दक्षिणेतील डोंगरवाटा (कोडाईकॅनाल मुन्नार ट्रेक) भाग-2

दक्षिणेतील डोंगररांगा (भाग-1) वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा.
https://aparnachipane.blogspot.com/2017/10/blog-post.html

कोडाईकॅनाल ते वेल्लाकवी

ट्रेकमध्ये 'शिट्टी' हे सर्वस्व असते. सगळा दिनक्रम शिट्टीच्या तालावर चालतो. सकाळी बेड टी, व्यायाम, ब्रेकफास्ट, चहा, पॅक लंच इतक्या शिट्ट्या आणि कँपवर पोचल्यावर वेलकम ड्रिंक, चहा, नाश्ता, सूप, जेवण आणि बोर्नव्हिटा एवढ्या (तरी!) शिट्ट्या वाजायच्या!! तरी इथे बऱ्याच कँपवरच्या लीडर लोकांना भाषेचा अडसर असल्यामुळे सूचना-सेशन रद्द झालं. नाहीतर त्याही शिट्ट्या असतात.

कोडाईकॅनालच्या बेसकँपच्या एका खोलीत सात जणी होतो. वयोगट पंचेचाळीस ते तेरा! त्यामुळे कपड्यांपासून गप्पांच्या विषयापर्यंत खूप व्हरायटी होती. आजच्या दिवस अंघोळीसाठी गरम पाणी ही महत्वाची सोय होती. पुढे चार दिवस अंघोळीच्या गोळ्यांवर भागवायचं असल्याने समस्त महिलावर्गाने झटाझट अंघोळी उरकल्या. इथेतिथे पसरलेल्या सामानाच्या मुसक्या आवळून ते सॅकच्या भव्य उदरात गडप करण्यात आलं. नाश्ता झाला. दुपारच्या जेवणाचा डबा, पाण्याच्या बाटल्या भरल्या गेल्या. चालायचे बूट, टोप्या चढल्या. जड सॅक पाठीवर लावल्या आणि आमच्या बॅचने पहिले पाऊल टाकले.


आजचा रस्ता १४-१५ किलोमीटर आहे आणि उताराचा आहे, अशी माहिती मिळाली होती. सुरवातीचा रस्ता कोडाईकॅनाल शहरातून होता. टूरिस्ट, मधुचंद्रीय मंडळींच्या त्या भाऊगर्दीत मळके कपडे, पाठीला सॅक अशा अवतारातली आम्ही पन्नास मंडळी अगदीच विसंगत दिसत होतो. 'न जाने कहाँ कहाँसे आते है मुँह उठाके' असे त्यांच्या मनातले विचार त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येत होते!


थोडा रस्ता चालून गेल्यावर आम्ही जंगलात शिरलो आणि गर्दीपासून सुटका झाल्यामुळे हुश्श झालं. उताराचा रस्ता म्हणजे सोपा असेल, दमायला होणार नाही, असं वाटलं होतं. पण हा उतार इतका जोरदार होता, की एकेक पाऊल जपून, दाबून टाकायला लागत होतं. थोडं जरी इकडेतिकडे झालं, तर कपाळमोक्ष होईल अशी भीती वाटत होती.


मुंबई, पुणे, नाशिकहून आलेल्या लोकांमुळे बॅच मध्ये मराठी लोकांची मेजॉरिटी होती. चेन्नईहून इंजिनीरिंगच्या मुलांची एक गँग आली होती. बाकी जनता गुजराथ, तामिळनाडू, केरळ वाली होती. सुरवातीला सगळे आपल्या लोकांबरोबर असतात. नंतर हळूहळू हे बदलत जातं. चालायच्या वेगाप्रमाणे सोबतचे भिडू बदलतात. अजिबात परिचय नसलेलेही चालताना हात देणे, दमल्यावर धीर देणे, वेळप्रसंगी सॅक उचलणे अशी सगळी मदत करतात. चालता चालता आमचा त्या दिवशीचा लंच पाॅइंट आला. यूथ हॉस्टेलचा स्टॅण्डर्ड मेनू म्हणजे बटाट्याची भाजी आणि पुऱ्या. 'जंगलमें भालू और वाय.एच.ए. में आलू होतेही होते है!' अस तत्त्वज्ञान त्या मागे आहे. प्रथेला जागून पुरी-भाजी खाल्ली, फोटो काढले आणि मार्गस्थ झालो.


साधारण ९.३० ते ३.३० इतकं चालल्यावर वेल्लाकवी गाव आलं एकदाच. हे गाव अगदी लहानसं आहे. चाळीस-पन्नास घरं असतील आणि तेवढीच देवळंही! कोडाईकॅनालच्या सरांनी ह्या गावात चपला/बूट घातलेले चालत नाहीत, ह्याची कल्पना दिली होती. गावाच्या सीमेवर बूट उतरवून अनवाणी चालत कँपवर पोचलो.


