ही भावना अनुभवायला मिळावी, हा माझा प्रवासाला जाण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश असतो! आजचं अंतर जरा जास्त होतं, त्यामुळे चटचट आवरून पटापट निघालो. बरीच वर्षे कोपऱ्यावर राहणारी, वाटेल तेव्हा भेटता येणारी, जिच्याबरोबर सूर-ताल-लय सगळंच जुळलं होतं ती मैत्रीण इतकी लांब गेली ह्या नेहमीच्या हळहळीवर ‘पुन्हा लवकर भेटूया, फोन तर चालू राहतीलच’ ह्या आश्वासनांची मलमपट्टी करायचा प्रयत्न केला. सगळ्यांचा निरोप घेऊन रस्त्याला लागलो.
हायवेला लागल्यावर अंतर वेगाने संपायला लागलं आणि घर जवळ येऊ लागलं. प्रवास संपत आल्यामुळे ‘का आलो होतो’ ह्या सनातन प्रश्न डोक्यात घिरट्या घालत होता. नवीन देश, नवा प्रदेश बघणे हा एक उद्देश तर होताच. पण आमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या स्थित्यंतराला लवकरच सामोरं जाणार होतो. एका अर्थी ही ट्रीप त्या बदलाची नांदी होती. मुलाचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. आता तो नोकरीनिमित्त अमेरिकेत राहणार होता आणि आम्ही इथून गाशा गुंडाळून पुण्याला कायमचे परत जाणार होतो. इतकी वर्ष कामाच्या, घरच्या, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या ह्यांचा भोज्या करून लपाछपी, शिवाशिवी करण्यात पळून गेली. इतक्या गोष्टी सतत घडत असायच्या. ऑफिसची कामं, मीटिंग, प्रवास, घर चालवणे, आजारपणं, लग्नकार्य, पैशाच्या व्यवस्था, मुलाला वेळ देणे, त्याचा अभ्यास-खेळ. मुठीतली वाळू गळून गळून जावी तशी ही घाई-गडबडीची वर्ष संपली. आता आयुष्याचा वेग संथ झाला होता. आता ‘तू तिथे मी’ च्या टप्प्यावर एकमेकांची पुन्हा नव्याने ओळख करून घ्यावी असं वाटत होतं. तसा संसाराचा रौप्यमहोत्सव नुकताच झाला होता. पण आता सगळी परिमाणं बदलली होती, प्राधान्यक्रम बदलले होते. आता एकमेकांबरोबर, एकमेकांसाठी जगायचे दिवस आले होते. त्याची ही पूर्वतयारी होती.
संध्याकाळी जरा उशीराने घरी पोचलो. घरी गेल्यावर जीव थंडगार झाला. पुढचे काही दिवस इतकं अगडबंब सामान पुन्हा सुस्थळी लावणे, प्रवासातले फोटो बघणे, तिथल्या गमतीजमती मुलाला सांगणे आणि आम्ही नसताना त्याने काय-काय केलं ते ऐकणे असं प्रवास संपल्यानंतरचं कवित्व चालू राहिलं. आम्ही हा प्रवास २०१९ च्या सप्टेंबर-ऑक्टॉबर मध्ये केला. त्यानंतर काही महिन्यातच कोविडच्या साथीमुळे सगळं जग उलटंपालटं झालं. ‘न्यू नॉर्मल’ मध्ये इतक्या असंख्य ठिकाणी जाणं, राहणं, खाणं-पिणं जमलंच नसतं. सगळं कुलूपबंद झालेलं असताना त्या दिवसांबद्दल लिहिताना आपण हा प्रवास नक्की ह्याच जन्मात केला की मागच्या जन्मात? अशी शंका येते.
