ज्याची त्याची वारी.....
साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात पुण्याच्या वर्तमानपत्रात ‘पालखीच्या व्यवस्थेसंदर्भात कलेक्टर कार्यालयात उद्या बैठक’ अशा स्वरूपाची बातमी येते आणि मग पाठोपाठ ‘पालखी मार्गाची दुरावस्था’ वगैरे मथळ्यांखाली पालखी मार्गाच्या बाजूला पडलेला राडारोडा, रस्त्यावरील खड्डे वगैरे छायाचित्र येतात. स्थिर, संथ तळ्याच्या पाण्यात कोणीतरी गमतीने दगड टाकावा, आणि त्याचे तरंग तळ्याच्या काठापर्यंत हळूहळू पसरत जावे, तसा ‘पालखी’ हा विषय पुण्यात आणि परिसरात पसरत जातो. जसा जसा देहू किंवा आळंदीहून पालखीच्या प्रस्थानाचा दिवस जवळ येऊ लागतो, तसा त्या संदर्भातील बातम्यांना आणि चर्चेलाही रंग चढतो. पुण्यातले बरेच लोकं पुणे-सासवड हा टप्पा करतात. सकाळी मैदानांवर-टेकड्यांवर चालायला जाणाऱ्या गटांमध्ये, हौशी ट्रेकर्समध्ये, भाविक मंडळींच्या गटात, अगदी सगळीकडे पुणे-सासवड हा टप्पा गर्दी टाळून कसा करता येईल, ह्या विषयावर सूचना-सल्ल्यांचं आदान-प्रदान हिरीरीनं व्हायला लागत. पुण्यात जागोजागी असलेल्या विठोबाच्या मंदिरांची रंगरंगोटी होताना दिसते. वर्तमानपत्रात निरनिराळ्या संघटनांच्या ‘वारकऱ्यांच्या चरणसेवेसाठी नावे नोंदवा’ अशा प्रकारची आवाहनं दिसतात आणि पुणे शहर पालखीच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागताला सज्ज होतं. मंडई-रविवार पेठेपासून ते हिंजवडी-कल्याणीनगरपर्यंत सगळे ‘पालखी कधी येणार आहे?’ हा प्रश्न विचारायला लागतात. जागोजागी वारकऱ्यांसाठी शिधा गोळा केला जातो. दोन दिवस वारकरी पुणेकरांचे पाहुणे असतात. त्यांचा आदरातिथ्याची देवळात, शाळांमध्ये किंवा मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था होते. आधीच वाहनांच्या गर्दीने ग्रासलेले पुण्याचे रस्ते पालखी आली की वाहतुकीला बंद होतात. त्यामुळे बऱ्याच शाळांना अर्धी किंवा पूर्ण सुट्टी मिळते. समाजातील कुठलाही वर्ग ह्या पालखी-चर्चेपासून कोरडा राहू शकत नाही. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा. काही जणांना माऊलींचं दर्शन होणार म्हणून आनंद, तर कोणाची रोजचा रस्ता बंद झाल्यामुळे होणारी तारांबळ. कोणाला पालखीच्या निमित्ताने चार पैसे मिळवायची संधी असते. मुलांना सुट्टीचा आनंद. महापालिका प्रशासन, पोलीस, स्वच्छता कर्मचारी ह्यांच्यावर कामाचा वाढीव ताण. राजकारणी जनतेला चमकोगिरी करण्याची संधी. असे अनेक पैलू ह्या सोहळ्याला असतात. पुण्यातील प्रत्येक भागात कुठली ना कुठली दिंडी मुक्कामाला असते. त्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा, ह्या भावनेतून ज्याला जे शक्य आहे, ती सेवा केली जाते. वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीपासून ते त्यांचे कपडे शिवणे, दाढी-कटिंग, पुण्यात फिरण्यासाठी रिक्षा संघटनेतर्फे मोफत रिक्षा उपलब्ध करणे असा सगळ्या माउलींचा पाहुणचार होतो. दोन रात्रीचा मुक्काम संपवून वारी सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाली, की पुणे मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी पाठोपाठ ‘स्वच्छता वारी’ करून शहर पूर्वस्थितीत आणतात. समाजाचा प्रत्येक घटक त्या पंढरीच्या भुताने झपाटलं जातो!!
