दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग तिसरा- नेब्रास्का ते मॉन्टाना

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा 
भाग दुसरा : व्हर्जिनिया ते नेब्रास्का https://aparnachipane.blogspot.com/2020/01/blog-post_8.html


२६ सप्टेंबर २०१९- लिंकन,नेब्रास्का ते की स्टोन, साऊथ डाकोटा

भारतासारख्या देशात भाषा, राहणी, चालीरीती, परिधान अशा बऱ्याच गोष्टींचं भरपूर वैविध्य आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यांची जी पुनर्रचना झाली, ती भाषांच्या आधारे. आपल्याकडच्या राज्यांच्या किंवा जिल्ह्याच्याही सीमारेषा साधारणपणे नद्यांच्या असतात. नदीच्या अलीकडच्या काठाला हे राज्य तर पलीकडच्या काठाला ते राज्य असतं. अमेरिकेत ‘भाषावार प्रांतरचना’ हा प्रश्न आलाच नसावा. त्यामुळे काही राज्यांच्या सीमारेषा नदीकाठी तर काही राज्यांच्या सीमारेषा नकाश्यावर पट्टी ठेवून आखलेल्या सरळ रेषा आहेत. अगदी काटकोनात एकमेकींना छेडणाऱ्या ह्या रेषांमुळे ह्या राज्यांना ‘चौकोनी राज्यं’ असं यथायोग्य नाव मिळालं आहे. काही ठिकाणी चार राज्यांच्या सीमा एकत्र येतात. तिथे तर एकेक पाऊल एका-एका राज्यात आणि हात पसरले, तर पसरलेले हात अजून दोन राज्यात अशी गंमत होते!  आता आम्ही ज्या भागात होतो, ते अशा चौकोनी राज्यांमध्ये.

सगळीकडे तुरळक वस्ती, मोठमोठी शेतं आणि गवताची कुरणं दिसत होती. मोठी शहरं जवळपास नाहीतच. सगळी लहान-लहान गावं. त्यामुळे जेवायला थांबायच्या, पेट्रोल भरायच्या सोयी थोड्या कमी आहेत. भाषेचा लहेजा वेगळा. सावकाश, लक्षपूर्वक बोललं-ऐकलं तरच एकमेकांना उलगडा होणार! ही राज्य काहीशी पारंपारिक विचारांची म्हणूनही ओळखली जातात. धार्मिक विचारांचा पगडा ह्या भागात जास्त. त्यामुळे ‘प्रो-लाईफ’ विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करणारी होर्डिंग्ज जागोजागी दिसायची. त्याबरोबर ‘त्याला’ शरण जा. ‘तो’ सगळे प्रश्न सोडवेल, हेही असायचं. 
 
आमच्या पातळीवर बोलायचं तर आज ५०० मैलांचा मोठा टप्पा गाठायचा होता. त्यातून डोंगराळ भाग. इंटरस्टेट हायवे असले तरी वेग कमी होता. काही ठिकाणी तर अगदीच गाव खात्यातले रस्ते होते. त्यामुळे इतकं अंतर जायला आठ तास तरी लागतील, असं वाटत होतं. शिवाय आज माउंट रशमोर आणि क्रेझी हॉर्स मेमोरियल ह्या दोन महत्त्वाच्या जागांना भेट द्यायची होती. त्यामुळे ड्रायव्हिंगला लागणारा वेळ आणि ह्या दोन जागा बघायला लागणार वेळ लक्षात घेतला तर आज वेळ कमी  पडेल, मुक्कामाला पोचायला बरीच रात्र होईल ही काळजी होती. त्याबरोबरच आमच्या पुढच्या रस्त्यावर एक बर्फाचं वादळ येऊ घातलं होतं, त्याचीही काळजी कुरतडत होती. 


