जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो. पुण्यातली गजबज आणि शेताजवळच्या खेड्यातलं वातावरण इतकं वेगळं असतं, की दुसऱ्या ग्रहावर गेलो आहोत, असं वाटायला लागतं. तरी पुण्यापासून फार दूर नाहीये. घरून निघाल्यापासून दीड तासात तिथे पोचता येतं. जाताना बंगलोर हायवे. नंतर जुना मुंबई-पुणे रस्ता, तळेगाव औद्योगिक वसाहतीचा रस्ता अशा पायऱ्या उतरत मग खेड्याच्या रस्त्याला लागतो. त्या रस्त्यावर एक प्रचंड मोठी दगडाची खाण आहे. तिथून दगड, खडी वाहून नेणाऱ्या डम्पर, ट्रकची वाहतूक सगळ्या परिसरावर धूळ उडवत अव्याहत चालू असते. ह्या जड वाहनांमुळे रस्त्यात ...