माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा (भाग-५) गुंजी ते लीपुलेख पास

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा 

भाग ४ : सिरखा ते गुंजी https://aparnachipane.blogspot.com/2018/08/blog-post.html


दिनांक १८ जून २०११ (गुंजी मुक्काम)



गुंजी कँपला पोचल्यापासून चर्चेचा मुख्य विषय 'मेडीकल टेस्ट' हाच होता. त्याच्या जोडीला, दुसऱ्या  दिवशी दोन कँपच अंतर पार करायचं होतं, ह्याची काळजीही होती. गुंजीनंतरचा कँप कालापानी आहे. आमच्या कार्यक्रमाप्रमाणे तिथे न थांबता नबीढांग ह्या भारतातील शेवटच्या कँपपर्यंत पोचायचं होत. मेडिकल जर लवकर आटोपली तर कालापानीपर्यंतचे नऊ किलोमीटर अंतर आजच पार करावे, असा सगळ्यांचा खल चालला होता. त्यामुळे लवकर लवकर मेडिकल संपवावी असे सगळ्यांचे प्रयत्न चालू होते.

सकाळी १० वाजता सगळ्यांना आपापले मेडिकल रिपोर्ट घेऊन तयार राहायला सांगितलं होत. दिल्लीतून निघताना ज्या तपासण्या झाल्या होत्या, त्यातील क्ष-किरण तपासणी आणि अन्य सर्व वैद्यकीय रिपोर्ट जवळ ठेवायला आम्हाला किमान सतरा वेळा तरी बजावून सांगितलं होतं. पुढे यात्रेदरम्यान एखाद्या यात्रीला काही त्रास होऊ लागल्यास आधीचे रिपोर्ट डॉक्टरांना तुलना करायला उपयोगी पडतात.



सकाळची सगळ्यात मोठी आणि अत्यंत मजेदार बातमी म्हणजे, आमच्या नारंग सरांनीच त्यांचे सगळे रिपोर्ट आणले नव्हते!! क्ष-किरण फोटो फार मोठा होता म्हणून त्यांनी दिल्लीतच ठेवला होता. बाकीचे रिपोर्टही सगळे न आणता, थोड्याच रिपोर्टची प्रत ते घेऊन आले होते. एल.ओ. सरांना पूर्ण यात्रेत अग्रपूजेचा मान असतो. त्यांनीच अशी गंमत केल्यावर आय.टी.बी.पी.वाले डॉक्टर चांगलेच वैतागले. त्यांचा सगळा सैनिकी खाक्या. कोणीही त्यांची शिस्त मोडलेली ते खपवून घेत नाहीत. इथे आमच्या एल.ओ. सरांशीच त्याचं वाजल्यावर त्यांनी दणादणा लोकांना नापास करायला सुरवात केली. कोणाला न्युमोनियाची शंका, कोणाचा रक्तदाब जास्त तर कोणाच कोलेस्टरॉल जास्त. अर्धी बॅच परत पाठवतात की काय अशा विचाराने कँपवर वातावरण एकदम तंग झालं.  

माझं हिमोग्लोबिन सदैव कमी असतं. त्यामुळे मला ती काळजी होती, तर नंदिनीला तिच्या इ.सी.जी. प्रश्नाची. माझी मेडिकल झाली तेव्हा माझ्या हिमोग्लोबिनच्या त्या सुरेख आकड्यांकडे डॉक्टर बराच वेळ बघत बसले होते. मी एकदम गॅसवर. पण शेवटी त्यांनी फक्त ‘चालण्याचा हट्ट न करता, जास्त चढ असेल तिथे घोड्यावर बसा. काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला. हिमोग्लोबिन कमी असल्याने, विरळ हवेचा जास्त त्रास होऊ शकतो, अस त्या डॉक्टरांच म्हणणं होत. एकूण काय, मला वरच्या वर्गात ढकलले होते! पुष्कळ झालं.

नंतर हळूहळू करत त्यांनी सगळ्यांनाच पास केलंहुश्श! आता मेडिकल नाही. पण ह्या सगळ्या भानगडीत इतका वेळ गेला, की आमचा कालापानी गाठायचा बेत कुठल्या कुठे उडून गेला.  संध्याकाळी भजन झालं. आपली सगळीच्या सगळी बॅच पुढे जाणार, ह्या आनंदात भजनाला आज चांगलाच जोर चढला. 





