जीवनज्योती कृषी डायरी - भाग ६ 'फेर आई रे मौरा '

काही वर्षांपूर्वीपर्यंत मी शेतावर फारशी येत नसे. घरच्या जबाबदाऱ्या, व्यवसायाची गणितं, शिकणारा मुलगा आणि वृद्ध सासू-सासरे एवढ्या धावपळीत तेवढी फुरसत नसायची. पण नंतर महेश कामाच्या निमित्ताने दीर्घ वास्तव्यासाठी परदेशी गेला. मग अधूनमधून तरी आपण शेतावर चक्कर मारायला हवी, असं वाटायला लागलं. शेताच्या रस्त्यात एक भलीमोठी दगडाची खाण आहे. त्यामुळे त्या भागात डंपरची वाहतूक अहोरात्र चालू असते. त्या काळजीने एकटीने चारचाकी चालवत जायला नको वाटायचं. मग माझा भाचा आणि मी असे एखाद्या महिन्याने शेत-फेरी करायचो. त्याआधी कधी गेलेच तरी महेशबरोबर जाऊन त्याच्याबरोबर घरी येत असे. त्यामुळे रस्ताही धड माहिती नव्हता. भाच्याबरोबर जाताना तळेगावपासून पुढे गेलो की आम्ही ऍलर्ट मोडमध्ये जायचो. सगळ्याच वाटा आणि शेतं ओळखीचीही वाटायची आणि अनोळखीही. शेताजवळच्या खेड्यात एक शाळा आहे. मदतनिसाला त्या शाळेपाशी थांबायला सांगायचे. तो भेटला की त्याच्या मागेमागे जाता येत असे. त्याला ह्याची फार गंमत वाटायची. ‘तुमचं रान तुमाला सापडेना. काय करावं आता!!’ अशी चेष्टा होत असे. पुण्यात मी आरामात पत्ते शोधते. ‘ह्या चौकातून डावीकडे. त्या दुकानाच्या नंतर उजवीकडची दुसरी गल्ली’ असे पत्ते सापडतात. पण ‘भांगरेंच्या रानानंतरची तिसरी मोरी आली की डावीकडे’ ह्या पत्त्याला मी अगदी क्लीन बोल्ड होत असे..


आता नेहमी जाऊन रस्ते, रानं, झाडं सगळं ओळखीचं झालं. तेव्हा आपल्याला इतका सरळ आणि सोपा रस्ता कसाकाय सापडत नव्हता? असा प्रश्न हल्ली शेतात जाताना पडतो. नियमित शेती करायला लागल्यावर बाकी बऱ्याच गोष्टीतही फरक पडला. एकतर शेतीमागे किती कष्ट आहेत, हे अनुभवातून कळलं. किंचित वाकडं किंवा एका भागाला कीड आहे, असा शेतमाल मी कदाचित आधी टाकून दिला असता. आता तेवढा भाग काढून उरलेला वापरते. नैसर्गिक शेतीतल्या ताज्या फळांची-भाज्यांची चव, स्वाद किती चांगला असतो, हे कळलं. कुठल्याच भाज्या-फळांच्या बिया आता फेकून देववत नाहीत. सगळ्या बिया ठेवणं शक्य नसतं. पण ठेवाव्या असं वाटतं खरं. आंब्याच्या कोयी, जांभळाच्या, लाल भोपळ्याच्या बिया पुढच्या मोसमात बियाणं म्हणून कामाला येतात. ओळखीत कोणाला पपई दिली, तर त्या बिया सांभाळून ठेवायला सांगते. त्याची रोपं करून शेतावर लावली जातात. सध्या पपई लागवड करत आहे, त्यातली बरीचशी रोपं अशी शेतावरच्या पपईच्या बियांचीच आहेत. अजून एक बदल म्हणजे कुठेही जाता-येताना इतर शेतांवर, पिकांवर, झाडांवर बारीक नजर ठेवली जाते. कुठल्या शेतात काय लावलं आहे, कुठल्या झाडांना फुलं-फळं आहेत, कुठे कापणी-लावणीची तयारी चालू आहे, ह्याची उगीचच नोंद घेतली जाते. तेच पीक किंवा झाड शेतात असेल, तर निश्चितच लक्ष जातं. ‘पुण्यातल्या आंब्याच्या झाडांवर मोहोर दिसायला लागला, आपल्याकडे नाही अजून’ असे विचार येतात.


