दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-३ (अंतिम)
दक्षिणेतील डोंगररांगा (भाग-2) वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/10/2.html भाग-3 कुरुंगनी ते सेंट्रल स्टेशन ट्रेकला यायचं ठरवणं , तयारी ह्या सगळ्यातून पार पडत इथे आलो. ही आत्ताच तर सुरवात झाली आहे , असं म्हणता म्हणता अर्धा ट्रेक संपला सुद्धा. आता फक्त आज आणि उद्या. मग परत जीप , बस, ट्रेन आणि घरी परत. आजचा दिवस सगळ्यात कठीण आहे , असं सगळे सांगत होते. त्यामुळे थोडी काळजी वाटत होतीच. त्यात पावसाची लक्षणं दिसत होती. सॅकमधलं सामान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असल्याने ते भिजायची भीती नव्हती. सर्व मंडळींनी रेनकोट चढवले. रेनकोट घालून चालताना खूप घाम येतो. पावसापासून बचाव करावा , तर घामेघूम होऊन भिजायला होतच. नारळी-पोफळीच्या बागा बघत सगळे चालत होते. थोड्याच वेळात जंगलात शिरलो. जरा कठीण चढ सुरू झाला. श्वासाचा वेग वाढला आणि चालायचा कमी झाला. तरुण आणि तडफदार मंडळी आम्हाला न थांबता चालत राहा , असे सल्ले न कंटाळता देत होती. ह्या सगळ्यांना सात वेळा पळत पळत डोंगर चढायला लावला पाहिजे , मग कळेल ; असे दुष्ट विचार मनात येत होते. पण बोलणं शक्य नस...