गुंजी कँपला फोनची सोय होती. ह्यानंतर तिबेटपर्यंत फोन नाही. त्यामुळे घरी फोन करून सगळ्यांशी गप्पा मारल्या. शनिवार असल्याने लेक घरी होता! त्याच्याशी बोलून खूप बरं वाटलं. माझ्या गप्पांमुळे त्याचा यात्रेचा गृहपाठ चांगला झाला होता. त्यामुळे त्याने सगळी बारीक-सारीक चौकशी केली. बरोबरचे लोकं कसे आहेत, किती चालते आहेस, जेवायला काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी कधी येणार आहेस!

दिनांक १९ जून २०११ (गुंजी ते नबीढांग)

आज पुन्हा १८ किलोमीटर चालायचं होत. नबीढांग कँपवरून ‘ॐ पर्वताचे’ दर्शन होते. डोंगरात पडलेल्या बर्फामुळे त्या पर्वतावर ‘ॐ’ चा आकार निर्माण होतो. दिवस चढेल अशी हवा खराब होते. दर्शन होण्याची शक्यता कमी कमी होते. त्यामुळे लवकरात लवकर पोचण्यासाठी सगळे उत्सुक झाले होते. इतके दिवस चालताना पावसाने अजिबात त्रास दिला नव्हता. गुंजीची सकाळ मात्र पावसाची उजाडली होती. आय.टी.बी.पी. च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या पावसातच उभं करून पुढच्या प्रवासाची माहिती दिली. शस्त्रधारी जवानांचे फोटो काढू नका. भारतातले फोटो तिकडे चिन्यांना दाखवू नका, अश्या स्वरूपाच्या सूचना दिल्या.




रोज सकाळी माझं आवरून होण्याआधीच हजर असणारी सुरेश-रमेशची जोडी आज मात्र गायब होती. थोडा वेळ त्यांची वाट बघितली, पण सगळ्यांनी चालायला सुरवात केली. अशी किती वाट बघणार? त्यामुळे त्यांना मनात शिव्या देत सॅक उचलून चालायला सुरवात केली. खरंतर रस्ता तसा सोपा होता, पण विरळ हवा आणि पाठीला सॅक असल्यामुळे माझी अवस्था वाईट होत होती. गुंजीपासून नबीढांगपर्यंतच्या रस्त्याचे काम चालू आहे. अजून काही वर्षांनी यात्रेचा हा भाग वाहनाने करता येईल. ह्या क्षणी मात्र मी त्या रस्त्याशी झुंजत होते. तेवढ्यात नंदिनीचा घोडेवाला आला. त्याने माझी सॅक घेतली. अजून एक तासभर चालल्यावर सुरेश उगवला. ‘दिदी माफ करना. अलार्म ही नही बजा’ वगैरे सारवासारव करून माझे सामान उचलून चालायला लागला.



आज आमच्याबरोबर सगळ्यात पुढे-मागे दोन-दोन संगीनधारी आणि एक वायरलेसधारी जवान, एक लष्करातील डॉक्टर, लष्करी अधिकारी असा लवाजमा होता. महिला यात्रींच्या सोयीसाठी काही महिला सैनिकसुद्धा ह्या तुकडीत असतात. आता इथून पुढची सगळी वाटचाल अशा लष्करी शिस्तीत आणि देखरेखीत होणार होती.



चालताना उजव्या हाताला खूप दूर बर्फाच्छादित डोंगर दिसत होता. तो म्हणजे छोटा कैलास किंवा आदी कैलास. तिबेटामधील कैलासाची भारतातील प्रतिकृती. तिबेटमध्ये गौरी कुंड आहे. आदी-कैलासच्या पायथ्याशी पार्वती सरोवर आहे. असे एकूण पाच कैलास आहेत. तिबेटामधील महा-कैलास, आदी कैलास, मणी-महेश, किन्नोर कैलास आणि श्रीखंड कैलास. ह्या सगळ्या कैलासांचं दर्शन घेऊन आलेल्या भक्तांना ‘पंचकैलासी’ असं म्हणतात.

आता इतके दिवस सोबत करणारे उंचच उंच वृक्ष आणि हिरवळ विरळ होत असल्याचे जाणवू लागले होते. डोंगरमाथ्याचे हिरवेपण सरत चालले होते. जिकडे बघावे तिकडे हिमाच्छादित पर्वत दिसत होते. वातावरणातील थंडी चांगलीच जाणवत होती. थंडीपासून बचावासाठी सतत हाताचे पंजे, पावले, कान आणि नाक झाकून ठेवा. एकच जड कपडा न घालता पातळ कपड्यांचे एकावर एक थर घाला, अश्या सूचना आम्हाला वारंवार मिळाल्या होत्या.

