तरंगायचे दिवस! (भाग -१)

तरंगायचे दिवस!
कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

प्रस्तावना
माझं सगळ लहानपण आणि तरुणपण कल्याणला गेल. कल्याण मुंबईपासून अगदी जवळ. माझ्या बाबांसकट शेजारपाजारचे, ओळखीतले सगळेजण लोकलने ये-जा करून मुंबईत नोकऱ्या करत असत. कल्याणच्या जुन्या भागातल्या एका वाड्यात आई-बाबा, माझा मोठा भाऊ आणि मी राहत असू.
कल्याणला बाकी काही फार अडचणी नव्हत्या. आसपास सुशिक्षित समाज होता, शाळा चांगली होती, मुली-बाळी सुरक्षितपणे एकट्या आनंदाने फिरू शकत होत्या. थोडक्यात एखाद्या लहान गावाची ऊब शाबूत होती. पण खेळाच्या किंवा करमणुकीच्या साधनांची मात्र वानवा होती. जिल्ह्याचे ठिकाण ठाणे. त्यामुळे नाटक बघायचे, तर ठाण्याला गडकरी रंगायतन गाठावे लागायचे. गडकरीला जाताना शेजारचा तरणतलाव दिसायचा. तिथून जाताना क्लोरिनचा तो टिपीकल वास यायचा. माझ्या बाबांची आम्ही दोघांनी पोहायला शिकावं, अशी फार इच्छा होती. दरवेळेला ठाण्याच्या स्वीमिंग पूलजवळून जाताना ‘ह्या उन्हाळ्यात दोघांची इथे नाव घालूया. आई आणि तुम्ही रोज येत जा. की पुण्याला जाल?’ असा संवाद व्हायचा. मला लगेच मी ऐटीत पाण्यात सूर मारते आहे, सपासप हातपाय मारत वेगाने पोहते आहे, अशी दृश्य डोळ्यासमोर यायला लागायची.
प्रत्यक्षात मात्र ते तितकस सोप नव्हत. घर, स्टेशन, तिकीट काढणे, ट्रेनचा प्रवास मग स्वीमिंग पूल. पोहण्याचा एक तास झाला की हीच सगळी तपश्चर्या उलट दिशेने. सगळ मिळून चार तास सहज लागले असते.
कल्याणला एक छान खाडी होती. पण तिथे पोहायला जाणे फार लोकमान्य नव्हते. खाडी बळी घेते, तिथे भोवरे-दलदल-खडक इ.इ. गोष्टी आहेत, अश्या बातम्या सगळीकडे चघळल्या जायच्या. कल्याणच्या खाडीचे पात्र चांगलेच म्हणजे जवळपास एक किलोमीटर रुंद आहे. डावीकडे बघितल की कल्याणच्या लोकांचा अभिमानाचा विषय असलेला दुर्गाडी किल्ला दिसायचा. समोर वीटभट्टी, तिथली उंचच उंच चिमणी होती. उजवीकडे बाकदार वळण घेऊन खाडी दिसेनाशी व्हायची.
माझ्या शाळकरी वयात आम्ही अधून-मधून खाडीवर फिरायला जायचो. वाळूचा व्यवसाय तेव्हाही तिथे चालू होता. त्या वाळूचे ढीग काठावर लागलेले असायचे. शहरात दुर्मिळ असलेला मोकळा वारा सुटलेला असायचा. एकूण काय नयनरम्य दृश्य होत! पाणी पाहून मला पोहायला शिकायची हुक्की यायची. अस वाटायचं, त्यात काय कठीण आहे? हात-पाय मारले की सरासर पुढे जायचं. काही लोक पोहत असायचे. एकदा बाबांना कोणीतरी ओळखीच भेटल. त्यांच्याबरोबर बाबाही पाण्यात उतरले. ते सगळे जण छान ऐटीत सफाईदारपणे पोहत होते. ते बघून मी बाबांवर इतकी खूष झाले, की विचारता सोय नाही! त्यांच्या काळजीने मनात बाक-बूक होत होत, तरी काठावर उभी राहून टाळ्या वाजवत होते.
घरी येता-येता बाबांनी ‘चला, ह्या सुट्टीत तुम्हाला इथेच पोहायला शिकवतो. इथे कोपऱ्यावर खाडी असताना काही नको ठाण्याला जायला..’ आईने ‘अहो, अजून एक-दोन वर्षे जाऊ देत, दोघही लहान आहेत अजून.’ असा विरोध करून बघितला. पण बाबा ऐकणार? शक्यच नाही. एकदा त्यांच्या डोक्यात आल, की संपल.

तेव्हा पोहायला शिकवण्यासाठी ‘फ्लोट’ इत्यादि वस्तूंचा उदय व्हायचा होता. दोन पत्र्याच्या डब्यांची झाकण झाळून बंद करून आणली, त्याला दोन्ही बाजूंना कड्या जोडल्या. माझ्या आणि भावाच्या पाठीला ते दोरीने गच्च बांधले, आणि आमच्या साध्या-सरळ, कृष्णधवल रंगातील मध्यमवर्गीय आयुष्यातल्या एका सोनेरी पर्वाला सुरवात झाली.

तरंगायचे दिवस!-भाग 2 वाचण्यासाठी ह्या दुव्यावर टिचकी मारा.  https://aparnachipane.blogspot.com/2017/01/blog-post_71.html 


Comments

  1. Khup chan lihites. Sarva junya aathavani jagya zaly....navhe bhutkalatach phirun aalo. Maza ali.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवन ज्योती कृषी डायरी - भाग ७ धीरे धीरे रे मना.....

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

आनंदाचा कंद : लंपन