पुण्यात येईपर्यंत मला वेगवेगळ्या भागातून वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात, एवढीच साधारण माहिती होती. पुण्यात माऊलींची आणि तुकाराम महाराजांची अशा दोन्ही पालख्या येत असल्यामुळे इथे जी वातावरणनिर्मिती होते, तशी कल्याणला नव्हती. पुण्यात आल्यानंतर मात्र ‘पालखी’ ह्या विषयाशी चांगलीच ओळख झाली. मग एकदा माझ्या वडिलांनी पायी वारी करायची असं ठरवलं. ते तेव्हा कल्याणला होते. त्यामुळे पुण्यातून निघणाऱ्या दिंडीच्या कार्यालयात त्यांच्या वारीचं बुकींग करणे, त्या संदर्भातील मिटींगला जाणे वगैरे कामं मी केली. वारीच्या दिवसात पुण्याच्या वर्तमानपत्रातून सचित्र आणि सविस्तर वर्णन येत असतं. बाबा वारीला गेल्यावर त्या बातम्या मन लावून वाचल्या जाऊ लागल्या. नाहीतर तोपर्यंत ‘ही वारी संपेपर्यंत पेपर वाचायला नको. तेवढ्याच बातम्या आहेत. आज काय गोल रिंगण. उद्या काय उभं रिंगण’ असं वैतागून म्हणायचे. बाबा वारीला गेल्यावर मात्र मुलाबरोबर मी देखील वर्तमानपत्रातल्या गर्दीत बाबा दिसतात का? ते बघायला लागले! एका वर्षी माझे मोठे काका, बाबा आणि मी सासवडपर्यंत गेलो. तिथून बाबा त्यांच्या मुक्कामाच्या जागी गेले. मी आणि काका बस पकडून परत आलो. तेव्हा संसारात, व्यवसायात पूर्ण गुरफटले होते. पंधरा-वीस दिवस काढून वारीला जाणं अवघड होतं. शिवाय डोंगर - दऱ्यांचं - हिमालयाचं आकर्षण जास्त होतं. हे डांबरी रस्त्यांवरून, गर्दीत चालणं तितकंसं पसंत पडलं नव्हतं. ओळखीचे एक जण दर वर्षी वारीचा एक-एक टप्पा करायचे. आपणही तसं करूया असे बेत दरवर्षी मैत्रिणीबरोबर व्हायचे आणि काही ना काही कारणाने रद्द व्हायचे. वारीबद्दलची पुस्तकंही वाचनात आली. व्यंकटेश माडगूळकरांना दिसलेली वारी वेगळी, इरावतीबाईंना दिसलेली अजून वेगळी. इरावतीबाई तर पांडुरंग त्यांचा बॉयफ्रेंड आहे, असं म्हणायच्या! तेवढं मोकळं, गोड, मनस्वी नातं होतं त्यांचं विठोबाबरोबर. बरीच वर्षे हा घोळ घातल्यावर २०२४ साली मी पूर्ण वारी करायचं ठरवलं. प्रकृतीच्या कारणामुळे मला अर्ध्या रस्त्यातून परत फिरावं लागलं. वारी पूर्ण झाली नाही, तरी तो प्रवास, तो अनुभव अत्यंत उत्कट असा होता. हे मला सांगायलाच हवं की मी मध्यमवर्गीय, पांढरपेशा घरात वाढले आहे. पूर्णपणे शहरी, सुखवस्तू हाडांची व्यक्ती आहे. त्यामुळे मी हे सगळंच लिखाण शहरी डोळ्यांनी बघितलेल्या, अनुभवलेल्या वारीबद्दलचं आहे. अत्यंत मर्यादित अशा माझ्या अनुभव विश्वाच्या पलीकडचा हा संस्मरणीय अनुभव.
वारीत चालताना नवे वारकरी आणि जुने, नियमित वारी करणारे वारकरी ह्या दोन गटात असलेला स्पष्ट फरक माझ्या डोळ्यांना सारखाच दिसत होता. अगदी कपडे, संभाषण आणि प्रतिक्रियांमध्येही. बरेचसे नवे वारकरी शहरी आणि जुने वारकरी ग्रामीण भागातले होते. पण तशी विभागणी करणं योग्य होणार नाही.
वारीला जाताना पांढरे कपडे घालायचे असतात, अशी एक धारणा आहे. त्यामुळे नव्या वारकऱ्यांमधील स्त्रिया आणि पुरुष सगळे पांढऱ्या कपड्यात दिसतात. नेहमी वारी करणाऱ्या वारकऱ्यांमधले फक्त पुरुष पांढऱ्या कपड्यात असतात. पण बायका मात्र रंगीत कपड्यात असतात. त्यामुळे चकाचक पांढऱ्या कपड्यात चालणारे लोकं दिसले की फरक लगेचच लक्षात येत असे. आपण सगळे लोक सतत काहीतरी मोजायच्या, मिळवायच्या आणि संपवायच्या घाईत असतो, असं तिथे खूप वेळा जाणवलं. आजच्या टप्प्यातलं अंतर, चालायला किती वेळ लागेल ह्याचा अंदाज ह्या गप्पा सकाळी व्हायच्या. मुक्कामी पोचल्यावर ‘आम्ही कसे लवकर पोचलो किंवा आम्ही कसे आरामात आलो’ ह्या गप्पा. मनगटावरच्या घड्याळात बघून आज किती पावलं चाललो, हा हिशेब. राहण्याच्या जागी असलेल्या किंवा नसलेल्या सोयींची चाचपणी. तक्रार अशी नसायची. पण किंचित अपेक्षा मात्र असायची.