अमेरिकेबद्दल लिहायचं म्हणजे लेखन मुक्तपीठीय होण्याची फार धास्ती होती! तसं होऊ नये अशी काळजी घेतली आहे पण ‘त्या’ धर्तीचे काही अनुभव सांगायचा मोह आवरत नाहीये. वेगासच्या हॉटेलच्या लॉबीत एकांनी मला चक्क ‘रामराम’ घातला होता!! त्यांच्या अस्सल अमेरिकन उच्चारांमुळे ते काय म्हणत आहेत, त्याचा उलगडा व्हायला मला जरा वेळच लागला. पण कळलं तेव्हा मजा वाटली. ते बरीच वर्षं सिंगापूरला नोकरी करत होते. तिथल्या भारतीय सहकाऱ्यांकडून ते ‘रामराम’ म्हणायला शिकले होते.
आयडाहो फॉल्सला पोचलो त्या दिवशी बर्फाचं वादळ, बर्फवृष्टी, बंद झालेले रस्ते ह्या अडचणीबरोबरच ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ न्यायाने गाडीचं चाक पंक्चरलं होतं. रविवार असल्याने दुरुस्ती करायला कोणी उपलब्ध नव्हतं. सोमवारी सकाळी गाडी दुरुस्तीला नेली. तिथे काम सुरू झाल्यावर व्हर्जिनिया राज्याची नंबर प्लेट बघून तिथल्या माणसाने ‘इतक्या लांब कसे काय आलात? आता कुठे जाताय? वगैरे चौकश्या केल्या होत्या. त्याच्याशी बोलताना एकीकडे आता खिशाला किती फोडणी बसणार? असं डोक्यात येत होतं. कार दुरुस्त झाल्याची सुवार्ता घेऊन अण्णा आल्यावर त्यांनी पैसे घ्यायला चक्क नकार दिला!! ते काही वर्षांपूर्वी आमच्या भागात राहत होते. तिथल्या एक रेस्टॉरंटची त्यांना फार आठवण येत होती. तिथलं जेवण त्यांना फार आवडायचं. ‘तुम्ही परत गेलात की तिथे जाऊन नक्की जेवा. Drive safe and have a great trip’ असं म्हणून त्यांनी सुहास्य निरोप घेतला.
पैसे वाचल्यामुळे आनंद तर झालाच. पण त्यांनी असं का केलं असेल, ह्यावर आम्ही बराच वेळ चर्चा केली. इतक्या लांबलचक रोडट्रीपमध्ये ‘करमणूक’ हा जरा कळीचा विषय असतो. असा काही आजचा ताजा विषय मिळाला तर बरंच वाटायचं. भारतात ट्रेन-बस-कार असा कुठलाही प्रवास करताना मला बाहेरच्या पाट्या वाचायची सवय आहे. पण अमेरिकेतल्या रस्त्यांवर सगळीकडे सारख्याच पाट्या. त्यामुळे इथे ती करमणूक नाही. कार किंवा ट्रकवर ‘गांवमें है खेती मेरी, खेतीमें है गन्ना, गाडी मेरी हेमामालिनी, मै हूँ राजेश खन्ना’ किंवा ‘बुरी नजरवाले तेरा मुंह काला’ असलं काही लिहिण्यातली गंमत अमेरिकन लोकांना माहिती नाही. पण ट्रकवर ‘drivers wanted’ अशी जाहिरात असायची आणि त्याबरोबर भावी ‘शिवराम गोविंद’ लोकांना काही लालूच दाखवलेली असायची. म्हणजे ‘वीकेंडला घरी, प्रत्येक मैलामागे --- डॉलर्स बोनस’ वगैरे वगैरे. ते वाचून माफक करमणूक व्हायची. बाकी रेडिओ, हिंदी-मराठी गाणी वगैरे चालूच असायची. बऱ्याच न्यूज चॅनल्सचे लोकं जसे फारसा काही मुद्दा नसताना चर्चा करू शकतात, ती कला आम्हाला ह्या ट्रीपमध्ये चांगलीच अवगत झाली! अजून एक बारकी करमणूक म्हणजे कारच्या नंबरप्लेट वाचणे. गाडीच्या नंबरसाठी भारतात असतो त्यापेक्षा कितीतरी जास्त चॉइस अमेरिकेत असतो. म्हणजे पुण्यात रजिस्टर झालेल्या गाडीचं उदाहरण घ्यायचं तर ‘MH12 ZZ 1234’ अशाच पॅटर्नचा नंबर असतो. अमेरिकेत मात्र ‘RAJEEV’ ‘JONSMOM’ ‘KNITTER’ ‘NEPAL’ असे कुठलेही‘‘नंबर’’ घेता येतात. मंडळी घेतातही. त्यामुळे पुढच्या गाड्यांच्या पाट्यांकडे लक्ष देऊन वाचताना गंमत येत असे.