शेतावर पोचलो की आणलेलं सामान ठेवायचं. पायात साध्या चपला किंवा फ्लोटर्स असतात ते बदलून गमबूट घालायचे. डोक्यावर टोपी अडकवायची. एका बारक्या पर्समध्ये काम करताना घालायचे हातमोजे, एक छोटी कात्री, इयरफोन असं साहित्य असतं. ती पर्स शेतावरच असते. त्यात मोबाईल घ्यायचा. ती पर्स गळ्यात अडकवायची. एका खांद्याच्या पिशवीत शेताच्या मातीने रंगलेल्या २-४ पिशव्या भाजी-फळं काय मिळतील ती ठेवण्यासाठी घ्यायच्या. त्यासोबत पाण्याची बाटली, ब्रँच कटर घ्यायचं की निघायचं असं नेहमीचं रूटीन आहे. आम्ही जिथे सामान ठेवतो, त्याच्या समोर आमची हौसेची बाग आहे. तिथे सध्या कांदा, कोथिंबीर, मेथी आहे. वांग्याची, मिरचीची काही रोपं लावली आहेत. घेवडा आणि मका पण आहे. मका गोड असल्यामुळे उंदरांनी त्याची पार्टी केली. घेवडा थोडा कडवट चवीचा. तो वाचला. तिथेच माझ्या आवडीचं म्हणून अनंताचं, एका अतिप्रिय व्यक्तीची आठवण म्हणून बकुळीचं, कधीतरी घरी गुलकंद करायची महत्त्वाकांक्षा आहे, म्हणून देशी गुलाबाचं, मैत्रिणीने दिलेलं एक सोनचाफ्याचं झाडही आहे. काकडीचे वेल जरा अंग धरत आहेत. गेल्यागेल्या ह्या बागेची प्रगती बघायची आणि मग पुढे जायचं असं रूटीन असतं.


सध्या अमेरिकास्थित असलेल्या मुलाचा आम्ही शेतावर असताना फोन आला. मग व्हिडिओ कॉलवर त्याला शेत-दर्शन घडवलं. तो अगदीच शहरी मुलगा आहे. त्यात आता परदेशस्थ. शेतावर नियमित जायला लागेपर्यंत मला जसं मिरची आणि टोमॅटोचं रोप वेगळं ओळखता येत नसे, तसंच त्याचं आहे. पण काहीही असलं तरी ते शेताचे ‘धाकटे मालक’! त्यामुळे त्याच्या सामान्य ज्ञानात भर घालायचा प्रयत्न केला. नव्या पिढीतील अत्याधुनिक सदस्याच्या ज्ञानात भर घालायची संधी क्वचितच मिळते . त्यामुळे त्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. नेट त्रास देत होतं, तरी नेटाने त्याला हे झाड आणि ती भाजी दाखवली. त्याची पायधूळ शेतावर पडली, त्याला बरीच वर्ष झाली. त्यानंतर जे बदल झाले होते, ते त्याला दाखवता आले. त्याला त्याच्या आवडत्या भाज्या, फळं बघून आनंद झाला. पण आश्चर्य वाटलं ते फणसाच्या फुलाचं. फणसाचं फूल गऱ्यासारखं दिसतं. फूल उमललं आणि परागीभवन झालं ही त्यातून इवला फणस डोकावायला लागतो. अमेरिकेत जरा दुर्लभ असलेली चिकू, पेरू सारखी फळं बघून त्याला कधी एकदा सुट्टीवर येतोय असं झालं आणि मला इतकं खंडीभर असून लेकराला मिळत नाही, म्हणून जरा दुखलं. असो.


