गीतानुभव

. नुकताच म्हणजे ३ डिसेंबर रोजी दुपारी पुण्यात स.प महाविद्यालयाच्या मैदानावर गीता पाठ महायज्ञ झाला. दहा हजाराहून जास्त लोकांनी एका सुरात, एका लयीत गीतेच्या अठरा अध्यायांचे पारायण केले. त्याबद्दलचे माझे चार शब्द. तिथे मांडवात बसून मैत्रिणींच्या जागा पकडून त्यांची वाट बघताना मनात माझ्या गीता संथा प्रवासाचे विचार मनात घोळत होते. मैत्रिणी आल्या. बरोबर ठरलेल्या वेळेला शंखनाद होऊन गीता पठणाला सुरवात झाली. सर्व अध्याय पाठ असलेल्या मंडळींना भगवे कपडे आणि वाचन करणाऱ्यांना पांढरे कपडे असा ड्रेसकोड होता. दहा हजारांपेक्षा जास्त मंडळी एका तालात, एका लयीत, एका उच्चारात अध्याय म्हणत होती. एकच मोठा आवाज असावा, असं वाटत होतं. हा अनुभव फार वेगळा होता. भाषणं, सत्कार, शाली, पुष्पगुच्छ ह्यात वेळ न गेल्यामुळे वेळापत्रक चोख पाळलं गेलं. गीता धर्म मंडळाचे सदस्य आणि इतर स्वयंसेवक ह्यांचं ह्यासाठी अभिनंदन. कार्यक्रम उत्तम झाला. व्यवस्थापन चोख होतं. घरी परत येताना वाटलं की गीता आपल्याला प्रथम कधी माहिती झाली? एक ऑगस्टला शाळेत टिळक पुण्यतिथी साजरी होत असे. बाईंनी लिहून दिलेली भाषणं पाठ करताना त्यात ‘स्वराज्य हा माझ...