आम्र-विक्री योग
मावळ भागातल्या एका खेड्यात आमची थोडी शेतजमीन आहे. नवऱ्याने मोठ्या आवडीने घेतली , तेव्हा अगदी माळरान होतं. त्याने दर आठवड्यात तिथे चकरा मारून , गावकऱ्यांशी मैत्री करून , कष्टाने-प्रेमाने त्या जागेला हिरवं केलं. एकट्यानेच. घरच्या आणि व्यवसायाच्या व्यापात वर्षावर्षात मी तिथे फिरकत नसे. तसाही माझा पिंड पूर्णपणे शहरी आहे. काय भाजी- फळे हवी असतील , ती भाजी बाजारातून पाव-अर्धा किलो आणावी आणि खावी एवढीच माझी झेप आहे. त्यामुळे ह्या लेखातही काही तांत्रिक चुका असल्या , तर पोटात घाला. नवऱ्याला मात्र हे उपद्व्याप मनापासून आवडायचे. नोकरी सांभाळून गहू-तांदूळ-ऊस-ज्वारीची प्रकारची शेती तर जमण्यासारखी नव्हती. म्हणून मग त्याने तिथे फळझाडे लावायची ठरवली. कोकणातून आंब्यांची , काजूची , फणसाची रोपं आणली आणि रुजवली. सुरवातीला तिथे पाण्याचा प्रश्न होता , वीज नव्हती. हळूहळू ह्या सगळ्या सोयी झाल्या आणि शेत बहरत गेलं. फळझाडांच्या जोडीला अधूनमधून थोडीफार भाजीची ...