प्रत्येक कामाच्या क्षेत्रात आपले विशेष विनोद असतात. आमच्या बांधकाम क्षेत्रातही असतात. बांधकाम सुरू करताना सरकारी परवानगी घ्यावी लागते, काम पूर्ण झाल्यावर तसा दाखला (भोगवटा पत्र) घ्यावा लागतो. अशा कामाच्या निमित्ताने मी महापालिकेत नेहमीच जात असते. एखाद्या जादा माणसाचं वर्णन तिथले लोकं ‘मॅडम तो पहिल्यापासून जरा वाढीव बांधकामच होता’ असं करायचे. तसंच ‘एखाद्या माणसाला कंस पडणे’ हा तर मला फारच आवडलेला विनोद आहे. सातबारा किंवा तत्सम नोंदींवर एखाद्याची नोंद असेल आणि ती व्यक्ती निवर्तली, तर त्याच्या वारसांची तिथे नोंद होते. हे करताना निवर्तलेल्या व्यक्तीच्या नावाभोवती कंस करतात. त्यामुळे कोणी गेल्याची बातमी ‘त्याला कंस पडला मागच्या आठवड्यात’ अशी सांगतात!! ‘आम्हाला कंस पडले, की शेत तुला सांभाळायचं आहे. सगळं बघून ठेव’ असं सांगून मी चिरंजीवांची माफक करमणूक केली.

मी आठवड्यातून एकदा शेतावर जाते. महेश चार दिवस जातो. मला फार काम नसतं. महेश आणि शेतावरच्या मदतनिसाची कामाची यादी मात्र न संपणारी असते. नवीन काही पेरणी करायची असली, की तो भाग तयार करायचा, तिथे जीवामृत टाकायचं, बियाणं किंवा रोपांची जुळणी करायची. ह्या दरम्यान एखादं मशीन काहीतरी काम काढतं. मग त्या दुरुस्तीची तिथे खटपट करायची. जमलं तर उत्तम नाहीतर ते मशीन पुण्यात दुरुस्तीसाठी आणायचं. ही यादी कितीही वाढवता येईल. आज माझं आवरेपर्यंत पावसाळ्यात पेरणीसाठी ठेवलेल्या सोयाबीनला ऊन दाखवणे, हे काम ते दोघं मिळून करत होते.






प्रत्येक जागी पाणी पोचवणे, हे शेतीतलं फार महत्त्वाचं आणि रोजचं काम. त्यासाठी प्रत्येकजण निरनिराळे उपाय शोधत असतो. शेताच्या कडेने पाट केलेले आहेत. ड्रीप पण आहे. आता एक रेन पाइप घेतला आहे. शेडसमोरच्या बागेत त्या पाइपचा जादूचा प्रयोग करून झाला. योग्य प्रेशर तयार झाल्यावर मस्त कारंजी उडायला लागली. थोड्या वेळात बऱ्याच वेला-झुडपांना पाणी मिळालं.

हे झाल्यावर मग उगीच इकडे तिकडे हिंडले. बोरं पिकली आहेत का, पपई तयार झाली आहे का? अशी पाहणी केली. आता शेतावरचे मनोरंजक दिवस सुरू झाले. आंब्याला, काजूला, आवळ्याला मोहोर आला आहे. फणसाला फुलं येत आहेत. फणसाच्या झाडावर बारके बारके फणस लगडले आहेत. असं फांदीफांदीला बोटभर फणस लागलेलं झाड बघायला छान वाटतं. फणसाच्या फुलांना एक सौम्य पण विशिष्ट गंध असतो. तो मला फार आवडतो. काजूचंही तसंच. ती अगदी नाजूक फुलं दिसायलाही फार देखणी दिसतात. बोरं पुष्कळ लागली आहेत. पण अजून हिरवी आहेत. ‘कोल्होबा, कोल्होबा बोरं पिकली’ ही वेळ अजून महिन्याभराने येईल.


