दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग पाचवा - वॉशिंग्टन स्टेट ते नेवाडा

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा भाग चौथा : मॉन्टाना ते वॉशिंग्टन स्टेट https://aparnachipane.blogspot.com/2021/02/blog-post_11.html ०२ ऑक्टोबर २०१९ सिऍटल, वॉशिंग्टन स्टेट ते ग्रँट्स पास, ओरेगॉन आजपासून पुढचे काही दिवस रोजचं पार करायचं अंतर 400 मैलांच्या आसपास होतं. इंटरस्टेट हायवेवरची वेगमर्यादा ताशी ५५ ते ६५ मैल असते. म्हणजे साधारण सहा-सात तासांचं अंतर. त्यामुळे ज्या दिवशी काही बघायचं असेल, तर निवांतपणे बघण्यासाठी आणि काही बघायचा प्लॅन नसेल तर थोडा आराम करायला वेळ मिळणार होता. ह्या संपूर्ण प्रवासात मिळून जी पंचवीस राज्य फिरायची होती, त्यातली अर्ध्याहून अधिक पार केली होती आणि दिवसांच्या हिशेबात साधारण निम्मे दिवस संपले होते. बर्फ-थंडी, डोंगर-दऱ्या, घनदाट जंगलं असलेला भाग संपून आता हळूहळू लालसर खडकांच्या वाळवंटी प्रदेशाच्या दिशेने जाणार होतो. निसर्गाची किती वेगवेगळे विभ्रम ह्या प्रवासात बघायला मिळत होते! परवा दिवशी ओरेगॉन राज्यातून वॉशिंग्टन स्टेटमध्ये आलो. आज वॉशिंग्टन स्टेटमधून पुन्हा एकदा ओरेगॉन राज्याच्या वेगळ्या भागात जायचं होतं. कालचा दिवसभर ब...