कालीमाता मंदीर
साधारण तीन तास चालल्यावर दूरवर डोंगरात कालापानी कँप दिसत होता. इथेच ‘व्यास गुहा’ दिसते. ह्याच गुहेत बसून महर्षी व्यासांनी महाभारत लिहील अस म्हणतात. म्हणून ह्या डोंगराला ‘महाभारत पर्वत’ म्हणतात. आज मात्र पावसाची हवा असल्याने हे दर्शन आम्हाला झाले नाही. कालापानी कँपमध्ये कालीमातेचे मंदिर आहे. इथूनच काली नदीचा उगम होतो. ही नदी भारत-नेपाळची सीमा निश्चित करते. कालीमातेच्या दर्शनानंतर आय.टी.बी.पी.च्या जवानांनी सर्वांना गरमागरम चहा दिला. सगळ्या कँपमध्ये स्वच्छता, टापटीप जाणवत होती. एका बंकरमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांकडे सर्वांनी आपले पारपत्र सुपूर्द केले आणि इमिग्रेशन फॉर्म भरून दिला. भारतातून बाहेर जाण्याचा शिक्का मारून त्यांनी आमची पारपत्र आम्हाला परत केली.


कालापानी कँपवरील लष्करी पाहुणचार
आता उत्सुकता होती ती ‘ॐ पर्वताच्या’ दर्शनाची. पण अजून साधारण दोन हजार फूट चढाई बाकी होती आणि नऊ किलोमीटर अंतर. अजूनही उन्हाचा पत्ता नव्हता. जवान लोक ‘हौसला रखोअभी मोसम खुला जायेगा.’ असा धीर देत होते. एव्हाना पाऊस थांबला होता पण कडक थंडीचा तडाखा जाणवत होता. विरळ होत चाललेली झाडे, पाने, फुले ह्यांच्याकडे लक्ष देण्याची फार कोणाची मन:स्थिती नव्हती. तरीही सभोवतालचे निरनिराळ्या आकाराचे, रंगांचे डोंगर तसेच इटुकली रंगीबेरंगी फुले लक्ष वेधून घेत होती.



नारंग सर सगळ्यांशी गप्पा मारून मनावरचे दडपण कमी करायचा प्रयत्न करत होते. ते उगीच शिस्तीचा बागुलबोवा करणाऱ्यातले नव्हते. ‘सगळे यात्री  वयाने मोठे, समजदार आहेत. आपली आपली जबाबदारी ओळखून चाला', अश्या विचारांचे एल.ओ. मिळाल्यामुळे कोणतीही जबरदस्ती नव्हती. 


ज्याच्या दर्शनाची आस घेऊन सगळे धडपडत, घाईघाईने नबीढांग कँपपर्यंत आलो होतो, तो ॐ पर्वत काळ्याकुट्ट ढगांच्या आड गेला होता. थंडगार वारा सुटला होता. ‘जोराच्या वाऱ्याने मळभ जाऊन आता तुम्हाला दर्शन होईल. धीर धरा’ असे जवान, पोर्टर सांगत होते. सगळे कितीतरी वेळ त्या भयंकर थंडीत बाहेर दर्शनाची वाट बघत थांबले होते. पण आज निसर्ग आमच्यावर रुसला होता. काळोख झाला तरी ॐचे दर्शन काही झाले नाही.


बिकट वाट वहिवाट!
दुसऱ्या भल्या पहाटे तीन वाजता चालायला सुरवात करायची होती. इथे जमा केलेले सामान एकदम तिबेटमध्ये मिळणार होत. होते नव्हते ते गरम कपडे चढवून आणि सुरेशभाईला पहाटे वेळेवर येण्यासाठी दहादा बजावून रात्री आठ वाजता झोपायचा प्रयत्न सुरू केला होता. दुसऱ्या दिवशीचा प्रचंड थंडीतला प्रवास कसा झेपणार ह्याची खूप काळजी वाटत होती. खूप वर्ष मी ज्या यात्रेची स्वप्न बघितली, त्या यात्रेचा मोठा टप्पा उद्या संपणार होता. पण त्या विचारांनी आनंद होण्याऐवजी मला आतापर्यंत केलेल्या ट्रेकमध्ये झालेले सगळे त्रासच डोळ्यासमोर येत होते. ‘कशाला ह्या भानगडीत पडलो, उगाच सुखातला जीव दुःखात टाकला’ असे सगळे बिच्चारे विचार  मनात येत होते. नंदिनीसुद्धा आज खुशीत नव्हती. आत्ता जर कोणी एकानी रडायला सुरवात केली असती, तर सगळ्यांनी एकमेकांच्या साथीने रडून घेतलं असतं!!  पण सुदैवाने तसं काही झालं नाही. 