सकाळी भराभर आवरून नेहमीपेक्षा जरा लवकरच निघालो. रस्ता शांत होता. ५०० मैलांचा आकडा जरा घाबरवत होता. दोन्ही बाजूंना पसरलेली शेतं, कुरणं, लहान लहान गावं बघत रस्ता कापायला सुरवात केली. आजही हवा चांगली होती. छान उबदार, मऊसर, सोनेरी ऊन पडलं होतं. निवांत आयुष्य असलेल्या जगातून पुढच्या टप्प्यावर पोचण्यासाठी आम्ही घाईघाई करत होतो. आज अंतर जास्त असल्याने कमीतकमी वेळा आणि कमीतकमी वेळ थांबत दुपारपर्यंत माउंट रशमोरला पोचलो. साऊथ डाकोटा हे शेतीप्रधान राज्य आहे. तिथे पर्यटनाला चालना देण्यासाठी अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन  ह्या चार अध्यक्षांचे प्रचंड मोठे पुतळे ग्रॅनाइटच्या डोंगरात कोरले आहेत.  मोठे म्हणजे किती? तर चेहऱ्याची उंची साठ फूट आहे! म्हणजे सहा मजली इमारतीइतके उंच..


मूळ कल्पना ह्या महापुरुषांचे अर्धपुतळे करायचे अशी होती, पण निधीच्या अभावामुळे फक्त चेहरे कोरले गेले, हे कळल्यावर गंमत वाटली. पुतळे, त्यांबद्दलचे वाद आणि पुरेसे पैसे सरकारकडून न आल्याने काटछाट करावी लागणे, हे प्रश्न वैश्विक पातळीवरचे आहेत, अशी ज्ञानात भर पडली. हे चेहरे इतके मोठे आहेत की मला घाटासारख्या रस्त्याने वळणे घेत वर येताना इकडून-तिकडून दिसत होते पण  ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ असं होऊ नये, म्हणून महेशला मात्र तसे बघता येत नव्हते. पार्किंगपासून तिथे जायला थोडासा चढाचा रस्ता आहे. तिथे पोचल्यावर आधी ह्या मंडळींच्याबरोबर एक सेल्फी काढून घेतली!

इकडून- तिकडून निरीक्षण करून झाल्यावर निवांत बसलो. आसपासच्या जनतेच्या हातात आइसक्रीम दिसत होतं. आम्हीही लगेच आइसक्रीम घेऊन आलो. अमेरिकेतल्या बहुतेक पर्यटन स्थळांना प्रवेश फी चांगली सणसणीत असते. ह्या जागेला मात्र प्रवेशमूल्य नव्हतं. पार्किंगचे नाममात्र पैसे तेवढे द्यावे लागत होते. त्यामुळे पर्यटन वाढवण्यासाठी बांधलेल्या ह्या जागी सरकारपेक्षा आइसक्रीमचं दुकानाला जास्त फायदा होत असेल, असं वाटलं…


खरंतर ह्या अध्यक्षांशी माझा परिचय नावापुरताच होता. महाराष्ट्रातल्या एखादा किल्ला बघताना शिवाजी महाराजांबद्दल वाटणाऱ्या आदराच्या भावनेने ऊर भरून येतो किंवा जालियनवाला बाग बघताना हालायला होतं, तशा प्रकारच्या भावना ह्या मंडळींशी जुळलेल्या नव्हत्या. त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आठवतील, त्यांचं कार्य आठवून उचंबळून येईल असं काही कनेक्शन नव्हतं. आइसक्रीम खाऊन झालं, फोटो काढून झाले आणि आम्ही निघालो. 