इतकं फिरून आम्ही काय बघितलं? रोडट्रीप असल्यामुळे खूप सारे, मैलोनमैल पसरलेले रस्ते बघितले. कुठे प्रचंड वाहतुकीचा सामना केला तर कधी पुढे-मागे दृष्टिपथात एकही कार नाही असंही झालं. कुठे बर्फाच्छादित डोंगर तर कुठे वाळवंट बघितलं. कधी निबिड जंगल तर कधी सपाट मैदानी प्रदेश बघितले. खरं सांगायचं तर खूप बघितलं आणि काहीच बघितलं नाही. अमेरिका म्हणजे मोठमोठे मॉल्स, गगनचुंबी इमारती आणि वर्दळीचे रस्ते इतकंच माहिती होतं. ह्या ट्रीपमुळे त्या व्यतिरिक्त किती कायकाय ह्या देशात आहे, ह्याची झलक मिळाली. अमेरिकेला नैसर्गिक साधनसंपत्तीचं वरदान मिळालं आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, जंगलं, खनिज संपत्ती. दळणवळणाच्या उत्तम सोयी असल्यामुळे ह्या गोष्टींची वाहतूक सहज होत असेल. अगदी दुर्गम भागातही रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. फिरताना कितीतरी ठिकाणी लांबचलांब मालगाड्या धावताना दिसायच्या. रस्त्यांबद्दल तर इतक्या जणांनी इतकं काही लिहिलं आहे, की मी अजून नवीन काय लिहिणार? मला कौतुक वाटलं रस्त्याची माहिती देण्याच्या शास्त्राचं. कार चालवणाऱ्या व्यक्तीला कुठे काय सूचना द्यायला हवी, कुठली माहिती मिळायला हवी ह्या शास्त्राचा बारकाईने अभ्यास केला गेला असणार. योग्य वेळी योग्य माहिती मिळतेच मिळते.
हे झालं ह्या रोडट्रीपमध्ये काय बघितलं त्याबद्दल. पण अमेरिकेत आलो, तेव्हाच काही वर्षांनी पुण्याला परत जायचं हे नक्की होतं. त्यामुळे हे सगळे दिवस आम्ही प्रवासात असल्यासारखेच राहिलो. त्या प्रवासातही बरंच काही बघितलं, अनुभवलं.
आपण भारतात अमेरिकेबद्दल चांगलं-वाईट ऐकत-वाचत-बघत असतो. त्याचा प्रभाव मनावर होताच. परदेशात येण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. तरी सुरवातीला गोंधळायला झालं. वेगळ्या उच्चारातलं इंग्लिश कळायचं नाही, रस्ता क्रॉस करताना गाड्या नक्की कुठल्या दिशेने येतील, हे लक्षातच येत नसे. अमेरिकेत कार चालणाऱ्यांच्या दयाळूपणावर माझे सुरवातीचे दिवस पार पडले. पुढे दुकानात, लायब्ररीत जायला लागले तशी अमेरिकन लोकांच्या सौजन्याचा अनुभव वारंवार आला. दारात असताना समोरून कोणी येत असेल तर त्या माणसासाठी थांबणं, चालतानाही एकमेकांचं सहजपणे भान ठेवून दुसऱ्याची सोय बघणं, रेटारेटी न करता रांग लावणं खूप लोभस वाटायचं. अमेरिकेतला अजून एक आवडलेला भाग म्हणजे लष्करात काम करणाऱ्या व्यक्तींना लहान-मोठे ‘Thank you for your service’ असं म्हणून मान देतात. विमानाने जात असताना कोणी गणवेशधारी प्रवास करत असेल, तर विमान कर्मचारी त्यांचे सेवेबद्दल विशेष आभार मानतात. ते करत असलेल्या देशसेवेचं मोल सगळे जाणतात.