थोडा शीण गेल्यावर गावात चक्कर मारून आलो. ओसरी-माजघर पद्धतीची घरं होती. प्रत्येक दारासमोर मोठ्या रांगोळ्या काढलेल्या. अगदी लहान रस्ते. रस्ते कसले गल्ल्या-बोळच. सगळ्यांच्या कॉफी, संत्र्याच्या बागा. कौतुकाची गोष्ट म्हणजे, इतक्या लहान, आड जागी वसलेल्या गावातही वीज होती. पाईपलाईनने पाणी पुरवठा होत होता. चेन्नई गँगमधल्या एकाला पकडून त्याला दुभाषक बनवून गावातल्या लोकांशी थोड्या गप्पा मारल्या.

रात्री जेवणानंतर जोरदार कँपफायर झालं. लाकूड जाळण्यावर असलेल्या निर्बंधामुळे आता कँपफायर मध्ये शेकोटी नसते. पण गाणी-नाच सगळं यथासांग झालं. मराठी आणि तमिळ पब्लिकला येणारं 'कोलावेरी डी' हे गाणं आमचं बॅचसाँग झालं. पुढचं एकही कँपफायर ह्या गाण्याशिवाय पार पडलं नाही!

वेल्लाकवी ते कुरुंगनी


कालच्यापेक्षा आज चालायचं अंतर कमी आहे, असं समजलं होतं. उताराचाच रस्ता होता. एका धबधब्याजवळ चालणं संपणार होतं. तिथून पुढे काही अंतर जीपमध्ये बसून जायचं होतं. आज तामिळनाडू राज्याची वेस ओलांडून केरळ राज्यात प्रवेश करायचा होता.

सकाळी थोडे स्ट्रेचिंग, व्यायामाचे प्रकार झाले. नंतर आवरून सगळे तयार झाले. निघताना डब्याबरोबर जवळच्या बागेतील ताजी, चविष्ट संत्री प्रत्येकाला मिळाली.  त्या चिमुकल्या खेड्याचा निरोप घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. पुन्हा 'जपून चाल, पोरी जपून चाल' चा पुढचा अंक सुरू झाला. दहा-पंधरा मिनिटे चालत नाही, तोवर एक काका आपली सॅक कँपवर विसरून आल्याचे कोणालातरी लक्षात आलं! झालं. हसण्या-खिदळण्याला ऊत आला. कँपवर स्लीपर्स, कपडे इत्यादी गोष्टी विसरणारे शूरवीर मी पाहिलेले आहेत. पण ट्रेकमधली आपली संपूर्ण संपत्ती असलेली सॅकच विसरून येणे महान होते! पुढचे सगळे दिवस सगळेजण त्यांना 'सॅक घेतली का?' ही आठवण न विसरता करायचे!

रोज आमच्या बरोबर एक गाईडदादा असायचे. हिमालयातल्या गाईडदादांशी बोलताना भाषेचा अडसर येत नाही. राष्ट्रभाषेत संवाद होऊ शकतो. इथे तो प्रश्न फारच भेडसावत होता. हावभाव आणि खाणाखुणा जोरात चालू असल्याने सगळे सारखे डंबशेराट्स खेळत आहेत नाहीतर कथ्थकच्या मुद्रा करत आहेत, असं वाटायचं! तरी नशीब की चेन्नई गँगमधली तरुण मंडळी दुभाष्याच काम अंगावर घेत होती. ह्या आमच्या गाईडदादांना शाळेत बहुतेक तीन पर्यंतच अंकओळख झाली असावी. कारण अजून किती वेळ लागेल?, किती किलोमीटर राहिले ह्या लोकप्रिय प्रश्नांना ते कायम १/२/३ ह्याच आकड्यात उत्तरं द्यायचे!! कमी नाही, जास्त नाही.


सुरवातीला अत्यंत खतरनाक असलेला उतार हळूहळू मवाळ होत गेला. त्या जंगलात मोठ्या प्रमाणात चिंचांची झाडं होती. चिंचांचे आकडे अगदी सहज हाताला येतील, इतक्या खाली होते. संत्री, चॉकलेट, चिंचा, चिक्की, खजूर असे एकमेकांशी काहीही ताळमेळ नसलेले पदार्थ खाऊन पोटाला कन्फ्युज करण्याचं काम नेटाने चालू होतं.