दिनांक 20 जून २०११ (नबीढांग ते लीपुलेख पास)

प्रचंड थंडीमुळे झोप काही फार चांगली लागली नाही. पण पहाटे १.३० वाजता चहा आला. सगळे खडबडून उठले. कसेबसे तोंड धुऊन, प्रातर्विधी उरकून तयार झालो. काल झोपताना बरेचसे गरम कपडे अंगावर चढवून झोपले होते. उरलेसुरले आता चढवले. हातमोजे, कानटोपी, पायात लोकरी मोज्यांच्या दोन जोड्या असा जामानिमा केला. एवढे कपडे थंडीला तोंड देण्यासाठी गरजेचेच होते. पण आधीच हवा विरळ, त्यात हे जाडजूड कपडे घातल्यामुळे श्वास कोंडल्यासारखे वाटत होते. शरीर जागे झाले तरी अजून मेंदू झोपलेला आहे, अशी भावना होत होती.



२.३० वाजता थोडा बोर्नव्हीटा घशाखाली ढकलला. २.३० ही वेळ घरी असताना साखरझोपेची. पण इथे मात्र सगळे कुडकुडत पुढच्या प्रवासासाठी तयार झाले होते. यात्रेत खूप वेळा ५.३०-६.०० वाजता नाश्ता केला होता. पण ही वेळ अगदीच विचित्र होती. यात्रेतील प्रत्येक दिवसागणिक यात्रींचे शरीर आणि मन तेथील प्रदेश, हवामान, वारा, पाऊस, थंडी सगळ्याला तोंड द्यायला तयार झाले होते. यात्रेची सुरवात  धारलापासून केली होती. तिथली समुद्रसपाटीपासूनची उंची ३००० ते ४००० फूट आहे आणि आता नबीढांगला जवळजवळ १४००० फुटांवर होतो. आता शेवटच्या चढाईची परीक्षा द्यायची होती.

लीपुलेख खिंड म्हणजे १८००० फुटांच्या वर पसरलेले विस्तीर्ण पठार. भारत आणि तिबेट ह्यांना जोडणारा प्रदेश. त्याच्या दोन्ही बाजूंना आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे सैन्याच्या पहाऱ्याच्या चौक्या सोडल्या तर सगळा निर्मनुष्य प्रदेश आहे. आपल्या बाजूला नबीढांगपर्यंत आणि तिबेटमध्ये सहा किलोमीटरपर्यंत काहीच नाही. बर्फाच्छादित प्रदेशामुळे साधे गवताचे पातेदेखील उगवत नाही. हा अतिशय लहरी हवामानाचा प्रदेश आहे. सकाळी दहानंतर कधीही सोसाट्याचा वारा सुटून हिमवादळाला सुरवात होऊ शकते. जर त्या वादळात कोणी सापडले तर जीवाशीच खेळ. त्यामुळे आपले जवान भारतातून तिबेटकडे जाणाऱ्या आणि तिकडून परत येणाऱ्या बॅचेसना सकाळी साडेसातची वेळ देतात. म्हणजे बॅचेस् सुखरूप तिबेटमध्ये तकलाकोट आणि भारतात नबीढांगला पोचतात. लीपुलेख खिंडीच्या भयंकर थंडीत अर्धा ताससुद्धा थांबणं अतिशय कठीण असत. त्यामुळे दोन्ही बॅचेसनी वेळ पाळणे हे फार महत्त्वाचे असते.

काळोखाचे साम्राज्य सगळीकडे पसरले होते. आकाशात तारे लुकलुकत होते. लष्कराने चालण्याच्या वाटेवर लावलेले दिवे दिसत होते. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, अश्या मिट्ट काळोखात चालायला सुरवात केली. प्रचंड हा शब्द कमी पडेल इतकी प्रचंड थंडी होती. लष्कराचे जवान ‘चलिये, भले शाबासबोलिये ॐ नमः शिवाय’ अस प्रोत्साहन देत होते. थोडं अंतर चालल्यावर पावले हळूहळू जड वाटायला लागली. हृदयाचे जलद गतीने पडणारे ठोके माझे मलाच ऐकू येत होते. पोटातील मळमळ आणि डोकेदुखी जोर धरत होती. 

