अमेरिकन सूर्यग्रहण

अमेरिकन सूर्यग्रहण



आज अमेरिकेत सूर्यग्रहण होतं. काही भागात खग्रास तर काही भागात खंडग्रास. आमच्या गावात खंडग्रास ग्रहण होतं. टी.व्ही. वर बऱ्याच आधीपासून काउंटडाउन सुरु होता. जिथून खग्रास ग्रहण दिसणार होतं, तिथे किती गर्दी होणार आहे, हॉटेल्सची बुकिंग्ज कशी संपत आली आहेत वगैरे वगैरे चर्चा चालू होत्या.

जसा जसा दिवस जवळ येऊ लागला, तसं ग्रहण बघताना डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, खास ग्रहण बघण्याचे चष्मे कुठे मिळतील वगैरे विषय पुढे आले. पब्लिक लायब्ररी आणि इतर काही ठिकाणी हे चष्मे फुकट वाटण्यात आले. शेवटच्या दिवशी तर प्रचंड मागणीमुळे वॉलमार्टसारख्या दुकानांमधले चष्मे संपले! आम्ही राहतो, त्या सोसायटीत ग्रहण बघायला आबालवृद्धांची गर्दी झाली होती. ज्यांना हे खास चष्मे मिळाले नव्हते, त्यांना बाकीचे आपले चष्मे देत होते. सगळ्यांनी मिळून निसर्गाच्या ह्या अद्भुत आविष्काराचा आनंद घेतला.

बऱ्याच वर्षांनी अमेरिकेत सूर्यग्रहण झालं. हा मुहूर्त साधून इथे काही लग्नं झाली. मला ह्या बातम्या बघताना गंमत वाटत होती. आधीच अमावास्या, त्यात ग्रहण! अशा दिवशी लग्न करायचा विचार भारतात कोणी मनात आणला असता, तर घरात भूकंप नक्की झाला असता!!


इथे लोकं खात-पीत होते. गर्भवती स्त्रिया आजिबात न बिचकता ग्रहण बघत होत्या. इंग्रजीत ग्रहणाचे वेध, ग्रहणकाल संपल्यावर स्नान असले शब्द नसावेत. 'दे दान सुटे गिरहान' अशा आरोळ्याही ऐकू आल्या नाहीत. देश बदलला, की एकाच घटनेचे अविष्कार किती वेगळे होतात, ह्याचे आश्चर्य वाटत राहिले..  

Comments

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५