तरंगायचे दिवस! (भाग-४: अंतीम)
तरंगायचे दिवस!-भाग 3 वाचण्यासाठी ह्या दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/01/blog-post_94.html कल्याण ते मुंब्रा : एक धाडसी प्रयोग पोहायला शिकलो, खाडी क्रॉस करून झाली. छान ग्रूप तयार झाला. पण पुढे काय? मग कल्याण ते डोम्बिवली आणि नंतर कल्याण ते मुंब्रा पोहत जायचं, अशी कल्पना कोणाच्या तरी डोक्यात आली. कल्पना तर छानच होती. पण हे करायचं कस, ह्याची कोणालाही सुतराम माहिती नव्हती. बऱ्याच वर्षांपूर्वी काही जण कल्याण ते डोम्बिवली हे सात-आठ किलोमीटर अंतर पोहून गेले होते, अशी आणि तेवढीच माहिती काही जण द्यायचे, पण आम्हाला तसा त्या माहितीचा काहीही उपयोग नव्हता. परमेश्वराच्या ‘गुगल’ ह्या अवताराचे आगमन अद्याप पृथ्वीतलावर झालेले नसल्याने, तो पर्याय नव्हताच. मग इकडे-तिकडे चौकश्या आणि त्याबरोबर अत्यंत जोरात प्रॅक्टीस सुरू झाली. नियमित पोहायला येणारे आणि चांगल्यापैकी स्टॅमिना असलेले पंधरा-सोळा जण निवडले गेले. सुदैवाने आम्ही तिघी मैत्रिणी ह्या गटात होतो. तेव्हा आम्ही अकरावीतून बारावीत गेलो होतो. पोहण्याच्या आवडत्या कार्यक्रमात व्यत्यय नको, म्हणून आम्ही ...