पुष्कळ वेळ चालल्यावर वन खात्याच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या. वर छप्पर असलेले बाक, 'टाळा प्रदूषण- करा निसर्गाचे रक्षण' टाईपचे तमिळ बोर्ड वगैरे. (म्हणजे बहुधा असावेत. इथे वाचता कोणाला येत होती ती लिपी!) आता आपण लोकवस्तीच्या जवळ आलो, हे लक्षात आलं. अर्ध्या तासातच धबधब्याजवळ येऊन पोचलो. आता पुढे जीपने जायचं होत. त्यामुळे चालायचे बूट उतरवून मी नदीच्या थंडगार पाण्यात पाय बुडवून बसले. एकदम 'अहाहा' असं फिलिंग आलं. ही असली काही सुखं मिळवण्यासाठी आधी दहा-बारा किलोमीटर पायी तुडवावे लागतात. तीच त्या सुखाची किंमत. 

आमच्या ग्रुपला मागे टाकून मी बरीच पुढे आले होते. चालताना नाही तर निदान जेवायला तरी थांबावं म्हणून सहट्रेकर्सच्या जेवून घ्यायच्या आग्रहाला नकार देत मी तिथल्या खडकावर उन्हात आडवी झाले. झोपले नव्हते पण छान ग्लानी येत होती. बाकीच्यांचे गप्पांचे, हसण्याचे आवाज येत होते. मन अगदी शांत झालं होतं. बराच वेळ कोणाशी अक्षरही न बोलता मी मस्त पडून राहिले. थोड्या वेळाने बाकी मंडळी येऊन पोचली. कोण कुठे पडलं, उतरताना किती वाट लागली, पाय कसे दुखताहेत अशा गप्पा, जेवण झालं. जवळच्या नदीवर सगळी पुरुष मंडळी कधीपासून डुंबत, मजा करत होती. त्यांचा फार हेवा वाटत होता. पण कपडे बदलायला जागा, ओले कपडे बाळगणे हे प्रश्न येतात, त्यामुळे नको वाटत होतं.

शेवटी मोहाचा विजय झाला. आमची जेवणं झाल्यावर, सगळ्या पुरुष मंडळींना पाण्यातून बाहेर काढून आम्ही आत शिरलो. एका फाॅरेस्ट गार्ड काकू आमच्यावर लक्ष ठेवायला काठावर बसल्या. त्यांच्या कडक नजरेखाली आम्ही धमाल करायला सुरवात केली. सुरवातीला थंडगार वाटणार पाणी नंतर सुखद वाटायला लागलं. हा आमचा फुकटचा स्पा होता. दोन दिवस चालल्याचा शीण पार निघून गेला. शरीर अगदी हलकंहलकं वाटत होतं.

थोड्याच वेळात मिनी बस आल्या. अंघोळ करून फ्रेश वाटत असलं, तरी पाय आखडलेले होते. त्या बसच्या पायऱ्या उतरताना नवीन चालायला लागलेली लहान मुलं जशी प्रत्येक पायरीवर दोन्ही पाय ठेवत उतरतात तसे सगळे उतरत होते. बस निघाल्या. आम्ही केरळच्या रस्त्याला लागलो. एरवी अशा प्रवासात पाट्या वाचण्याची करमणूक असते. इथे मात्र काहीही वाचता येत नव्हतं. कळायला लागण्याआधीच आपण वाचायला शकतो. त्यामुळे अशिक्षित माणसांना पाट्या पाहून कस वाटत असेल, हे तिथे नीटपणे कळत होतं.

माझी शाळेमध्ये बरोबर असलेली, पण आता दिल्लीत स्थायिक झालेली एक मैत्रीण बरोबर होती. आधी आम्ही लांब-लांब बसलो होतो. पण आमच्या गप्पांनी बाकीच्यांची झोपमोड व्हायला लागल्याने त्यांनी आम्हाला जवळ जागा दिल्या! मग कल्याणची शाळा, माहेर-सासर, भावंड, राजकारण, मुलं, पाककृती, मराठी साहित्य, ऑफिसेस अश्या सर्वसमावेशक विषयांवर गप्पा झाल्या.


अम्मांचे फोटो दिसेनासे होऊन आता केरळच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसायला लागल्यामुळे आता आपण केरळात आलो, हे लक्षात आलं. हिरव्यागार जगातून प्रवास करत कँपवर येऊन पोचलो. पुन्हा वेलकम ड्रिंक- नाश्ता - सूप- जेवण - बोर्नव्हिटा- कँपफायर हे झालं. दोन दिवसांनी चार्जिंगची सोय मिळाली होती. त्यामुळे सगळ्यांनी नंबर लावून चढाओढीने फोन / कॅमेरे चार्ज केले. स्वतःला चार्ज करण्यासाठी सगळे गुडुप झोपून गेले.

दक्षिणेतील डोंगररांगा (अंतिम भाग-3) वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा.

Comments

  1. As good as the first part !!

    ReplyDelete
  2. अगदी सुंदर !
    वाचताना सह प्रवास केल्या सारखा वाटलं!

    ReplyDelete
  3. अगदी सुंदर !
    वाचताना सह प्रवास केल्या सारखा वाटलं!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५