जीवनज्योती कृषी डायरी - भाग ६ 'फेर आई रे मौरा '
काही वर्षांपूर्वीपर्यंत मी शेतावर फारशी येत नसे. घरच्या जबाबदाऱ्या, व्यवसायाची गणितं, शिकणारा मुलगा आणि वृद्ध सासू-सासरे एवढ्या धावपळीत तेवढी फुरसत नसायची. पण नंतर महेश कामाच्या निमित्ताने दीर्घ वास्तव्यासाठी परदेशी गेला. मग अधूनमधून तरी आपण शेतावर चक्कर मारायला हवी, असं वाटायला लागलं. शेताच्या रस्त्यात एक भलीमोठी दगडाची खाण आहे. त्यामुळे त्या भागात डंपरची वाहतूक अहोरात्र चालू असते. त्या काळजीने एकटीने चारचाकी चालवत जायला नको वाटायचं. मग माझा भाचा आणि मी असे एखाद्या महिन्याने शेत-फेरी करायचो. त्याआधी कधी गेलेच तरी महेशबरोबर जाऊन त्याच्याबरोबर घरी येत असे. त्यामुळे रस्ताही धड माहिती नव्हता. भाच्याबरोबर जाताना तळेगावपासून पुढे गेलो की आम्ही ऍलर्ट मोडमध्ये जायचो. सगळ्याच वाटा आणि शेतं ओळखीचीही वाटायची आणि अनोळखीही. शेताजवळच्या खेड्यात एक शाळा आहे. मदतनिसाला त्या शाळेपाशी थांबायला सांगायचे. तो भेटला की त्याच्या मागेमागे जाता येत असे. त्याला ह्याची फार गंमत वाटायची. ‘तुमचं रान तुमाला सापडेना. काय करावं आता!!’ अशी चेष्टा होत असे. पुण्यात मी आरामात पत्ते शोधते. ‘ह्या चौकातून डावीकडे. त्या दुक