दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग चौथा - मॉन्टाना ते वॉशिंग्टन स्टेट

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा भाग तिसरा : नेब्रास्का ते मॉन्टाना https://aparnachipane.blogspot.com/2021/02/blog-post.html २९ सप्टेंबर २०१९ बिलिंग्ज, मोन्टाना ते आयडाहो फॉल्स, आयडाहो आजच्या वादळाचे ढग आमच्या मनावर गेल्या चार दिवसांपासूनच घोंघावत होते. सकाळी उठून बाहेर बघितलं, तर रात्रीतून कधीतरी बर्फ पडायला सुरवात झाली होती आणि रस्त्यांवर-छपरांवर बर्फ साठला होता. वादळाच्या आधी जो रस्ता ठरवला होता, त्याची पुन्हा एकदा चाहूल घेतली. पण तिथे ३० ते ३६ इंच बर्फाची शक्यता होती. यलोस्टोन नॅशनल पार्कचे बरेचसे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे ह्या ट्रीपमध्ये तिथे जाता येणार नाही, हे आता अगदी निश्चित झालं. मुळात ठरवलेला रस्ता असा होता बदललेला रस्ता असा होता कुठेही फिरायला जाताना ठरवलेलं सगळं आणि त्याबरोबर अनपेक्षितपणे काहीतरी छान बघायला, अनुभवायला मिळावं, असं वाटतंच. पण तसं कधीतरीच होतं. बहुतेक वेळा काहीतरी बघायचं राहतंच. कधी उशीर झाला म्हणून तर कधी दुरुस्ती चालू आहे म्हणून कधी पुरेशी माहिती मिळा...