पपईचा रंग बदलून किंचित पिवळा रंग झाला, की त्याला ‘कवडी पडली’ असं इकडे म्हणतात. अशी पपई उतरवली, की ती थोड्या दिवसात पिकते. तशी कवडी पडलेली एक सणसणीत मोठी, जवळजवळ अडीच किलो वजनाची पपई मिळाली. पूर्ण नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या ह्या पपयांची चव,पोत आणि स्वाद उत्तम असतो. पपयांचं उत्पादन वाढवावं म्हणून दोन वर्षांमागे बरीच रोपं लावली होती. पण तेव्हाच पपयांवर कसलासा व्हायरस आला. पानं खराब होऊन गुंडाळल्यासारखी झाली. मग ती सगळी रोपटी काढून जाळून टाकली. आता पुन्हा लावली आहेत. रोपांचीही गंमत असते. शेजारी लावलेल्या दोन रोपांपैकी एक कमरेइतकं उंच झालं तर दुसरं गुडघ्याइतकंच असतं. लावलेल्या रोपांपैकी सगळी जगातील, ह्याचीही शाश्वती नसते. लावलेल्या रोपांपैकी जेवढी ‘नर’ झाडं असतील, त्यांचा उपयोग परागीकरणाकरता होतो. पण ती फळधारणा करू शकत नाहीत. अशा सगळ्या कहाणीनंतर जी फळं हातात पडतात, तो आनंद अमूल्य असतो. थोडक्यात काय, आपण रोपं लावणं, त्याला खत-पाणी करणं, ते फळभाराने जडावलं तर आधार देणं, ही कामं मन लावून करायची. ‘फळाची’ अपेक्षा करायची नाही. फिरता फिरता दोन-चार आवळे, थोडे पेरू असा मेवा गोळा केला.

आदिमानव जेव्हा शिकार करून जगत होता, तेव्हा त्याला ज्या त्या मोसमातील फळं मिळायची. आता आपण बाजारात जाऊन आपल्याला हवी ती फळं आणून खाऊ शकतो. आम्ही शेती करायला लागल्यापासून मात्र ‘आपल्या शेतावरचीच फळं खायची’ ह्या स्टेशनवर आलो आहोत. त्यामुळे त्या त्या मोसमातली फळं खाल्ली जातात. बाजारातून आणून फारच क्वचित खातो. असंच भाजीचंही व्हावं, ह्या दृष्टीने प्रयत्न करतोय. अगदी पूर्ण आठवडाभराच्या भाज्या नाही, तरी अर्ध्या भाज्या शेतावरच्या असाव्या असं नियोजन करतो आहे. बघूया.


साधारणपणे संक्रांतीच्या आसपास आवळे बाजारात येतात. पण आमचं शेत आमच्यासारखंच निवांत असल्यामुळे आता आवळ्याच्या झाडावर फुलोरा दिसतोय. मार्च-एप्रिलमध्ये आवळे तयार होतात. ही सगळी झाडं कंपाउंडच्या जवळ आहेत. कंपाउंडच्या बाहेर तण अगदी आनंदाने वाढतं. तिथे चरणारी गुरं त्यातल्या काही वनस्पती खातात. काही रानमारीसारखी झुडपं आणि वेल फार गतीने वाढतात. तारेच्या कंपाउंडचा आधार मिळतो. आवळ्याच्या खडबडीत खोडांचाही. ह्या वेली दिसायला नाजूक दिसल्या, तरी त्या भयानक चिवट असतात. आवळ्याच्या काही फांद्या ह्या वेलांच्या ताणाने तुटल्या आहेत. कंपाउंडलाही ह्या सगळ्या प्रकरणाचा भार होतो. वेळ मिळेल, तशी आम्ही तिथे साफसफाई करतो. गाई तिथे बांधल्या, की त्या त्यांना आवडणारे प्रकार खातात. पण कंपाउंडच्या बाहेरची सफाई करणं आवश्यक झालं आहे. महेशच्या मागे बरीच कामं असतात. त्यामुळे मी दरवेळी थोडं थोडं करायचं ठरवलं आहे. अगदी दर आठवड्यात थोडं थोडं करत गेले, तर बहुतेक पुन्हा त्याच जागी एक वर्षाने येईन. पण काहीच नाही केलं तर हे invesive plants चं शेत आहे की काय अशी शंका येऊ शकेल! आज बरेच कटर, हातमोजे, गॉगल वगैरे सरंजाम चढवून शेताला प्रदक्षिणा घालून मी सुस्थळी गेले. अतिक्रमण विरोधी पथक आल्यावर रस्ते जसे स्वच्छ, मोकळे होतात, तसा तो भाग मोकळा झाला. आता नियमाने हे काम करणार आहे. असे शारीरिक कष्ट केल्यावर हात, खांदे, पाठ दमते. पण काहीतरी काम केल्याचं समाधानही वाटतं.