नबीढांग ते लीपुलेख हा यात्रेतील सर्वात कठीण, अवघड प्रवास असे ऐकले-वाचले होते. पण तो इतका अवघड असेल अस वाटलं नव्हत.  शेवटी मी फार धोका न पत्करता घोड्यावर बसले. थोड्या चालण्याने थंडीतही घाम फुटला होता. घामावर वारा लागून जास्तच थंडी वाजायला लागली. रात्रीची वेळ, थंडी आणि थकव्याने डोळे मिटू लागले. रमेशभाई सारखा मला उठवत होता. ‘ दिदी, सोना मत. आंखे खुली रखो नमः शिवाय' का जाप करते रहो’ अस म्हणत होता. अस पेंगत, उठत असताना हळूहळू उजाडायला लागले. आता झोप उडली. सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. नजर जाईल तिथपर्यंत सगळे डोंगर फक्त बर्फाने झाकलेले होते. सृष्टीतील जिवंतपणाची काही खूण नव्हती.





त्या विरळ हवेची थोडी सवय व्हावी म्हणून बऱ्याच वेळा सगळी बॅच मधूनमधून थांबवत होते. काही वेळात आम्ही भारत आणि चीनमधल्या ‘नो मॅन्स लॅण्ड मध्ये प्रवेश केला. जवानांनी आपल्या जवळची शस्त्रे एका जागी ठेवून दिली. एक जवान तिथे थांबला. आमचा काफिला पुढे चालू लागला. एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असच दृश्य होत. परदेशात जाण्याचा हा वेगळाच मार्ग होता. निर्वासितांची टोळी पळून चालली आहे असाच ‘सीन’ वाटत होता.



यात्रेसाठी निघण्याआधी मी पुण्यात बँकेत डॉलर घ्यायला गेले होते, ती आठवण आली. डॉलरसाठी अर्ज करताना त्या बरोबर विमानाच्या जाण्या-येण्याच्या तिकिटाची प्रत जोडावी लागते. मी ती अर्थातच जोडली नव्हती. मी त्या अधिकाऱ्याला म्हटलं, ’अहो, पण मी चालत चीनला जाणार आहे!’ त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता! माझ्याकडे यात्रेसंदर्भातलं विदेश मंत्रालयाचं पत्र होत. तेवढ्यावर त्यांनी मला डॉलर दिले.



साधारण सातच्या सुमारास आम्ही चीनच्या हद्दीवर पोचलो. सुरेश-रमेशच्या जोडीला त्यांचे ठरलेले पैसे व थोडी बक्षिसी दिली. त्यांच्या कष्टांची, सहकार्याची किंमत पैशात करणे अशक्य होते. त्यांनी ‘दिदीसंभालकर जाना. पहाड गिरता है. उपर-नीचे ध्यान रखनाघोडेपे ना बैठनेकी जिद मत करना. ठीकसे वापस आना.’ अश्या खूप आपुलकीच्या सूचना दिल्या. तसं पाहता आमचं अगदी व्यावहारिक नात. पण गेल्या काही दिवसांच्या सहवासानंतर मैत्र जुळले होते. त्यांचा, तसेच आय.टी.बी.पी.चे अधिकारी, जवान, डॉक्टर सगळ्यांचा भरल्या मनाने निरोप घेऊन आम्ही तिबेटकडून येणाऱ्या पहिल्या बॅचेसची वाट बघू लागलो.




थोड्याच वेळात पहिली बॅच आली. आम्ही सर्व यात्रीनी त्याचं ‘ नमः शिवाय’ च्या गजरात स्वागत केले. हे सगळे लोक अतिशय कठीण समजली जाणारी कैलास-मानसची यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण करून आले, ह्याच कौतुक वाटत होते. सगळे एकमेकांच्या पाया पडत होते. भक्ती आणि भावनांना पूर आला होता. माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीलाही ते भारलेलं वातावरण स्पर्श करत होत.

पहिल्या बॅचबरोबर चीनचे लष्करी अधिकारी आले होते. त्यांनी आमची पारपत्रे ताब्यात घेतली. आम्ही डोक्यावरच्या टोप्या, स्कार्फ काढून ओळख पटवण्यासाठी उभे राहिलो. त्यांच्याकडची कागदपत्रे, आमची पारपत्रे सगळं दहा वेळा बघून त्यांनी ‘मी’ खरंच ‘मी’ असल्याची खात्री पटवली आणि आम्ही तिबेटमध्ये पहिले पाऊल टाकले!!

ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा

भाग ६ : लिपूलेख खिंड ते दारचेन  https://aparnachipane.blogspot.com/2018/09/blog-post_20.html



Comments

Popular posts from this blog

जीवन ज्योती कृषी डायरी - भाग ७ धीरे धीरे रे मना.....

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

आनंदाचा कंद : लंपन