काही वर्ष अमेरिकेत राहूनही माझा स्थानिक लोकांशी विशेष संपर्क आला नाही. कोणाशी मोकळेपणाने राजकीय, धार्मिक, कौटुंबिक गप्पा माराव्या इतकं मैत्र कोणाशी जुळलं नाही. त्यामुळे जे प्रश्न जाताना डोक्यात घेऊन गेले, त्यातले बरेचसे येताना तसेच होते. कौतुक वाटायचं ते नियम पाळण्याकडे असलेल्या प्रवृत्तीचं, लहान-सहान बाबतीतही दुसऱ्याचा विचार करण्याचं. ह्या नागरिकशास्त्राचं बाळकडू लहान असल्यापासून मिळाल्यामुळे तो स्वभावाचा भाग होत असावा.
साधारणपणे शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या सुरवातीच्या टप्प्यावर भारतातून मंडळी अमेरिकेत येतात. काही परततात तर काही स्थायिक होतात. आमच्या बरोबरच्या बऱ्याच लोकांनी Y2K च्या आसपास परदेशी भरारी मारली. आम्ही मात्र त्यांच्या मानाने उशिरा म्हणजे पन्नाशीच्या कलत्या उन्हात इथे आलो. तारुण्यातला लवचीकपणा कमी होऊन काहीसे जून झाल्यावर. हे फक्त शारीरिक बाबतीत नाही, तर मानसिक बाबतीतही होतं. विचार, आवडी-निवडी, सवयी एव्हाना पक्क्या झालेल्या असतात. बदलणं अशक्य नाही तरी अवघड निश्चित जातं.
त्यामुळे मी अमेरिकेत आले, तेव्हा भारतातलं सगळं सुलटं आणि अमेरिकेतलं सगळं उलटं हे डोक्यात पक्कं होतं. कितीतरी गोष्टी अमेरिकेत वेगळ्या आहेत. इथे अंतर, वजन, तापमान मोजायची एककं वेगळी. तारीख लिहायची पद्धत, घराचा पत्ता सांगायची पद्धत, पाकिटावर पत्ता लिहायची पद्धत वेगळी. किती गोष्टी सांगायच्या. भारतात आपण रस्त्याच्या डावीकडून वाहनं चालवतो तर अमेरिकेत उजवीकडून. शाळेपासून जिन्यात, पॅसेजमध्ये डावीकडून चालायची सवय असते. इथे मात्र उजवीकडून चालायचं. भारतात विजेच्या बटणाच्या ज्या पोझिशनला दिवा चालू होईल त्या पोझिशनला इथे बंद होणार. अगदी गाडी चालवताना वायपर आणि टर्न इंडिकेटरची पोझिशन विरुद्ध. आल्याआल्या तर सगळं वेगळं, चुकीचं, उलटं आहे अशी खात्री वाटायची.
आता इतके दिवस राहून, इतकं फिरून, इतकं काही बघून झाल्यावर मात्र माझं मलाच कळेनासं झालंय की नक्की काय सुलट आणि काय उलट?
Nice. Sarv bhag ekdum vachun kadhle. Maja aali.
ReplyDeleteThank you so much!!
Delete