भारतात सुरवातीपासूनच एकच प्रमाण वेळ आहे. अमेरिकेत मात्र सहा प्रमाणवेळा आहेत. त्यातून डेलाइट सेव्हिंगची भानगड. म्हणजे वर्षात एकदा घड्याळं एक तास पुढे करायची आणि एकदा एक तास मागे करायची. त्यातही काही राज्यात हे डेलाईट सेव्हिंग करत नाहीत. त्यामुळे अमेरिकेतील  ‘अ‘ जागा आणि ‘ब’ जागा ह्यांच्या घड्याळात काही महिने दोन तासांचा फरक तर काही महिने तीन तासांचा फरक असतो. अर्थात भारतातली बरीच माणसं वैयक्तिक टाइम झोन ठरवतात, हा एक मुद्दा आहेच म्हणा! दुसऱ्या शहरात राहत असलेल्या कोणाला फोन करायचा असला, म्हणजे त्यांच्या भागातली वेळ गूगलवर तपासून मगच मी फोन करायचे. एरवी ह्या सगळ्याचा  वैताग येत असला, तरी आज मात्र ते प्रकरण फारच पथ्यावर पडलं. साऊथ डाकोटा राज्याच्या दोन भागात एक तासाचा फरक आहे. त्यामुळे आम्हाला पंचवीस तासांचा दिवस मिळाला आणि पुढचं क्रेझी हॉर्स मेमोरियल बघायला  पुरेसा वेळ मिळाला.


अमेरिकेत इंग्रज लोकं येण्याआधी स्थानिक इंडियन अमेरिकन राहत होते. आपल्या टोळ्यांचे नियम पाळून निसर्गातल्या शक्तींचा आदर करत राहत होते. नंतर आलेल्या मंडळींनी ‘हा भाग माझा- हा पुढचा तू घे ’ असं परस्पर ठरवून टाकलं. युद्ध झाली. युद्धात पराभूत झाल्यावर ह्या इंडियन अमेरिकन टोळ्यांमधील मुलांना वसतिगृहात ठेवण्यात आलं. त्यांचे कपडे, नावं बदलली गेली. त्यांच्या चालीरीती, भाषा, धर्मही बदलून आदिम अशा संस्कृतीला संपवायचे पद्धतशीर प्रयत्न केले गेले.


ह्या भागात राहणाऱ्या लाकोटा जमातीच्या अतिशय शूरवीर अशा योद्ध्याला इंग्रजांनी पकडून तुरुंगात टाकलं आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्या क्रेझी हॉर्स ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वीराचा महाकाय पुतळा बांधायचं काम अनेक वर्षांपासून चालू आहे. अमेरिकन सरकारकडून निधी घ्यायला नकार देऊन फक्त देणग्या आणि पर्यटकांकडून  मिळणाऱ्या पैशांवर हे काम चालू आहे. तिथेच इंडियन अमेरिकन संग्रहालय आणि त्यांचं सांस्कृतिक केंद्रही आहे. इंडियन अमेरिकन लोकांच्या पुढच्या पिढीतील मुलांना ह्या सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी म्हणून प्रयत्न चालू आहेत. विस्मरणात गेलेली संस्कृती, भाषा, परंपरा, चालीरीती ह्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपड चालू आहे. 

 
हा क्रेझी हॉर्स पुतळा जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा माउंट रशमोरच्या पुतळ्यांपेक्षा खूप मोठा होईल. तिथले चेहरे साठ फूट उंचीचे आहेत तर ह्या पुतळ्याचा चेहरा 87 फूट  उंच आहे. म्हणजे  नऊ मजली उंच इमारतीइतका. इतकं भव्य शिल्प उभारायला बरीच वर्षे लागतील. सध्या तर फक्त चेहरा, केस आणि हात इतकाच भाग तयार आहे. शिल्प जवळून बघता यावं ह्यासाठी बसची सोय आहे. ते बघून झाल्यावर तिथलं संग्रहालय बघितलं. 

आजच्या दिवसात ड्रायव्हिंगही बरंच झालं होतं आणि शिवाय ह्या दोन जागा बघताना फिरणंही पुष्कळ झालं होतं. आता मात्र थकवा जाणवत होता. अर्ध्या तासात हॉटेलमध्ये पोचलो. अमेरिकेत बांधकामासाठी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. वरच्या मजल्यावर चालतानाचे आवाज खाली स्पष्ट येतात आणि झोपमोड होते. त्यामुळे आम्ही शक्यतो हॉटेलच्या वरच्या मजल्यावरची खोली घेतो. इथे मात्र चॉइस मिळाला नाही. हॉटेलच्या सगळ्या खोल्या भरलेल्या  होत्या. आम्ही जी होती ती खोली ताब्यात घेतली. खोलीत सामान नेल्यावर आणखीनच शीण जाणवायला लागला. गरम वरण-भात जेवून लगेचच झोपून गेलो. 
 
