माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१० (लिपूलेख पास ते गाला)
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा भाग ९ : तकलाकोट मुक्काम https://aparnachipane.blogspot.com/2018/10/blog-post_11.html दिनांक ३ जुलै २०११ ( लीपूलेख खिंड ते गुंजी) लीपूलेखची शेवटची चढण कशीबशी चढून मी भारताच्या सीमेत पाय टाकला. सुरेशभाई लगेच धावत पुढे आला. माझ्या पाठीवरची सॅक घेतली , हात धरून जिथे मी नीट उभी राहू शकेन , अश्या जागी थांबवलं. सगळे जवान , अधिकारी , पोर्टर , पोनीवाले हसऱ्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. माझा पोनीवाला येऊन ‘ कैसे हो दिदी , परिक्रमा ठीक रही ? ’ अशी चौकशी करून गेला. पाचव्या बॅच चे यात्री तिबेटमध्ये जाण्यासाठी उभे होते. तिबेटमध्ये जाताना आम्ही ज्या कौतुकाच्या नजरेने पहिल्या बॅचच्या यात्रींकडे बघितलं होत , तसेच हे यात्री आमच्याकडे बघत होते. ‘ काही त्रास झाला का , हवा कशी होती ? ’ अश्या चौकश्या करत होते. माझ्या परिचयातले पुण्याचे श...