खूप वर्ष वारी करणाऱ्या वारकऱ्यांशी माझी अगदी जवळून ओळख झाली नाही. तशी संधी मिळाली नाही. पण त्यांचं चालणं, देहबोली सगळं वेगळं असलेलं जाणवायचं. पालखी मार्गावर भक्ती रसाला अक्षरशः पूर आलेला असतो. त्यात वाहात जाण्याइतकं मला स्वतःला सैल सोडता आलं नाही. ते सगळं मी काठावरूनच अनुभवलं. पण वारकऱ्यांची ती भक्ती, पांडुरंगाच्या ओढीने चालणारी ती थकलेली, भेगाळलेली पावले फार लोभस वाटली. माउलींच्या अश्वासाठी, रथाला जोडलेल्या बैलगाडीसाठी एका गाडीतून हिरवा चारा नेतात. त्या गाडीला ज्या प्रकारे डोकं टेकवून वारकरी नमस्कार करतात, ते दृश्य बघण्यासारखं असतं. पालखी मार्ग म्हणजे मुख्य रस्ता. विश्रांतीसाठी किंवा पोटपूजेसाठी जर तो रस्ता सोडून बाजूला गेलं, तर पुन्हा रस्त्याला लागताना वारकरी वाकून पालखी मार्गाला नमस्कार करतात, स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतात, आणि मग पुढे चालायला लागतात. ते सगळं बघून असं वाटायचं की ह्या लोकांची किती श्रद्धा आहे विठोबावर. त्यांना पोचायची घाई नसायची, अजून किती चालायचं आहे, ह्याची फिकीर नसायची. त्या दिंडीचा कोणी म्होरक्या असायचा. त्याने थांबायला सांगितलं की सगळे थांबायचे. निघा म्हटलं की निघायचे. ना उन्हाची तमा ना पावसाची चिंता. आता पंढरीच्या वाटेला लागलोय, तिथे पोचणार आहोत. एवढ्या दोन वाक्यात सगळं सामावलेलं असायचं. मुक्कामावर पोचलं की कपडे धुणे, वाळवणे ह्याची धांदल असायची. एकीकडे स्वैपाकाची तयारी. सगळं आवरलं की भजन-कीर्तन. उद्याच्या सगळ्या चिंता पांडुरंगाच्या पायांवर घालून झोपायचं. पहाटे अडीच-तीनला उठून पुन्हा चालायला सुरवात. असं दरवर्षी. वर्षानुवर्ष. पिढ्यानपिढ्या. आपला सगळा भार त्या विठुरायाच्या पायावर घालणं, तो आपल्या आयुष्यात जे काही बरं-वाईट करेल, तो त्याचा कृपाप्रसाद आहे, असं समजून शांतपणे स्वीकारणं सोपं असेल की कठीण?
थोडं अंतर का असेना, मला हा अनुभव घेण्याचा योग आला. वारी सोडून घरी आले, तेव्हा फार विचित्र मनःस्थितीत होते. शारीरिक वेदना तर होत्याच पण मनाला टोचणी लागली होती. आपण कमी पडलो, हातात घेतलेली गोष्ट अर्ध्यातून सोडून दिली. चिकाटी कमी पडली. एक ना दोन. नंतर जरा शांत झाल्यावर वाटलं, की ‘मी ठरवलेली गोष्ट पार पाडते म्हणजे पाडतेच’ हा आपला ताठा आहे. अहंकार आहे. प्रत्येक वेळी असं करणं, होणं शक्य नसतं. कधीतरी हट्ट सोडावा लागतो. पाय मागे घ्यावा लागतो. म्हणजे आपण हारलो, असं नसतं. होतं असं कधीतरी. त्या वेळेला ती गोष्ट नाही जमली, हे स्वीकारायचा लवचिकपणा स्वभावात हवा. माझ्या आळंदी ते नीरेपर्यंतच्या वारीमुळे मला मिळालेली ही शिकवण म्हणजे विठू माऊलीचा कृपाप्रसाद आहे.
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, इतकं मागणं आहे.
माऊली, माऊली
किती छान लिहिले आहेस अपर्णा माऊली ! शेवटचा परिच्छेद खरंच उद्बोधक आहे . वाचताना मीही वारी अनुभवली.
ReplyDelete