२७ सप्टेंबर २०१९ : की-स्टोन, साऊथ डाकोटा ते बिस्मार्क, नॉर्थ डाकोटा

काल फार धावपळ, दमणूक झाली होती. आजचा दिवस निवांत होता. ड्रायव्हिंगचं अंतर 325 मैल म्हणजे कालच्या मानाने बरंच कमी होतं. शिवाय  काही बघण्यासाठी थांबायचंही नव्हतं. आजचा कार्यक्रम फक्त ह्या गावातून निघून पुढच्या मुक्कामाला पोचणे, इतकाच होता. साऊथ डाकोटा राज्यातल्या दोन वेगवेगळ्या टाइम झोनचा काल फायदा मिळाला होता. पंचवीस तासांचा दिवस मिळाल्यामुळे दोन्ही जागा बघता आल्या. आजचा दिवस तेवीस तासांचा होणार होता. पण आजचा दिवस ‘रेस्ट डे’ प्रकारचा असल्याने काही अडचण येणार नव्हती. फार घाई नसल्याने जरा आरामात उठून, आवरून निघालो.

चार दिवसांपूर्वी घरून निघालो तेव्हा उंच इमारती, वर्दळीचे रस्ते, कुठे ट्रॅफिक जॅममध्ये अडकायची चिंता होती. आता ते सगळं मागे पडलं होतं. इथे इंटरस्टेट हायवेवरही वाहतूक शांततेत चालू असायची. लहान रस्त्यांवर तर विचारायलाच नको.  काहीवेळा दृष्टिपथात पुढे-मागे एकही गाडी नाही अशी अवस्था असायची. आजचा रस्ताही तसाच होता. प्रत्येक राज्यात प्रवेश करताना ‘**** राज्यात स्वागत’ ह्या प्रकारचे फलक असायचे. चालत्या गाडीतून अशा बोर्डांचे फोटो काढायचं काम माझ्याकडे होतं. आज साऊथ डाकोटा राज्यातून नॉर्थ डाकोटा राज्यात शिरलो, तेव्हा रस्ता रिकामा असल्याने गाडी रस्त्याकडेला थांबवून चवीने फोटो काढता आले. 

 
सपाट प्रदेश संपून डोंगराळ प्रदेशात पोचलो होतो. खूप वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे डोंगर दिसत होते. वळणावळणाच्या रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळणानंतर नवे आकृतिबंध, नवी दृश्य, नवे आश्चर्य वाट बघत होते. एरवी मी बाहेर बघता बघता एकीकडे विणकाम करते. पण आज बाहेर इतकं काही बघायला होतं, की मी विणकामाला हातही लावला नाही. अशा रस्त्याची मजा घेत घेत आम्ही मुक्कामाला पोचलो सुद्धा. रोडट्रीप सुरू केल्यापासून आज पहिल्यांदाच दुपारी हॉटेलमध्ये पोचलो होतो. माझ्यापेक्षा महेशला विश्रांतीची जास्त  गरज होती. रोज सात-आठ तास ड्रायव्हिंग थकवणारं होतं. थोडी विश्रांती घेतल्यानंतर पोहायला गेलो. सारखं गाडीत बसून शरीर आखडून गेलं होतं. आज जास्तीची विश्रांती आणि पोहण्याने पुन्हा ताजेतवाने झालो. 