बहुतेक सगळ्या आंब्याच्या झाडांवर मोहोर डोकावायला लागला आहे. त्यामुळे मधमाश्या, छोटे पक्षी ह्यांची वर्दळ वाढली आहे. काजूच्या काही झाडांवर भरपूर फुलं आहेत, तर काही झाडांनी यंदा सुट्टी घ्यायचं ठरवलं आहे. बारकीबारकी लिंबं आहेत. आता नवीन झाडं लावायची वेळ जवळ आली. चिकू, आंबा, शेवगा, सीताफळ अशी पुष्कळ रोपं मिळवायची आहेत. पावसाच्या आधी ती व्यवस्थित रुजली की पावसाच्या पाण्यावर चांगली वाढतील. मी बांधकामाची कामं करत होते, तेव्हाही एक पाऊस संपला की थोड्या दिवसात ‘monsoon is just round the corner’ हा डायलॉग सुरू व्हायचा. शेतावरही तेच. पाऊस हे सगळ्या वर्दळीच्या केंद्रस्थानी असतो. ‘पावसाच्या आधी’ आणि ‘पावसाच्या नंतर’ ही चर्चा सतत चालू असते.





सध्या शेतावर नवीन पेरणी जोरात चालू आहे. भुईमूग, ज्वारी, घेवडा, भेंडी, गवार, मका, सूर्यफूल, बटाटे असं कायकाय नवीन लावलं आहे. एका ठिकाणी ताग पेरला आहे. तो थोडा मोठा झाला, की त्याला जमिनीत गाडून टाकणार. त्या हिरव्या खतामुळे पुढच्या पिकाला फायदा होतो. कडवे वाल थोड्या दिवसांपूर्वी लावले होते. पण कीड पडल्यामुळे ते काही हाती लागले नाहीत. एवढी सगळी पेरणी करायची म्हणजे मोठंच काम. गेले दोन आठवडे महेश आणि नानाची धांदल चालू होती. नुकतीच पेरणी झाल्यामुळे अजून मातीच्या लाल रंगाचं प्राबल्य आहे. हिरवे अंकुर अजून थोड्या दिवसांनी डोकं वर काढतील. लसूण नवरात्रात लावला होता, तो थोड्या दिवसांनी काढता येईल. गेल्या वर्षी एका जागी जांभळ्या घेवड्याचे वेल इतके फोफावले की त्याचा मांडव कोसळतो की काय? अशी भीती वाटत होती. त्याच्या बिया पडून तिथे परत वेल उगवले आहेत. आता त्याला जांभळी फुलं आली आहेत. थोड्याच दिवसात शेंगा येतील. जेवणानंतरही महेश आणि नाना त्याच कामात होते. घरी आणलेली काही पॅशनफ्रूट वाळली होती. वेलींसाठी तयार केलेला एक मांडव सध्या रिकामा आहे. तिथे ती फळं लावली. अळू, कढीलिंब, गवती चहा काढला. जास्वंदीच्या कळ्या, झेंडूची फुलं अलगद पिशवीत ठेवली. गमबूट काढून नेहमीच्या चपला घातल्या. त्यांना धोपटमार्गाचा सराव आहे. त्या रस्त्याला लागलो.


