माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१३ (समारोप)

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा भाग १२ : यात्रेविषयी थोडे https://aparnachipane.blogspot.com/2019/02/blog-post.html खरंच, मला का वाटलं असेल कैलास-मानसला यावं असं? मी तिथे असताना आणि परत आल्यावरही ह्यावर बराच विचार केला. मी तशी देव-धर्म, उपास-तापास करणाऱ्यातली नाही. पाप-पुण्य ह्या कल्पनांवर माझा विश्वास नाही. समाज नीट चालावा म्हणून परलोकातील सुखाचा मोह दाखवलेला आहे, असं मला वाटतं. म्हणजे कसं की, भुकेल्याला अन्न द्यावेसे वाटावे, म्हणून त्याला ‘पुण्यकर्म’ करून मृत्यूनंतरच्या फायद्याची लालूच. वाईट वागल्यास ‘पापाची’ भीती दाखवणे. भूतदया नक्कीच चांगली, पण त्याला ‘पुण्य’ मिळवण्याची झालर कशाला? असा माझा विचार. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मातील पापे धुवायचं आकर्षण वाटण्याच काही कारणच नाही. गिर्यारोहण किंवा प्रवासाची आवड म्हणावी तर, अनेक हिमालयातले ट्रेक किंवा परदेशातील प्रवास मी खर्च केलेल्या पैशात आरामात झाले असते. आजही यूथ हॉस्टेल किंवा तश्या संस्थांच्या ट्रेकला, दिल्ली पर्यंतचा विमानाचा...