प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात मोन्टाना ह्या निसर्गसंपन्न राज्यात जायचं होतं. तिथली नॅशनल पार्क्स बघायची आणि ‘रोड टू सन’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला ड्राइव करायचा बेत होता. त्याच्या आसपासच्या हॉटेलची बुकिंग सहज मिळत नाहीत, म्हणून आधीपासूनच करून ठेवली होती. पण त्या भागात प्रचंड मोठं हिमवादळ येऊ घातलं होतं. जवळपास दोन ते अडीच फूट बर्फ पडायची शक्यता वर्तवली जात होती. रस्ते बंद होतील, हे उघड होतं. असं काही होऊ नये, थंडीचा-बर्फाचा अडथळा न येता ठरवल्याप्रमाणे सगळं बघता यावं म्हणून आम्ही फॉल सीझनच्या पहिल्या दिवशीच निघालो होतो. पण बर्फाने आम्हाला चकवलं होतं. अपेक्षेपेक्षा बरेच दिवस आधी बर्फवृष्टी सुरू होणार होती. खूप वाईट वाटलं. पण माहिती असताना मुद्दाम संकटात उडी मारण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी जड मनाने आम्ही जिथे वादळाचा मोठा फटका अपेक्षित होता, तो भाग टाळून दुसरीकडे जायचं ठरवलं. त्यामुळे पुन्हा एकदा रस्ता ठरवणे, आधीची बुकिंग्स रद्द करणे, नवीन बुकिंग्ज करणे ही कामं पुढ्यात आली. शिवाय आता जो रस्ता ठरवला होता, तिथली काय अवस्था आहे, ह्याचे अपडेट्स इंटरनेटवरून घेत होतो. 


 नाही म्हटलं तरी काही भाग बघायला मिळणार नाही, ह्यामुळे जरा निराशा आली होती. पुढच्या रस्त्यात काही अडचण येऊन अडकणार तर नाही ना, ही काळजीही वाटत होती. घरून निघालो, त्याला अजून आठवडाही झाला नाही, तर हे वादळ समोर आलं. अजून कितीतरी प्रवास करायचा होता. अजून कायकाय अडचणी येतील, काय माहीत? असे विचार डोक्यात फिरत होते. अशा जरा बिचाऱ्या मूडमध्ये दिवस संपला. 
 
२८ सप्टेंबर २०१९ : बिस्मार्क, नॉर्थ डाकोटा ते बिलिंग्ज, मोन्टाना

पहाटेपासूनच पाऊस जोरदार पडत होता. काल झोपताना दोन दिवसांनी येणारं वादळ, जोरदार बर्फवृष्टी, रस्त्यांची अवस्था ह्या सगळ्याची काळजी वाटत होती. उठल्यावर ती काळजी आणखीनच गडद झाली. त्याच मन:स्थितीत आन्हिकं आवरली, ब्रेकफास्ट करून आलो, सामान गाडीत भरून पुढच्या मार्गाला लागलो. बिस्मार्क नॉर्थ डाकोटा राज्याची राजधानी आहे. त्यामुळे कॅपिटॉल कॉम्प्लेक्सला भेट देणं अत्यावश्यक होतं! एव्हाना आम्ही कॅपिटॉल कॉम्प्लेक्स बघण्यात तरबेज झालो होतो. त्या स्किलचा वापर करून आम्ही गाडीतूनच हा भाग बघितला. ही इमारत  डी. सी. च्या कॅपिटॉल सारखी नव्हती. आधुनिक पद्धतीने बांधलेली गगनचुंबी इमारत होती. त्यामुळे जरा बदल झाला.



हे वाचून असं वाटेल की इतका कंटाळा येत होता, तर कॅपिटॉल बिल्डिंग्ज बघायला कशाला जायचं? त्या ऐवजी प्रत्येक शहरात, राज्यात इतकं काही बघण्यासारखं असतं,   ते का नाही बघितलं? पण एकतर आमच्याकडे वेळ कमी होता आणि दुसरं म्हणजे ही  सगळी राज्य निसर्गसौंदर्याने परीपूर्ण  आहेत. रस्त्याने जाताना काय बघू आणि काय नको, अशी अवस्था व्हायची. काही बघण्यासारख्या जागा फार वेळ मोडेल म्हणून टाळल्या. ह्या सगळ्या अटी-शर्तींमध्ये जे बसलं ते बघितलं गेलं. ही ट्रीप ‘रोडट्रीप’ होती. पर्यटनाचा हेतू जरा मागे ठेवला होता. 
       