दर वर्षी आंब्यावर मोहोर आला की वासंती मुजुमदार ह्यांच्या ‘झळाळ’ पुस्तकात वाचलेला एक प्रसंग आठवतो. त्या पुस्तकात त्यांनी पं.कुमार गंधर्व ह्यांच्यावरचा लेख आहे. कुमारांच्या प्रथम पत्नी, भानुताई अकाली गेल्या. त्यानंतर कुमारजी अगदी सैरभैर झाले होते. कशातच त्यांना गोडी वाटेना. ना गाण्यात ना कोणाला भेटण्यात. रोजच्या रियाजातही मन लागेना. असेच खिन्न होऊन ते एकदा बागेत फिरत होते. सहज वर लक्ष गेलं तर आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता. ते बघून कुमारजींना वाटलं.’ मी इतका माझ्या दुःखात बुडून गेलो आहे, की मला कशाचं भान नाहीये. पण सृष्टीचं हे अविरत फिरणारं चक्र मात्र त्याच्या गतीने फिरतंय. नवी पानं जन्म घेत आहेत. फुलं फुलत आहेत. मी सुद्धा ह्या चक्राचा एक भाग आहे. मलाही नव्याने सुरवात करायला हवी’. त्यानंतर ते हळूहळू सावरले. हा क्षण कुमारजींच्या अलौकिक प्रतिभेमुळे ‘फेर आई रे मौरा’ ह्या बागेश्री रागातल्या रचनेमध्ये अजरामर झाला. आपल्याकडे त्यांच्यासारखी प्रतिभा कुठून येणार? ‘उत्पत्ती, स्थिती आणि विलय’ हे चक्र अपरिहार्य आहे, एवढं भान आलं तरी पुष्कळ.

‘जीवनज्योती कृषी उद्योग’ ह्या शेतीच्या प्रयोगाशी संबंधित अजून काही लेख 

  • जीवनज्योती कृषी डायरी भाग ५ 


https://aparnachipane.blogspot.com/2023/11/blog-post.html


  • जीवनज्योती कृषी डायरी भाग ४ : आमची माती, आमची शेती 

https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post_21.html

  • जीवनज्योती कृषी डायरी भाग ३

https://aparnachipane.blogspot.com/2020/10/blog-post.html

  • जीवनज्योती कृषी डायरी भाग २

https://aparnachipane.blogspot.com/2020/09/2.html

  • जीवनज्योती कृषी डायरी भाग १

https://aparnachipane.blogspot.com/2020/09/blog-post.html

  • दिव्याखालचा अंधार 

https://aparnachipane.blogspot.com/2020/07/blog-post.html

  • आम्रविक्री योग

https://aparnachipane.blogspot.com/2019/09/blog-post.html




Comments

  1. चला तुझ्या बरोबर माझी पण शेतात फेरी झाली. दमले बाई आता.

    ReplyDelete
    Replies
    1. दमलीस का. ये, आपण फणसाच्या झाडाखाली आराम करूया. दाट सावली आणि फुलांचा वास. शीण निघून जाईल.

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लिहिलंय. आता वाचलं. शेती असल्याने बरेचसे रिलेट होत गेले. तर काही नवीन समजले.

    _>> कुठल्याच भाज्या-फळांच्या बिया आता फेकून देववत नाहीत._

    हे अगदी अगदी! मी सुद्धा फळांच्या बिया कचऱ्यात फेकत नाही. अगदीच त्यांची पेरणी वगैरे करायला होत नाही पण कधी शेताकडे गेलो तर तिथे किंवा जिथे कुठे गर्द झाडी वेली आहेत अशा कमीतकमी अशा ठिकाणी जाऊन त्यांना निसर्गाच्या स्वाधीन करून येतो.

    ब्लॉगमधली झाडांची वर्णने खूप मनोहारी. मनात रेंगाळतात. झाडं आणि माणसांमधील समानता आजकाल वारंवार मनात येते. ब्लॉग वाचताना ते अधोरेखित झाले.

    बरेच प्रयोग करताहात तुम्ही. मेहनत आहे. प्रचंड कौतुक वाटले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५