भाग-2-आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)
आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-1 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post_14.html पुणे - मुंबई सेंट्रल - दिल्ली - काठगोदाम (७ आणि ८ जून २०१४) सात जूनला सर्व पुणेकर मंडळी स्वारगेटला जमली. प्रवासाला जाणारे जास्त आनंदात की सोडायला आलेले , ह्याचा निर्णय होत नव्हता! भारतात एशियाड झाल्याला आता तीस वर्षे होऊन गेली , तरी राज्य परिवहनाने ‘ एशियाड बसच्या ’ स्वरूपात ती स्मृती सांभाळून ठेवली आहे. तश्या एशियाड बसमध्ये आमचं रिझर्वेशन होत. सिंहगड एक्प्रेसच तिकीट डेक्कन एक्सप्रेसला वापरलेलं रेल्वेवाल्यांना अजिबात , मुळीच , कधीही चालणार नाही. पण रा.प. वाली मंडळी दयाळू असतात. साडेअकराच्या बसचं तिकीट काढलेलं होत. पण साडेअकराला इथे जी बस उभी होती , ती वेळापत्रकाप्रमाणे पावणेअकराची होती. मास्तरांनी आम्हाला त्या बसमध्ये आमच्याच सीटवर बसून घ्यायला सांगितलं!! कुठल्यातरी बसचं तिकीट काढलंय ना , झालं तर मग.. असा उदार दृष्टिकोन ठेवून त्यांनी आमची व्यवस्था केली. बसची रिझर्वेशन्स मी केली होती. स्वारगेटला येऊन मी समजा ‘ अग , मी तिकीट घ...