दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं : भाग दुसरा व्हर्जिनिया ते नेब्रास्का

२२ सप्टेंबर २०१९ : फॉल्स चर्च,व्हर्जिनिया ते मौमी, ओहायो हे घेऊ का ते घेऊ की दोन्हीही घ्यावं ? थंडीसाठी घेतलेले कपडे पुरेसे होतील का ? दोघांचे लॅपटॉप तर हवेतच. ’ वगैरे अनंत प्रश्न सोडवण्यात आणि सामानाची भराभरी -उचकाउचकी करण्यात रात्री झोपायला उशीर झाला. पण तरीही लवकर उठून ठरलेल्या वेळेच्या किंचितच उशीराने आम्ही घर सोडलं. सामानाचा डोंगर कारमधे नीट रचला. विमान प्रवासात जसं चेक-इन-लगेज आणि कॅबिन लगेजची वर्गवारी करतो , तशीच कारच्या डिकीमध्ये ठेवायचं सामान , मागच्या सीटवर ठेवायचं सामान , गाडी चालू असतानाही हात मागे करून घेता येईल असं खाली ठेवलेलं सामान आणि जवळ हवीच अशी पर्स असं वर्गीकरण केलं होतं. ही काही पहिली रोडट्रीप नव्हती , त्यामुळे कधी काय सामान लागतं आणि कुठे काय सामान असलं की सोयीस्कर पडतं हे सरावाचं झालेलं होतं. सामान आणायला मदत म्हणून मुलगा खाली पार्किंगमध्ये आला होता. खरं म्हणजे तो आम्ही नक्की जातोय ना , ह्याची खात्री करायला येत असावा , अशी शंका घ्यायला भरपूर वाव होता! आता पुढचे वीस-पंचवीस दिवस आई-बाबा नाहीत , सगळं घर आपल्या ताब्यात ह्याचा आनंद लपवणं त्याला जरा जडच जात होतं. ...