अजून उन्हाचा काही मागमूस नव्हता. धुक्यामुळे गाड्यांचा वेग कमी होता. आम्हाला आज चारशे मैलांचं अंतर कापायचं होतं. अशीच हवा राहिली तर उशीर होईल असं वाटत होतं. रस्त्यावरचे वेगमर्यादेची तसंच इतरही माहिती देणारे बोर्ड जवळ गेल्याशिवाय दिसत नव्हते. सुदैवाने तासाभरात हवा सुधारली. ऊन नसलं तरी रस्ता स्वच्छ दिसायला लागला. आम्ही जरा रिलॅक्स होऊन इकडेतिकडे बघायला लागलो. उडणाऱ्या हंसांचं प्रतीक असलेलं एक इंडियन अमेरिकन शिल्प बघायला मिळालं. 

बाकी रस्त्याकडेचा देखावा तसाच होता. मोठीमोठी शेतं. मका किंवा गवत लावलेलं दिसत होतं. गवताची कापणी करून त्याचे अजस्त्र रोल करून शेताच्या कडेला आणून ठेवलेले बहुतेक सर्व ठिकाणी दिसत होते. हळूहळू शेतजमिनींच्या ऐवजी डोंगराळ प्रदेश सुरू झाला आणि मोन्टाना राज्याची हद्द सुरू झाली. मोन्टाना राज्यात त्याच्या नावाप्रमाणे माउंटन्सचं, पर्वतांचं  राज्य. आगळ्या-वेगळ्या रंगांचे, आकाराचे डोंगर- दऱ्या- झाडं दिसत होती. हवा सुधारली होती म्हणून ठीक होतं, नाहीतर अशा घाटरस्त्यांवरून धुक्यात गाडी चालवताना जरा भीतीच वाटली असती. 
 
सपाट भागातून जाणारे रस्ते काहीवेळा एकसुरी होतात. सतत एकाच प्रकारचं दृश्य दिसत असतं. इथे तसं नव्हतं. क्षणोक्षणी वेगळं काहीतरी बघायला मिळत होतं. रस्ता असा सुंदर असल्यामुळे अंतर कधी संपलं ते कळलंही नाही. चेक-इनच्या वेळेआधीच तासभर आम्ही हॉटेल गाठलं. इथे हवा आणखीनच थंड होती. पाऊसही पडत होता. गाडीतून बाहेर पडल्यावर कुडकुडायला होत होतं. आता चेक-इनची वेळ होईपर्यंत थांबायला लागलं तर पंचाईत झाली असती. पण आमची गारठलेली अवस्था बघून हॉटेलमालकांनी आम्हाला खोली दिली शिवाय सामान वर न्यायला मदतही केली. 


थंडगार खोली गरम झाल्यावर जीवात जीव आला. आजही अर्धा दिवस हातात होता. पण बाहेर पाऊस चांगलाच कोसळत होता. त्यामुळे त्या गारठ्यात बाहेर पडण्याऐवजी आम्ही खोलीतच आराम करायचा छानसा निर्णय घेतला. उबदार पांघरुणात शिरून मस्त झोप काढली. नंतर दुसऱ्या दिवशीच्या वादळाचे अपडेट्स बघत कुठल्या रस्त्याने जाणं बरं, ह्याचा अभ्यास करायला लागलो. टी. व्ही. वरही त्याच बातम्या होत्या. मुलाशी रोज बोलणं व्हायचंच. तोही काळजीने कुठून जाणार आहात? नीट जा, फोन करा वगैरे  सांगत होता. 

त्यातल्या त्यात बरा वाटणारा रस्ता नक्की केला. गरम भाजीभात जेवलो आणि पावसाचा आवाज ऐकत ‘उद्याचं उद्या बघू’ असा एकमेकांना दिलासा देत झोपलो.


ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा

भाग चौथा :  मॉन्टाना ते वॉशिंग्टन स्टेट https://aparnachipane.blogspot.com/2021/02/blog-post_11.html

Comments

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ६ 'फेर आई रे मौरा '