आनंदाचा कंद : लंपन
काही पुस्तकं स्पष्टपणे लहान मुलांसाठी असतात तर काही मोठया माणसांसाठी. प्रकाश नारायण संतांची वनवास, शारदा संगीत, झुंबर आणि पंखा ही पुस्तकं मात्र, वयाने मोठं होता होता प्रत्येकाच्या मनात राहून गेलेल्या लहान मुलासाठी आहेत. ह्या पुस्तकांमधील दीर्घकथांचा नायक लंपन हा लहानपण आणि पौगंडावस्थेच्या सीमेवर असणारा अत्यंत निरागस आणि संवेदनाशील असा मुलगा आहे. ह्या पुस्तकातल्या कथा लंपनच्या साधारण सहा-सात ते बारा वर्षांपर्यंतच्या काळातल्या आहेत. लहानपण संपतंय आणि तारुण्याच्या सुगंधी झुळकांची हलकी जाणीव होते आहे, त्या दरम्यानचे हे अस्वस्थ करणारे दिवस. ‘वनवास’ पुस्तकाला जी प्रस्तावना आहे, त्यात पु.ल.देशपांडेंनी ह्या वयाचं अगदी यथार्थ वर्णन ‘emotional sea-sickness’ असं केलं आहे. शाळेच्या असरग्याच्या महादेव मंदिराच्या सहलीत चालताना मास्तर मुलामुलींच्या जोड्या करतात. तेव्हा बरोबर चालणाऱ्या मुलींची आवडीची गाणी म्हणणाऱ्या लंपनपासून ते, ‘पोरी आपल्याकडं सरळ न पाहता चोरून की कसं ते बघायला लागल्यात हे सणसणीत लक्षात यायला लागलेलं. त्यांनी तसं पाहिलं की पाय लटपटतात आणि कानावर निखारे ठेवल्यासारखं होतं...